आषाढी एकादशीनिमित्त अरुणोदय शाळेत "आरोग्य दिंडी"

Source :    Date :21-Jul-2021
 आषाढी एकादशीनिमित्त अरुणोदय शाळेत "आरोग्य दिंडी"
 
 Dindi_1  H x W:
 
      मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी! या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणूनही संबोधले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळेच स्थान आणि महत्त्व आहे.पंढरपूरच्या विठोबाला अवघा महाराष्ट्र आपले दैवत मानतो. म्हणूनच आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.
          दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
           घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला
        अशाप्रकारे विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ,मृदूंग व चिपळ्या ,झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात गात पंढरपूर पर्यंत चालत जातात. गळयात तुळशीच्या माळा घालतात , कपाळी गंध लावतात. या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते . हा संपूर्ण सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या जन्माचे सार्थक झाले आणि पुण्य पदरात पडल्याने सर्व वारकरी समाधान मानतात. दिवसभर हा परिसर भजन – कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते.
‘आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे
सो मज व्हावा, तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग’
असे म्हणत वारकरी कृतकृत्य होतात. पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशीची स्वप्ने पाहत अतिशय जड अन्तःकरणाने त्यांची पावले आपल्या घरी वळतात.
             विद्यार्थ्यांना त्यांच्या लहान वयातच सणवारांची माहिती दिली तर आपली संस्कृती, परंपरा यांचा त्यांना परिचय होतो.तसेच त्यांच्या मनावर चांगले संस्कार होत असतात. आपण कितीही आधुनिक असलो तरी आपली संस्कृती विसरता कामा नये, यासाठी हे सण -उत्सव साजरे करणे महत्वाचे आहे.याच हेतुने आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय प्राथमिक शाळेत मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या सर्व जगावर कोरोनाचे संकट असल्यामुळे या उपक्रमाला यावर्षी ऑनलाइन चे स्वरूप प्राप्त झाले. इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत घरातच "रोग्य दिंडी" काढली व कोरोनाच्या संकटातून जगाला लवकर मुक्त कर असे विठूरायाकडे साकडे घातले. परिवारातील सदस्याच्या समवेत घरातच "आरोग्य दिंडी" साजरी करत आमच्या बाल वारकऱ्यांनी कोरोना संकटात मौल्यवान आरोग्य विषयक संदेश दिला व भयंकर संकटावर परिस्थितीनुरूप मात करून पुढे वाटचाल करता येते हे सांगण्याचा प्रयत्न केला. इयत्ता १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक वेशभूषा केल्या.सदर उपक्रमाची क्षणचित्रे विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांना Whatsapp च्या माध्यमातून पाठवली.
      कोरोनाच्या काळातही विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.सुनीत वारके यांनी पालक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.
 
   

Dindi_7  H x W:
Dindi_6  H x W:
Dindi_5  H x W:
Dindi_4  H x W:
Dindi_3  H x W:
Dindi_2  H x W: