शिक्षक :: Online Warriors -

Source :    Date :19-Jul-2020
-शिक्षक :: Online Warriors -
    नस्ते पालक मित्रांनो,
             तुम्ही शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक असाल विशेषतः आपल्या मुलांच्या शेजारी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यायला मदत करत असाल, तर मला तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे..
         आयुष्यातील कोणता काळ तुम्हांला परत जगायला किंवा आठवण काढायला आवडेल? असे जर कोणी विचारले तर नक्कीच तुम्ही सर्वजण म्हणाल ' ' ' शालेय जीवन '.. कारणही तसेच आहे. शालेय दिवस हे मंतरलेले, आनंददायी दिवस असतात .विशेषतः वर्गातील शिकतांना च्या गमती जमती, वर्गातील मित्र-मैत्रिणींबरोबर एकत्र खेळणे, वाटून घेणे, काळजी घेणे. अशाच काही मजेदार तर खाेडकर आठवणी शालेय जीवनात असतात.
       खरंच, रोज वर्गात घडणारा संवाद, त्यातील आपलेपणा ,क्रिया प्रतिक्रिया त्यातून घडत जाणारी संवेदनशील मनं, हे वर्गातील विद्यार्थ्यांचेच काय पण शिक्षकांचे सुद्धा भावविश्व असते.परंतु दुर्देवाने कोरोना साथ आल्यावर सर्व शालेय विश्वच ढवळून निघाले आहे.
       नवीन शालेय वर्ष सुरु झाल्याचा नवेपणा , नवीन पुस्तक- वह्यांचा गंध ,नवीन वर्ग ,वर्गमित्र ,नवीन शिक्षक हे सर्वच विद्यार्थी आणि त्याबरोबर शिक्षकांनासुद्धा चुकल्यासारखं वाटत आहे.
नेहमीच्या पद्धतीत नवीन वर्षात,‍ नवीन वर्गात गेल्यावर शिक्षकांना थोडा वेळ , काळ लागतो .त्या वर्गातील विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यायला, प्रेरणा द्यायला कधी एखादी गोष्ट सांगून किंवा छोटासा विनोद करून , तर केव्हा केव्हा स्वतःच्या आयुष्यातील अनुभव सांगणे तर कधी नुसत्याच गप्पा मारणे. .आणि यातूनच शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची आवड, मनं ओळखत असतात,कोण खोडकर आहे , कोणता विद्यार्थी शांत आणि हुशार आहे , हे शिक्षक नकळतपणे आकलन करत असतात.त्याप्रमाणे शिकवतांना प्रत्येक वर्गात शिक्षकाला स्वतःला बदलावे लागत असते.
          परंतु आताच्या परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या ऑनलाइन शिक्षणात हे शक्य होऊ शकत नाही.
माझ्यामते याला दोन मुख्य कारणे आहेत.;
१) प्रत्यक्षात शारीरिक दृष्ट्या शिक्षक हे खूप दूर असतात.ते बदलणे आज शक्य ही नाही.
२) ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांचे शिकविणे 'स्वीकारणे' . आभासी जगातील ' शिक्षकांचे शिकविणे'
विद्यार्थ्यांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनीही अंगीकारणे आवश्यक आहे.कारण शिक्षक शिकविताना त्यांची प्रत्येक हालचाल, बारकाईने लक्ष दिले जाते .त्यांच्या पालकांकडून सुद्धा परीक्षण केले जात. शिक्षकांचे हस्ताक्षर, आवाजातील चढ-उतार,उच्चार ... प्रत्येक गोष्टींवर पालकांकडून निरीक्षण होत असते.अशा वेळेस पालकांनी मुलांसमोर एखादी विरोधी प्रतिक्रिया दिल्यामुळे सुद्धा शिक्षकांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
          तरी प्रिय पालकवर्ग हो, आपण सर्व समजून घेऊ या की अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत शिक्षक सुद्धा प्रायोगिक स्थितीत आहे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनाही स्वतःच्या घरातील एक कोपरा वर्गात बदलावयाचाआहे कि जिथे शिकविताना त्यांना शांतता आणि एकाग्रता देता येईल. शाळेचे नियम पाळायचे असतात , एवढेच नाही तर घरातील सदस्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण करायच्या असतात. अशा विविध कोंडीतूनही शिक्षक जात असताे. ऑनलाइन शिकविताना आपले लोकांकडून परीक्षण होत आहे याचा दबाव शिक्षकांच्या मनावर कळत-नकळत येऊ शकतो.
          तरी पुढच्या वेळी ऑनलाईन शिक्षण घेतांना तुम्ही मुलांच्या शेजारी असाल तर कृपया लक्षात ठेवा की आभासी वर्गात सुद्धा शिक्षकांबद्दल आदर राहील हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हालाही जरूर एखादा प्रश्न , एखादी शंका निर्माण होऊ शकते किंवा एखादी गोष्ट चुकीची वाटू शकते तर नक्की तुम्ही शिक्षकाला फोन करून किंवा मेसेज करून अवश्य कळवा.एवढेच काय , कौतुक सुद्धा अशा प्रकारे करू शकतात .पाठीवर दिलेली शाबासकीची थाप पण शिक्षकांना या काळात आवश्यक आहे .
        ''घर'' हे एक मंदिर आहे. सर्वात प्रथम मुले संस्कार घरातून शिकत असतात. म्हणूनच आपण सर्वांनी मिळून ऑनलाइन शिक्षणात सकारात्मकता आणू या. मुलांच्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर पर्यायाने आभासी शिक्षणाची गोडी वाढवू या. शिक्षणाची गोडी वाढवू या...
     स्नेहल शिंदे ,मुख्याध्यापिका