|| तेथे कर माझे जुळती||

Source :    Date :17-Apr-2020
|
शुक्रवार, दि.१७ /४ /२०२०
 
आपणा सर्वांना संकटकाळात नेहमीच आपल्या तारणहाराची प्रकर्षाने आठवण येते. त्याचे दर्शन होईस्तोवर आपला जीव कासावीस झालेला असतो. आपले मन नकळत 'निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो' म्हणून गुणगुणत असते. मनात विचार येतो की जादूची काडी फिरावी व कोरोना विषाणूचे संकट विश्वातून हद्दपार व्हावे. संकटातून वाचवणारा एखादा डोरोमाॅन प्रत्यक्ष जीवनात का येत नाही? तारणहार सिंबा कुठे बरं दडलाय?
 
विचार करता करता लक्षात आले, आज निरनिराळ्या स्तरावर अहोरात्र काम करणारे वैद्यकीय सेवा देणारे डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबाॅय, प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ हे सर्व परमेश्वराच्याच रूपाने आपल्यापर्यंत पोचत आहेत. आपल्या संकटकाळात संकटमोचक हनुमानाच्या रूपात आपल्यापर्यंत पोचत आहेत. वैद्यकीय सेवा देणारे सर्वच आज आधुनिक काळातील दधिची आहेत. आपल्या उन्नत व उत्तम ऋषींची परंपरा आजच्या काळातही चालवत आहेत. त्यानंतर मला दर्शन होते ते ३६ तास अहोरात्र सेवा देणा-या जनतेच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उन्हातान्हात उपाशीपोटी काम करणा-या पोलीस दलातील कर्मचा-यांचे. एव्हढे कष्टप्रद कर्तव्य बजावूनसुद्धा ते कायम जनतेच्या रोषाचे बळी असतात. समाजातून त्यांना कायम उपेक्षाच सहन करावी लागते.
 
पण आपल्या भक्तासाठी ज्याप्रमाणे परमेश्वर कितीही खस्ता खातो त्याप्रमाणे पोलीस कर्मचारी अविरतपणे निरंतर आपली सेवा बजावत आहे. आजच्या या तणावग्रस्त काळातसुद्धा जीवावर उदार होऊन काम करणारे बँक कर्मचारी, निरनिराळ्या माध्यमांचे प्रतिनिधी, सफाई कामगार, अग्निशमन दलाचे कर्मचारी, वीज- पाणी पुरवठा करणारे, किराणा मालाचे विक्रेते, भाजीपाला- दूध पुरवठादार हे सर्वचजण जीवाची बाजी लावून आपणापर्यंत पोचत आहेत, ते केवळ आपल्याला विनासायास जगता यावे म्हणून! या सर्वांमधेच मला परमेश्वराचा अंश दिसतो.
 
आपल्या केंद्र सरकार व राज्य सरकारांना मदत करण्यासाठी मोठे मोठे उद्योगपती आर्थिक मदत देत आहेत व सुसज्ज रुग्णालयांची निर्मिती करत आहेत. शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ रोग निवारणासाठी औषधांच्या संशोधनामध्ये, निर्मितीमध्ये अथक प्रयत्न करीत आहेत. हे सर्व आधुनिक काळातील संतच म्हणायला हवेत. या सर्वांबरोबर आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, इतर वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिका-यांपासून ते ग्राम पातळीवर काम करणारे अधिकारी अहोरात्र काम करीत आहेत व जनतेला या संकटावर आपण मात करूच, हे कोरोना विरोधातील युद्ध आपण जिंकणारच, असे मनोबल देऊन आश्वस्त करीत आहेत.
 
मला वाटते, आज हे सर्वचजण परमेश्वराच्या रूपात आपणासाठी कार्यरत आहेत व जनतेची काळजी घेत आहेत. या सर्वांचा मान राखणे व त्यांना वंदन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यांच्यातील देवत्वाची आपण अनुभूती घेऊ या व त्यांना नमन करू या.
 
हो, पण तेही घरात राहून! गर्दी टाळून!!
...
डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई