स्नेहसंमेलन एक आनंदोत्सव

Source :    Date :29-Nov-2019
स्नेहसंमेलन एक आनंदोत्सव    

 
         दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाली का सर्व विद्यार्थ्यांना वेध लागतात ते स्नेहसंमेलन; अर्थात गॅदरिंग,शैक्षणिक सहल व क्रीडास्पर्धा यांची . दिवाळी संपली की साधारणपणे शाळाशाळांमध्ये स्नेहसंमेलनांच्या तयारीला सुरुवात होते.गायन , वादन, नाटक, वक्तृत्व, कथाकथन, अभिनय , नृत्य असा खच्चून भरलेला कार्यक्रम असतो स्नेहसंमेलनाचा. स्नेहसंमेलन वेध लागतात आणि मग कुणी कुणी काय काय करायचं, याची चर्चा सुरू होते. गाण्यात कोण भाग घेणार, नाटकात कोणाला घ्यायचं, एक ना अनेक अंगांनी वर्गावर्गांत चर्चा झडू लागतात.प्रत्येकाच्या वैशिष्ट्यानुसार शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांची निवड करतात आणि मग सुरू होतात स्नेहसंमेलनाच्या सरावाचे  दिवस. आज प्रत्येक जण कोणती ना कोणती कला जोपासतात असतो. काही जण शास्त्रीय नृत्य शिकतात, तर काही जण उन्हाळी सुट्टीत बालनाट्याच्या शिबिरात भाग घेतात. अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा शाळा जास्तीत जास्त प्रयत्न करते. अशी स्नेहसंमेलने आयोजित करण्यामागचा उद्देशही खर्‍या अर्थाने तोच असतो. शैक्षणिक विकासासह मुलांच्या कलागुणांचाही विकास व्हावा; हे शाळेला आपलं कर्तव्य वाटतं. मुलांमधील कलांचा परिचय त्यांच्या मित्रवर्गाला व्हावा आणि सरावाच्या निमित्ताने, त्यात होणार्‍या गमतीजमतींच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील नातं दृढ व्हावं, हा हेतूदेखील या संमेलनांमुळे साध्य होतो.स्नेहसंमेलनं ही केवळ विद्यार्थ्याच्या विकासासाठीच असतात असं नाही. शिक्षकांनाही या निमित्ताने स्वतःच्या कलागुणांना वाव देता येतो. काही जण मुलांकडून गाणी तयार करून घेतात, तर काही नृत्य-नाट्य बसवतात. जशी विद्यार्थ्यांमध्ये नाती बहरत जातात, तसाच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही स्नेहबंध तयार होतो.भारतीय समाजात संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. जशी प्रत्येक घराची संस्कृती असते, तशीच शाळेचीही संस्कृती असते.  दर वर्षी होणारे स्नेहसंमेलनदेखील शालेय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात हे स्नेहसंमेलन मोलाचा वाटा उचलते. आपल्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवण्यात स्नेहसंमेलन महत्त्वाची भूमिका बजावतं.
           आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन सावित्री बाई फुले नाट्यमंदिर,डोंबिवली येथे पार पाडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. मुकुंद करकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती राजेन्द्र वानखेडे यांनी प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्वांचे हिंदू संस्कृतीचे प्रतीक असणारे तुळशी वृंदावन भेट दिले व सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य श्री. देशपांडे सर ,श्री. रविंद्रजी जोशीं,श्री. उंटवाले सर ,श्री. शास्त्री सर तसेच शाळासमिती अध्यक्ष श्री. अरुणजी ऐतवडे तसेच सौ. दिपाली काळे व सौ. पडसलगीकर उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे श्री. मुकुंदजी करकरे यांनी आमच्या गुणी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यावर्षी आमच्या शाळेने  "भारत संस्कृती दर्शन" या विषयांतर्गत भारतातील विविध राज्यांतील नृत्ये सादर केली. आमच्या बाल गोपाळांनी सादर केलेल्या या नृत्यांना  रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.संपूर्ण वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.