बाल मनातील अनोखा दिन ........ बालदिन

Source :    Date :17-Nov-2019
बाल मनातील अनोखा दिन ........ बालदिन  

           पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती दरवर्षी 'बालदिन' म्हणून साजरी केली जाते. .लहान मुलं म्हणजे पंडितजींचा जीव की प्राण. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, असं ते म्हणायचे.मुलं ही पंडितजींच्या हृदयातला एक अमूल्य ठेवा होता. ते रमायचे ते फक्त बच्चेकंपनीमध्ये आणि मुलांनाही चाचा नेहरू आपलेसे वाटायचे ते त्यांच्या लाघवी स्वभावामुळे.मुलांमध्ये रमताना ते त्यांच्यातलेच एक होऊन जात. मुलांवरच्या याच त्यांच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरू झाले. त्यामुळेच 14 नोव्हेंबर हा पंडितजींचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा होऊ लागला. मुलं ही देशाचं भविष्य आहेत. त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील, याच उद्देशानं पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी योग्य होते की नाही याकडेही जातीनं लक्षं दिलं.
          आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक या शाळेत १४ नोव्हेंबर २०१९ रोजी 'बालदिन' अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा झाला. सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती वानखेडे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्व सांगण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यादिवशी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनावर आधारित "सलाम चाचाजी"हा माहितीपट दाखवण्यात आला. वर्गावर्गात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी :- श्रुत लेखन
इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी :- गुलाबाच्या फुलाला देठ काढणे .
            या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी झाले होते. या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली . या नंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे या बालदिनी विद्यार्थ्यांनी मनोरंजन ,खेळ,स्पर्धाच्या नभोमंडलात मुक्तपणे विहार केला व खऱ्या अर्थाने बालदिन साजरा झाला.