देव भक्ताघरी धावला!

Source :    Date :16-Apr-2020
|
गुरुवार, दि.१६ / ४ /२०२०
 
कुठेतरी रेडिओवर लागलेल्या गीताचे शब्द कानी पडत होते.
कबिराचे विणतो शेले,
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम|
भाबड्या भक्तासाठी, देव करी काम|
कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम||
 
गीताचे शब्द कानी पडताच टाळेबंदीमुळे रिकामे असलेले मन विचारप्रवण झाले. मेंदू तरतरीत झाला व अनेक विचार डोक्यात रुंजी घालू लागले. माझ्यातील संशोधक व तोही समाज संशोधक जागा झाला व मनात आले, खरंच देव भक्तासाठी धावून येतो का? की या केवळ कविकल्पनाच? भारतासारख्या निधर्मी देशात राहात असताना सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात उदारमतवादी बुद्धिवंतांच्या मते देवळे बांधण्यावर केलेला खर्च हा व्यर्थ असून रुग्णालयांची, शाळांची निर्मिती होणे आवश्यक होते. शाळा, रुग्णालये बांधणे व मंदिरे बांधणे यांचा परस्परांशी विशेष संबंध नसताना उगाचच धार्मिक स्थळांवर व त्यावरील खर्चावर टीका करण्यात येत आहे. वास्तविक पाहता प्रत्येक संकटाच्या वेळी भारतामध्ये मंदिर संस्थानांनी, धार्मिक नेत्यांनी, विविध धर्मदाय न्यासांनी कायमच मदतीचा हात पुढे केलेला आहे.
 
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांसाठीसुद्धा विविध धार्मिक संस्था पुढे आल्या आहेत.दक्षिणेतील कांची मठाने  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीला प्रत्येकी रु. दहा लाख देऊ केले आहेत. पाटणास्थित महावीर मंदिर ट्रस्टकडून रु. एक करोडची मदत तेथील राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करण्यात आली आहे. जम्मू- काश्मिर राज्यातील माता वैष्णोदेवी मंदिराने किराणा धान्याचे वाटप कत्रा वस्तीतील लोकांसाठी चालू केले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा प्राधिकरणाला देवस्थान ट्रस्टने त्यांचे ६०० रुग्णांचे रुग्णालय होऊ शकेल एव्हढे आशिर्वाद काॅम्प्लेक्स देऊ केले आहे. छत्तीसगड राज्यातील महामाया मंदिर न्यासाने राज्य शासनाला आर्थिक मदत करतानाच रेड क्राॅस सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेला मदत करायचे भान ठेवले आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराने गुजरातमधील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक करोड रुपयांची भरीव आर्थिक मदत केली आहे. तसेच तेथील अंबाजी मंदिर संस्थेने तशीच भरीव आर्थिक मदत केलीच आहे, पण गोरगरीबांना रोजचे जेवण वाटण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा देवस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.५१ करोड दिलेच आहेत, पण साईबाबा देवस्थान रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना रोजचे जेवण देत असून साई प्रसादालयमधून रोज तेथील सर्व पोलीसांची भोजनाची व्यवस्था करीत आहे. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिर संस्थानने रु. दोन कोटींची आर्थिक मदत करताना कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक मदत केली आहे. स्वामी नारायण मंदिर संस्थानने त्यांच्या भारतभर असलेल्या धर्मशाळा रुग्णांच्या विलगीकरणासाठी देऊ केल्या आहेत. तसेच आर्थिक मदत देतानाच रुग्णांची रोजच्या जेवणाची सोय केली जात आहे. योग-गुरु बाबा रामदेव यांनीसुद्धा रु. दोन कोटी देण्याची घोषणा केली आहे. आपल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक न्याससुद्धा रुग्णांच्या मदतीसाठी नेहमीप्रमाणेच यावेळीही अग्रेसर राहिला आहे. यासारखी अनेक देवालये, धार्मिक संस्था आर्थिक व आर्थिकेतर मदत करण्यास पुढे येत आहेत व मोलाचे योगदान करीत आहेत.
 
संकटाच्या काळात संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला आर्थिक मदत करून, तसेच समाजातील तळागाळातील गरजू लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून एक प्रकारे परमेश्वरच सर्व नागरिकांच्या मदतीला धावून येत आहे.निमित्त माध्यम मात्र देवालये, मंदिरे, धार्मिक संस्था वगैरे. दुष्काळाच्या काळात पंढरपूरचा विठ्ठल विठू महाराचे रूप घेऊन येतो व राजाचे धान्याने भरलेले गोदाम विकत घेऊन जनतेला धान्य पुरवतो ही आख्यायिका आपण सर्वांनी ऐकली आहेच. आज त्याच विठू महाराने केलेल्या मदतीचा प्रत्यय निरनिराळ्या देवालय संस्थानांनी केलेल्या मदतीवरून येत आहे. कबिराचे शेले विणणारा राम, द्रौपदीच्या पाठी भावासारखा उभा राहणारा महाभारतातील श्रीकृष्ण, थोर मोठ्या संतांना त्यांच्या रोजच्या दिनक्रमात मदत करणारा त्यांचा पांडुरंग आज आपल्याला डाॅक्टर, पोलीस, वाॅर्ड बाॅय, बँक कर्मचारी यांच्या रूपात दिसत आहे.
 
परमेश्वर नक्कीच भक्ताची काळजी घेतो. त्याचा पाठीराखा असतोच. केवळ त्याचे दर्शन घेण्याची दृष्टी आपल्याला हवी. तो कोणत्या व कशा रूपात आपल्याला दर्शन देईल, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. ती नजर आपल्याकडे असली पाहिजे. चला तर मग, अशा परमेश्वराचे आपण दर्शन घेऊ या.
हो, पण तेही घरात राहूनच, सुरक्षितपणे.
...
डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई