जरासा झूम लू मै!

Source :    Date :14-Apr-2020
|
Tuesday. April 14, 2020 
                                                                    जरासा झूम लू मै!
 

Principal Dr. Anuja Palsu 
                                                               डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
 
 
या संचारबंदीच्या- टाळेबंदीच्या काळात मनामध्ये निराशेचे ढग दाटून येतात. मनावर वैफल्याचे विचार रुंजी घालत असतात. का? कसे? कधी? कुठपर्य॔त? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तरी हाती काहीच लागत नाही. पण या नकारात्मक विचारांचा काय उपयोग? सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीची व तिच्या प्रसाराची खरी गरज आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या तरुण विद्यार्थी वर्गाची नितांत आवश्यकता आहे.
 
या काळात आपण सर्वजण zoom app वरून google duo वरून वा यासारख्या इतर समाज माध्यमांवरून एकमेकांच्या संपर्कात आहोत. घरबसल्या केवळ कित्येक मैलांचेच नव्हे, तर भाषा, धर्म, प्रांत, देश, संस्कृती, खंड या सर्वांच्या सीमारेषा पार करून एकमेकांच्या हृदयापर्यंत पोचत आहोत. घरात बसून zoom वरून झुलायचे दिवस अनुभवत आहोत. आज या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधू इच्छिते.
 
या काळातून जात असताना मला महात्मा गांधीजींच्या दोन महत्त्वाच्या तत्त्वांची परत एकदा नव्याने ओळख पटत आहे. त्यातील पहिले तत्त्व म्हणजे श्रम प्रतिष्ठा. घरातील केर, लादी सफाई, स्वयंपाक, कपडे धुणे व तत्सम इतर कामे रोज नित्याने करून श्रमाचे महत्त्व कळायला लागले आहे व कोणतेही काम हलके व कमी दर्जाचे नाही हे पटू लागले आहे. दूध तापवलेली पातेली घासायला किती कठीण असते, यासारखे कामातील बारकावे लक्षात यायला लागले आहेत आणि त्यामुळेच ही कामे करणा-या चतुर्थ वर्गातील कर्मचा-यांच्या प्रती मनात आदर वाढलेला आहे. दुसरे गांधीजींचे तत्त्व म्हणजे काटकसरीचे तत्त्व! गरजा कमी ठेवण्याचे तत्त्व! आजच्या या टाळेबंदीच्या काळात काटकसरीचे तत्त्व मनावर बिंबवले जात आहे. उदा. कमीत कमी भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी करणे. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करणे वगैरे वगैरे. घराबाहेरील वातावरणात समाजात नेहमी उपलब्ध असलेली प्रलोभने उपलब्ध नाहीत. त्यामुळे भरपूर काटकसर होत आहे. आपण सर्वांनी त्याची कायम सवय ठेवणे, किंबहुना येणा-या दोन तीन वर्षे आर्थिक कठीणतेच्या काळात तर हवीच हवी.
मित्रांनो, मला काय वाटते, या काळाकडे आपण संकटाचा काळ म्हणून न बघता सुसंधीचा काळ म्हणून पाहिले पाहिजे. कदाचित जगातील कालगणना कोरोनापूर्व व कोरोना पश्चात् अशी होण्याची शक्यता आहे. जगात खूप प्रकारचे मोठे बदल अपेक्षित आहेत. उद्योगधंद्याचा व त्यांच्या उत्पादनाचा प्रकार बदलणार आहे. उत्पादनाच्या पद्धतीचा पोत बदलणार आहे. शिक्षण क्षेत्रात तर आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. करमणुकीच्या क्षेत्रातील सेवांमध्ये कपात होणार आहे. तर पर्यटनाच्या खर्चाला कात्री लावली जाणार आहे. येणारा काल हा राष्ट्रकार्यासाठी राष्ट्राच्या आर्थिक उद्धारासाठी जास्तच नव्हे तर जास्तीत जास्त उत्पादन कार्यक्षमतेचा असणार आहे आणि त्यामध्ये आपले सर्वांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
 
आणि म्हणूनच या काळाचा उपयोग आपल्याला स्वतःच्या अंतरंगात डोकावण्यासाठी करावयाचा आहे. आपणा सर्वांकडून SWOT विश्लेषण अभिप्रेत आहे. यामुळे होईल काय, तुम्हा सर्वांना स्वतःची बलस्थाने कळतील. स्वतःची कमजोरी कोणती आहे ते कळेल. तुमच्या समोरील धोके कोणते आहेत व आव्हाने कोणती आहेत याची तुम्हाला जाणीव होईल आणि सर्वात मुख्य म्हणजे या सर्वांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणत्या सुसंधी उपलब्ध आहेत याचे ज्ञान अवगत होईल. तेव्हा विद्यार्थ्यांनो, या काळात जरूर आत्मपरीक्षण करा व नवीन संधीचा लाभ घ्या. मळलेली पायवाट तुडवण्यापेक्षा यशाकडे नेणारा नवीन मार्ग शोधा व त्या मार्गावर चालू लागा.
 
या काळाचा उपयोग स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी करू या. आत्मपरीक्षणानंतर कळलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करू या. घरातील कुटुंबियांतील कटुता टाळण्यासाठी आपणच संवादाने, खरंतर सुसंवादाने सुरवात करू या. परस्परांतील नातेसंबंध सौहार्दपूर्ण करू या आणि एकीचे- कौटुंबिक कलह दूर सारून- एकोप्याचे दर्शन घडवू या. कारण हाच एकोपा- सामाजिक एकोपा व पर्यायाने राष्ट्राची एकी- सर्व नागरिकांची एकी कोरोना पश्चात् येणा-या आर्थिक संकटावर मात करण्यास आपणांस अधिक सक्षम करणार आहे. कोरोनामुक्त भारतात आपण कोणतीही सुट्टी न घेता काम करू या व आपल्या देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा संकल्प करू या.
 
पण आज सर्वांनी घरात रहा, सुरक्षित रहा... उद्याच्या कार्यप्रवण भारतासाठी!
 
डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई 
....