जगायचं कसं? रडत रडत की गाणं गुणगुणत?

Source :    Date :23-Apr-2020   
|
सध्या फुरसतीचा वेळ मुबलक असल्याने गुगलवर सर्फिंग करण्यात भरपूर वेळ घालवता येतो. आज दुपारी असेच गुगलत असताना 'जोस साल्वादोर अल्वारेंगा' नामक एका मॅक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क कसा ४३८ दिवस जिवंत राहिला, याची अंगावर रोमांच उभे करणारी घटना वाचनात आली. ह्या तब्बल ४३८ दिवसांत त्याच्याजवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, समुद्राच्या पोटातील जलचर, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र! काही घटना या मती स्तिमित करणा-या आणि माणसाच्या जीवनसंघर्षाची परिसीमा गाठणा-या असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही संसाधने उपलब्ध नसताना जेथे अस्तित्वच टिकवणे कठीण होऊन बसते, अशाही परिस्थितीत माणसे विजयी होतात. परिस्थितीला शरण जात नाहीत. तेव्हा संघर्षातून आपल्याला जीवन जगायची प्रेरणा मिळते.
 
आजच्या या चंगळवादी मानसिकतेने प्रेरित झालेल्या लोकांमध्ये ( विशेषतः तरुणांमध्ये) खाजगीकरण, उदारमतवाद आणि जागतिकीकरणामुळे गरजांचा महापूर आला. हातात मिळणारा भरपूर पैसा व जाहिरातींचा भडिमार यामुळे सर्वत्र खरेदीचा सुळसुळाट झाला. केवळ दिखाव्यासाठी प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून वस्तू विकत घेताना वस्तूची आवश्यकता हा निकष केव्हाच मागे पडला. वस्तूचा उपयोग यापेक्षा तिच्या स्वामित्वाची भावना माणसाला जास्त सुखावू लागली. माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढल्या व त्या पूर्ण करण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. आणि यामुळे त्याचे सुख, समाधान, शांती त्याच्या हाताशी तर आले नाहीच, पण प्रचंड असुरक्षितता, एकाकीपणा, नैराश्य, वैफल्य याला आजचा तरुणवर्ग बळी पडू लागला.

peace of mind_1 &nbs 
 आणि अशा परिस्थितीत आपण साधे- सोपे अडचणींचे प्रसंगसुद्धा अत्यंत आक्रस्ताळीपणाने व चिडचिड करत हाताळतो. सहज, सोप्या आणि प्रश्नविरहित बेगड्या जीवनाची आपल्याला एव्हढी सवय झाली आहे की थोडीफार जरी परिस्थिती बिघडली तरी आपण मनोरुग्ण होतो. आता या टाळेबंदीच्याच काळाचे उदाहरण घ्या ना! आपल्याच जीवाच्या सुरक्षिततेसाठी घरात बसणे अत्यावश्यक असताना उगाचच विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांची संख्या काय कमी आहे? भले मुबलक प्रमाणात नसेल तरी अत्यावश्यक सामान उपलब्ध असतानासुद्धा स्वयंपाकघराचे गोदाम करणारी माणसे काय कमी आहेत? घरातील एखादे जरी किराणा सामान संपले किंवा कोथिंबीर जरी अशा संचारबंदीच्या काळात मिळाली नाही तरी कासावीस होणारे सुखात्मे आपल्याला घराघरात आढळतात. संचारबंदीच्या काळात दारू न मिळाल्याने घसा कोरडा राहिल्याने कंठशोष करणारी तरुणाई बघितली की मन उद्विग्न होते. आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य नाही, परिणामांची जाणीव नाही, समाजाबद्दल सहवेदना नाही व आपल्या सर्व जाणीवा बोथट झाल्याचे निदर्शनास येते. वास्तविक मनामनातले अंतर कमी झालेले असताना सामाजिक अंतर राखणे कितीसे कठीण आहे? पण नाही. मी आणि मीच यात सदैव मश्गूल असलेल्यांना सामाजिक बांधिलकीचे काय ते भान असणार? अर्थात यातसुद्धा अपवाद आहेत व त्यांच्याच बळावर ही चराचर सृष्टी नांदत आहे. पण समाजातील मोठा घटक फक्त स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी आणि स्पर्धात्मक वृत्ती या अपप्रवृत्तींना केवळ बळी पडलेला असून पूर्णपणे त्याच्या आहारी गेलेला आहे. अत्युच्च दर्जाची महत्त्वाकांक्षा, चंगळवाद आणि मानसिक अस्थैर्य हेच त्याच्या जीवनाचे नवीन पैलू उदयास येत आहेत.
 
वास्तविक पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत 'ठेविले अनंते, तैसेचि रहावे| चित्ती असू द्यावे, समाधान||' हे वारंवार मनावर बिंबवले असले तरी जरा जरी आपण आपल्या सुखद कक्षामधून (comfort zone) बाहेर आलो तरी आपले रडगाणे, जीवनाविषयक तक्रारी, आक्रस्ताळेपणा याला सुरवात होते. आलेल्या गंभीर परिस्थितीला संयमाने, धैर्याने तोंड देणं आपण विसरून चाललो आहोत की काय, या विचाराने मन भयभीत होते. त्यातूनच कित्येक मंडळी व्यसनाधीन होतात व आपल्या आयुष्याची राखरांगोळी करतात
.
तेव्हा मंडळी, जे आहे जसे आहे त्याचा स्वीकार करा आणि रडतरडत न जगता गाणं गुणगुणत जगा! हो, पण गाणं गुणगुणायला बाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा, गर्दी टाळा, उद्या उच्च रवाने गाण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई 
.