अशी ही (पदार्थांची) बनवाबनवी!

Source :    Date :20-Apr-2020
|
सोमवार, दि.२०/४/२०२०
 
संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात स्वयंपाकघरात गरजेपेक्षा जास्त न वावरणारी मी हल्ली अन्नपूर्णेच्या आवेशात उगाचच वावरत असते. उगाचच मला माझ्या शरीरात अन्नपूर्णा देवी वास करायला आल्याचा भास होत आहे व द्रौपदीच्या थाळीनंतर अनुजाची थाळी इतिहासात अजरामर होणार, असे वाटू लागले आहे. थोडक्यात काय तर सध्या माझ्या पाककलेला बहर आलेला असून माझा कौशल्य विकास चालू आहे.
 
यात सर्वात महत्त्वाची पहिली पायरी ती कोणती? तर घरातील उपलब्ध सामानाची झाडाझडती घेणे व त्यानुसार रोजचा सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा बेत ठरवणे. जेव्हा आवश्यक सामानाची वानवा लक्षात येते तेव्हा माझ्यातील संशोधक जागा होतो व उलटसुलट पदार्थ कमीजास्त प्रमाणात वापरून एका नवीन पदार्थाचा उगम होतो. शाळेत असताना एक रंग दुस-या कोणत्या रंगात मिसळला असता तिसरा रंग निर्माण होतो, याचे ज्ञान चित्रकलेमध्ये मिळाले होते. पण आता 'भागवाभागवी'चा स्वयंपाक या विषयावर ब-यापैकी प्रभुत्व मिळवले आहे. सकाळी कांदे पोह्याने सुरू होणारा नाश्ता दुपारी पालक पनीर किंवा छोले ताटात पडल्यामुळे राज्यांच्या सीमांपलीकडे कधी जातो ते कळतही नाही. तर रात्री पिझ्झा- पास्ता बनून केवळ देशाच्याच सीमा ओलांडतो असे नाही तर दुस-या खंडातही जाऊन पोचतो. व उगाचच मला आपण आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी असल्याचा अभिनिवेष चढतो. बिचारे स्वयंपाकाचे पदार्थ काय हो 'आकार द्यावा तशी मूर्ती घडते' या उक्तीनुसार प्रांत, देश, खंड यांच्या सीमा पार करून एकात्मतेचे उत्तम दर्शन देत असतात. माणसाच्या मनातल्या सुखाचा मार्ग हा माणसाच्या पोटातून जातो, याचाच प्रत्यय येतो.
 
मला आठवते, पूर्वीच्या काळी नवीन पदार्थ बनवला की माझी आजी मला प्रथम देवासमोर ठेवण्यास सांगत असे. माझे वडील, माझे काका यांना आजही मी जेवणापूर्वी चित्राहुती घालताना पाहत आहे. स्वतःच्या जेवणापूर्वी पंचमहाभूतांना दिलेले एक प्रकारचे अर्घ्यच ते. पण आजच्या काळात तसे करून चालत नाही. 'आधी फोटोबा व नंतर पोटोबा' यानुसार प्रत्येक पदार्थ हा कॅमे-यासमोर ठेवून, त्याचा फोटो काढून समाज माध्यमावर टाकावा लागतो. असे फोटो टाकून आजच्या काळातील या आधुनिक मंथरा घराघरात तेढ वाढवतातच, पण त्याचप्रमाणे जळकेपणाचा खमंग वासही देतात.
 
भरपूर उपलब्ध असलेल्या फावल्या वेळामुळे व प्रवासात शक्ती खर्च होत नसल्याने पाककलेची माझी खुमखुमी दिवसेंदिवस वाढतच आहे. कारण आमच्या घरातील मुले चिमणीच्या पिल्लांप्रमाणे कायमच चोची उघडून तयार. आणि यांच्या चोचींना काहीच वर्ज्य नाही. बटाट्याच्या किसापासून ते फ्रेंच फ्राइजपर्यंत, कुळिथाच्या पिठल्यापासून ते डाळ- पालकपर्यंत, साबुदाण्याच्या खिरीपासून ते उकडीच्या मोदकापर्यंत, अहो एव्हढंच काय, वरण भातापासून ते शाही पुलावापर्यंत सर्वच पदार्थांकडे समानतेच्या न्यायाने बघून कधी गिळंकृत करतात ते कळतच नाही. या सर्व यज्ञात केवळ आधुनिक काळातील पदार्थच मिरवून घेत आहेत असे नाही, तर कोळाचे पोहे, उकड, पानग्या, तांदळाच्या फेण्या, उकडीची थालीपिठे, यासारखे कमी परिचित, पण जुन्या काळातील पदार्थपण मधेच डोके वर काढून स्वयंपाकघरात मानाचे स्थान मिळवत आहेत.
ही कहाणी एव्हढ्यावरच थांबत नसून घरातील गृहिणींच्या वर्तनातून प्रेरणा घेऊन आज घरोघरी नवनवीन बल्लवाचार्य उदयास येत आहेत. काही नाही तरी कुकरमध्ये बनवलेला पाव व डॅलगोना काॅफी बनवून किमान पाककलेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागत आहे. नवनवीन पदार्थांचे फोटो स्टेटसवर टाकून लोकांची वाहवा- लाईक्स मिळवणे हे आजच्या नव बल्लवाचार्यांना अनिवार्य आहे.
 
आता तुम्ही विचाराल, देश एव्हढ्या गंभीर परिस्थितीतून जात असताना, अनेक नागरिक उपाशी असताना तुम्हाला बरे जिभेचे चोचले पुरवायला जमते? हेच का ते तुमच्यावरील संस्कार? हीच का ती तुमची सहवेदना? पण वाचकहो, कृपया कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. आपल्यासाठी झटणा-या लोकांची शक्य तेव्हढी काळजी घेऊन, आर्थिक मदत करून, शेजारीपाजारी राहणा-या एकट्यादुकट्याला जेवण पुरवून, शेजारच्या वृद्ध आजीआजोबांना जेवणाचा डबा देऊन आम्ही आमचे समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडतच आहोत. खरंतर एखादा पदार्थ बनवायला काय लागते हो? मुख्य धान्य, तिखट, मीठ, साखर, मसाल्याची फोडणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंचितसे मन! पदार्थ बनवताना इतर व्य॔जनाबरोबर गृहिणीने थोडेसे मन घातले ना की मग सदैव देवी अन्नपूर्णा तिच्यावर वरदहस्त ठेवते. यातूनच गृहिणीची आपल्या कुटुंबियांविषयीची काळजी, त्यांच्याप्रती असलेले तिचे निर्व्याज प्रेम दिसून येते. आपल्या भारतीय संस्कृतीत घरोघरी आपल्याला अशा अन्नपूर्णा आढळून येतील. अशा सर्व गृहिणी ज्या आपल्या कुटुंबियांची, शेजा-यापाजा-यांची, पर्यायाने समाजाची काळजी घेत आहेत, त्या सर्व गृहिणींना त्रिवार वंदन!
 
चला तर मग घरात राहून, गर्दी टाळून, तुम्हीही स्वयंपाक प्रवीण व्हा!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई