टाळेबंदीची पंचसूत्री

Source :    Date :15-Apr-2020
|
बुधवार, दि.१५/४/२०२०
                                                                 
विद्यार्थी मित्रांनो,
गेले जवळजवळ २०-२२ दिवस संचारबंदी- टाळेबंदीच्या नष्टचर्यातून आपण सर्वच जण जात आहोत. देशरक्षणासाठी घरी बसणे- गर्दी टाळणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे. सरकारी निर्देशानुसार अजून किमान १८ ते २० दिवस आपल्याला घरीच बसणे क्रमप्राप्त आहे. सदर काळ हा आपणा सर्वांसाठीच कठीण परीक्षेचा काळ आहे. पण तो टाळणे अशक्य आहे. हा काळ आपण स्वतः चिडचिड, निराशा, वैफल्यग्रस्त होऊन काढण्यापेक्षा याचा सदुपयोग करू या. एकांतवासातून आनंदवासाची यात्रा करू या. या काळात आपण स्वतःच्या जीवनाची एक अलग पंचसूत्री अंगिकारली पाहिजे.
 
यातले पहिले सूत्र म्हणजे Be a Energetic. हा काळ कंटाळ्यात व्यतित करण्यापेक्षा, सकारात्मक ऊर्जा मिळवावी व त्या मिळालेल्या ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी वापरा. सकारात्मक ऊर्जा नक्कीच आपल्याला नकारात्मक अंधाराकडून प्रकाशाकडे वाट दाखवेल. दुसरे महत्त्वाचे सूत्र म्हणजे Engaged in work. घरातील छोटे मोठे काम यथाशक्ती यथामती करा. घरातील कामात सिंहाचा वाटा नसेल तरी खारीचा वाटा नक्की उचला. आपल्या परिसरामध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणी एकटे राहात असेल तर त्याची दूरध्वनीवरून चौकशी करून त्याला मानसिक पाठींबा द्या. त्याचे मनोधैर्य वाढवा. समाजमाध्यमाचा, दूरदर्शनचा कमीत कमी वापर करा. विनाकारण मोबाईल गेम खेळत बसू नका.
 
संचारबंदीच्या काळात अंगिकारण्याचे तिसरे सूत्र म्हणजे Exercise. रोज नियमितपणे व्यायाम करा. योगासने करा. खाण्याची बंधने पाळा. 'सुदृढ शरीरात सुदृढ मन' या उक्तीची आपण व्यायाम, योगासने केल्याने प्रचीती द्याल.या पंचसूत्रीचे चौथे सूत्र आहे Entertainment. उत्तम दर्जाची स्वतःची करमणूक करा व कुटुंबात आनंद पसरवा. मानसिक दौर्बल्यावर आपण आनंदाच्या पखरणी करून निराशेवर मात करा. हलके-फुलके सिनेमे बघा. नाटके बघा. जुनी, दुर्मीळ, ई-स्वरूपातील आपल्याला रुची असलेल्या विषयातील पुस्तके वाचा. घरात बसून बैठे खेळ खेळा. ज्या विषयात आपल्याला गती नाही, त्या विषयांची माहिती करून घेण्यासाठी, ज्ञान संवर्धनासाठी, न आवडत्या विषयांवरचीही पुस्तके वाचा. स्वतः आनंदी व्हा व आनंदाची कुटुंबात लूट करा.
 
पाचवे आणि शेवटचे सूत्र म्हणजे Edu- Entertainment. मनोरंजनातून शिक्षण. मनोरंजनाकरीता वैचारिक पुस्तके वाचा. निरनिराळे परिसंवाद ऐका किंवा करा. वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांची मते जाणून घ्या. वैचारिक सिनेमे किंवा नाटके बघा. इतिहासात डोकावून बघता बघता भविषयकाळाचा वेध घ्या. तंत्रज्ञानाच्या विकासाचे अवलोकन करा व नवनवीन तंत्रज्ञान अवगत करा.
पण हे सर्व करतानाचा एकच मंत्र आणि तो म्हणजे घरी बसा आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखा.
...
डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई