स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामनगर

Source :    Date :14-Aug-2019
10 जून 1966 पासून डोंबिवली पूर्वेच्या रामनगर विभागात, सौ संध्या ताई रानडे यांच्या मालकीच्या घरातील एका खोलीत एक शाळा सुरू झाली. या शाळेचे नावही "स्वामी विवेकानंद विद्यामंदिर" असे होते. कै. मामा फाटकांच्या प्रयत्नाने रामनगर येथील राष्ट्रीय ट्रस्टच्या इमारतीत सन 1968 पासून शाळा भरू लागली होती. मे. दादाजी धाकजी आणि कंपनीचे मालक श्री. रामकृष्ण राणे यांच्या मालकीचा प्लॉट रुपये 15000 मध्ये विकत घेऊन त्या जागेवर विद्यमान " स्वामी विवेकानंद विद्यामंदिर” ,रामनगर , “गुरुगोविंद सिंग भवन” ही वास्तू उभी करण्यात आली. प्लॉट खरेदी साठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे प्रत्येकी पाचशे रुपये मात्र देऊन त्यावेळी एकूण 3500 चा निधी उभा केला व तो जागेचा खरेदी साठी बयाणा दिला. सामान्य कार्यकर्त्यांच्या सर्व प्रकारच्या योगदानामुळे रामनगर या शाळेची वास्तू उभी राहू शकली. अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षणप्रेमी कार्यकर्त्यांत मुळे रामनगर शाळेला मालकीची जागा मिळवून तेथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या रामनगर शाळेची वास्तू होऊ शकली. कै. मामा फाटकांनी मे. दादाजी धाकजी ट्रस्टकडून शाळेच्या इमारत बांधकाम करता रुपये चाळीस हजार मात्र अल्प व्याजाने ठेव म्हणून मिळवली होती. त्यामुळेच शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु करणे शक्य झाले.


 
 
प्रारंभी पूर्व - प्राथमिक विभागाला एकूण दहा विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गात एकूण 13 विद्यार्थी होते. सौ. सुमन पिसे ह्या त्यावेळी विनावेतन काम करीत होत्या. रामनगर येथे आधी जी शाळा चालू होती ती व गोपाळ नगर येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर चालविणाऱ्या शिक्षण प्रेमी कार्यकर्त्यांच्या विचारात आणि धोरणात समानता असल्यामुळे रामनगर येथील शाळा नंतरच्या काळात "राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या" छत्राखाली आली. अशाप्रकारे संस्थेचा विस्तार डोंबिवली परिसरात होवू लागला. ह्या वास्तूचे शिल्पकार श्री गोखले आणि श्री भगत होते.