"मेरा भारत महान"

Source :    Date :18-Apr-2020
|
शनिवार, दि.१८/ ४/ २०२०
 
या संचारबंदी- टाळेबंदीच्या पहिल्या पर्वात मा. पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार होते. आज काय घोषणा करणार, याबद्दलचे औत्सुक्य छातीची धडधड वाढवत होते. तेव्हढ्यात मा. पंतप्रधानांनी टाळेबंदीचा काळ परत २० दिवसांनी वाढवल्याची घोषणा केली. एकीकडे वाढत्या रुग्णसंख्येकडे बघून सदर घोषणेमुळे मनाला हायसे वाटले. पण दुसरीकडे अजून २० दिवस घरात कैद होऊन बसायचे या कल्पनेने अंगावर काटा आला.
या सर्वच परिस्थितीचा साकल्याने विचार केला, तेव्हा माझ्या मनात आपल्या भारत देशाबद्दल, आपल्या नेत्याबद्दल प्रचंड आदर दाटून आला. जगातील मजबूत आर्थिक परिस्थिती असलेले देशसुद्धा भविष्यात अर्थव्यवस्था डबघाईला जाईल या कल्पनेने टाळेबंदी जाहीर करण्यास कचरत होते. तेथे भारतासारखा देश जेथे १३० कोटीहून जास्त लोकसंख्या आहे व ज्याच्या आर्थिक वृद्धीचा दर दोन आकड्यांपर्यंतसुद्धा पोहोचत नाही, सर्वत्र मंदीचे सावट असतानासुद्धा केवळ जनतेच्या सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी दुस-या पर्वातील संचारबंदीची घोषणा करीत होता. देशाचे नागरिक वाचले पाहिजेत, त्यांच्यासाठी सरकारी खजिना रिकामा झाला तरी चालेल, पण जनता सुरक्षित राहिली पाहिजे, हीच केवळ उदात्त भावना यामागे होती. भारतीय संस्कृती पुरातन आहे व त्याच्या केंद्रस्थानी माणूस- कुटुंब- कुटुंबिय- समाज- समाजव्यवस्था हीच प्रेरणा आहे. 'जान है तो जहान है' या उक्तीला अनुसरूनच सदर घोषणा करण्यात आली. जगात ज्या देशाला त्याच्या अती लोकसंख्येमुळे हिणवले जात होते, अंधश्रद्धा व रूढीत गुरफटलेला आहे असे मानले जात होते तोच माझा भारत देश आज जगातील बलाढ्य देशांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक औषधे पुरवण्यास सिद्ध झाला आहे. एक भारतीय नागरिक म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.
आज सगळे जग कोरोनाच्या विळख्यात असताना व जगातील अनेक देश या परिस्थितीपुढे शरण गेले असतानासुद्धा भारत मात्र अजूनही ठामपणे पाय रोवून उभा आहे. भारतातील डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलीस दल आलेल्या संकटाशी दोन हात करण्यास सिद्ध झालेले आहेत. शासन व्यवस्था गंभीर परिस्थिती असली तरी खंबीरपणे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभी आहे. या सगळ्यांसाठी आपला भारतीय समाज (काही अपवाद वगळता) असामान्य धैर्य दाखवून सहकार्य करीत आहे. भारतीयांना अशिक्षित, अडाणी, गावंढळ, बेशिस्त, गचाळ म्हणून सतत हिणवणारे पाश्चात्य जग आज त्याच भारताकडे अचंबित होऊन डोळे विस्फारून बघत आहे.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता भारतीय जनतेसाठी fluid intelligence अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे. बदलत्या परिस्थितीनुसार, मग ती राजकीय, कौटुंबिक, सामाजिक वा आर्थिक कोणतीही असो, स्वतःला त्याप्रमाणे घडवण्याची, बदलवण्याची व त्यात तगून राहण्याची क्षमता आपल्या भारतीयांमध्ये भरपूर आहे. कित्येक वर्षे इंग्रजांच्या सत्तेमुळे आणि त्यानंतर राजकारणामुळे आपण सतत प्रतिकुलतेशी संघर्ष करतच जगतोय. संघर्ष हा आपणा सर्वांच्या रक्तातच भिनलाय. त्यातूनही आपण प्रचंड प्रगती केली आहे.
टाळेबंदीच्या दुस-या पर्वात जाऊनसुद्धा आपला भारतीय समाज खूपच शांत आहे. काही उडदामाजी काळे अपवादात्मक सोडल्यास जनता सहकार्य करीत आहे. समाजातील व्यक्ती एकमेकांना धरून आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत. समाजातील गोरगरीब जनतेसाठी उद्योगपतींबरोबर सामान्य माणसेही मदतीत खारीचा वाटा उचलत आहेत. अन्नधान्य, पाणी, रोजचे जेवण गरजूंपर्यंत पोचवले जात आहे. त्या सर्व वर्तनापाठी भारतीय सनातन उदात्त संस्कृती दडलेली आहे. भारतीय संस्कृतीत असलेल्या मूल्याधारित व्यवस्थेमध्ये मदतीच्या वर्तनाची बीजे दडलेली आहेत आणि हे सर्व करताना परिस्थितीचे गांभीर्य जाणलेले असताना परिस्थितीचा बाऊ न करता त्याला अतिशय शांत, संयमी व धीरोदात्तपणे तोंड आपला भारतीय समाज देत आहे.
 
आणि म्हणूनच माझ्या मते भारत जगामध्ये आर्थिक महासत्ता बनायचा तेव्हा यथावकाश बनेलच; पण महत्त्वाचं म्हणजे संकटाच्या काळात केवळ भारतीय समाजाचाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला मंगलतेच्या, पवित्रतेच्या पथावरून चालण्यासाठी दिशादर्शक ठरेल यात तीळमात्र शंका नाही. अशा या उदात्त भारतीय परंपरेचा पाईक होण्याची संधी मला मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. अशी ही उदात्त संस्कृती रुजवणा-या सर्व पूर्वजांना, संत महात्म्यांना आणि समाज सुधारकांना आपण अभिवादन करू या.
म्हणूनच घरात रहा. सुरक्षित रहा..... उद्याच्या विजयी भारताची पताका मिरवण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई