विविध उपक्रम

Source :    Date :24-Jun-2019
राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यापैकी काही उपक्रम पुढील प्रमाणे आहेत - -
संस्था वर्धापन दिन 1 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी संस्था सरस यांचे एकत्रीकरण असते.
 
इतर विषयांबरोबरच संस्थेच्या सद्य स्थितीबद्दल संस्था सदस्यांना अवगत केले जाते. तसेच संस्थेच्या पुढील वाटचाली बद्दल संस्था सदस्यांची मते विचारात घेऊन चालीची दिशा ठरवली जाते.
 
शिक्षक दिन - 5 सप्टेंबर 
5 सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शिक्षकांना या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संस्थास्तरावर शिक्षकांचे एकत्रीकरण करून त्यांच्यासाठी स्नेह भोजन, तसेच प्रासंगिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
 
शिक्षण प्रशिक्षण
गुरुवर्य का. रा. तथा अण्णा नाबर अमृत महोत्सव समिती पुरस्कृत प्रशिक्षण शिबिरांतर्गत माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केली जाते. याचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना होत असतो.
 
डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सन 2003 मध्ये, संस्थेने, स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मानित केले होते. त्या वेळी सत्कारमूर्ती डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर यांना संस्थेने दिलेल्या रोख रक्कमेत तेवढीच आधीकची रक्कम त्यांनी स्वतः घातली व ती संस्थेला परत करून या रकमेच्या व्याजातून, शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या संबंधित गोडी निर्माण व्हावी म्हणून एक स्पर्धा आयोजित करण्यात यावी व त्या स्पर्धेत सहभागी होवून विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात यावा अशी सूचना केली होती.
 
याची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी सर्व विद्यार्थ्यांची ई. 5 वी ते 7 वी चा एक गट आणि ई. 8 ते 10 वी दुसरा गट असे दोन गट करून त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते. यातील विजेत्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षेचा काठिण्य स्तर वाढवून लेखी परीक्षेचे आयोजन केले जाते. या चाळणीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय देऊन वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यास सांगितले जाते. याचे परीक्षक म्हणून संस्थेच्या शाळा व्यतिरिक्त इतर शाळांतील विज्ञान शिक्षकांना आमंत्रित केले जाते. यावेळी 5, 5 विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून त्यांना गट चर्चेला सामोरे जावे लागते. यामुळे हे विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यात स्पर्धा परीक्षा व त्यांचे अनुशंगाने गटचर्चा कशी करावी याचा सराव करायला शिकतात. विज्ञानाचा प्रयोग करण्यासाठी अभ्यास करतात, या सर्वांचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची निष्पक्षपणे निवड व्हावी. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांची मुलाखत आयोजित केली जाते. यासाठी परीक्षक/ मुलाखतकार, तज्ज्ञ म्हणून विज्ञान विषयातील संशोधन अथवा तत्सम उच्च अर्हताधारक,व्यावसायिक, यांना आमंत्रित करण्यात येते. याचे आणखीन असे वैशिष्ट्य आहे की हे परीक्षक संस्थेच्या शाळांचे माजी विद्यार्थी असतात. त्यामुळे माझी विद्यार्थ्यांशी ही संपर्क ठेवला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक अभ्यासाची गोडी लागावी. यातून येथे सातवी गटाचा एक व आठवी ते दहावी गटाचा एक दोन विद्यार्थी निवडून त्यांना डॉक्टर रघुनाथ माशेलकर बाल वैज्ञानिक पुरस्कार दिला जातो.
 
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
संस्थेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दर वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वेळी परीक्षक म्हणून आज जे या क्षेत्रात कार्यरत आहेत अशा संस्थेच्या शाळांतील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले जाते.
 
क्रीडा स्पर्धा, आंतरशालेय कवायत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा 
शासनमान्य नियोजित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध व्हावे या उद्देशाने वेळोवेळी उपरोल्लेखित स्पर्धांचे आयोजन केले जाते.
 
स्वामी विवेकानंद पुरस्कार व स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षा अंतर्गत केलेल्या संकल्पानुसार, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका सन्माननीय व्यक्तीला दि. 12 जानेवारी, या स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी, "स्वामी विवेकानंद पुरस्कार" या नावाने, रोख रकमेचा पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात येतो. त्यानुसार आत्तापर्यंत विवेकानंद पुरस्काराने सन्मानित मान्यवर पुढील प्रमाणे आहेत.
1998 विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर,
- - - - सांस्कृतिक व्याख्याते.
1999 कै. राम शेवाळकर, साहित्यिक, व्याख्याते
2000 कै. नानाजी देशमुख, समाजसेवक
2001 पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर,
खगोल शास्त्रज्ञ.
2002 कै. वंदनीय उषाताई चाटी
संचालिका, राष्ट्र सेविका समिती
2003 डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ.
2004 डॉ. माधवराव चितळे, जलसंधारण तज्ञ.
2005 श्री. जे. एफ. रिबेरो, माजी पो.महासंचाल
2006 कै. वामनराव प्रभुदेसाई, उद्योजक,
संस्थापक पितांबरी.
2007 कै. शं. ना. नवरे, ज्येष्ठ साहित्यिक.
डोंबिवली भूषण.
2008 श्री. गिरिष प्रभूणे, ज्येष्ठ सामाजिक कार्य.
2009 प्रा. मोहन आपटे ,विज्ञान लेखक
2010 श्री दाजी पणशीकर, महाभारत अभ्यासक
2011 श्री. श्रीधर फडके, गायक संगीतकार
2012 कै. विनय आपटे, जेष्ठदिग्दर्शक
2013 श्री पवन भोईर जिम्नॅस्टिक पटू
2014 डॉ. सौ. रेणू दांडेकर, शिक्षणतज्ञ.
2015 श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे, योगाचार्य.
2016 श्री दिलीप कुलकर्णी पर्यावरण तज्ञ
2017 श्री. चंद्रशेखर टिळक, अर्थतज्ञ
2018 श्री अविनाश धर्माधिकारी,
माजी सनदी अधिकारी.
2919 इंदुमती काटदरे, कुलपती,
पुनरुत्थान विद्यापीठ.
या कार्यक्रमाला जोडूनच दरवर्षी दोन दिवस नामवंत व्याख्यात्यांचे विविध विषयावर व्याख्यान आयोजितकेले जाते. याच बरोबर शैक्षणिक स्तर उंचावण्या संदर्भात विविध प्रासंगिक कार्यक्रम, परिसंवाद यांचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते .
 
माजी विद्यार्थी संघ
आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम माजी विद्यार्थी संघ करीत आहे.