||मन करा रे प्रसन्न||

Source :    Date :26-Apr-2020   
|
रविवार, दि.२६/ ४/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात व्हाॅटस् अॅप विद्यापीठातून ऑन लाईन शिक्षण घेत असताना एक व्हिडिओ निदर्शनास आला. अॅपल या विख्यात अमेरिकन कंपनीचा सह- संस्थापक असलेला व अमेरिकेतील बलाढ्य उद्योगपती स्टीव्ह जाॅब्स यांच्या संदर्भातील तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये स्टीव्ह जाॅब्स यांनी त्यांना उमगलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडले होते.
वयाच्या ५६व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने देवाघरी गेलेला हा कोट्याधीश उद्योगपती संपत्ती पायाशी लोळण घेत असूनसुद्धा मरणाच्या दारात उभा असताना निरोगी आयुष्य मिळवण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झाल्याने हळहळत होता.
 
पण मिळवलेली संपत्ती आपल्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना एकवेळ सुखी करू शकेल, आनंदी करू शकेल, पण स्वतःच्या सुखाचे- मनाच्या समाधानाचे काय? आपल्या अंतर्मनातील आनंद कधीही भौतिक सुखाच्या वस्तूंच्या उपभोगातून येत नाही. आत्मकेंद्रित वृत्तीने झपाटल्यामुळे केवळ पैसा- संपत्ती मिळवून रात्रीची शांत झोप लागत नाही. दिनचर्या चालावी, उत्तम आयुष्य मिळावे, म्हणून अर्थार्जन हवे हे नि:संशय! पण त्याची अतिलालसा माणसाला विनाशाकडे नेऊन त्याचा कडेलोट करते. आणि या सर्व संपत्ती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अंध झाल्याने कित्येकदा आपण आपली नीती, विचार, आचार, सदसद्विवेक विसरून बसतो. आणि ज्यावेळी आपण भानावर येतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
 
 
 
अवाजवी संपत्ती मिळवून आनंदी होण्याचा मार्ग अवलंबण्यापेक्षा सुखाच्या मुक्कामी जाणारे इतरही मार्ग आहेत. आपल्या जोडीदाराबरोबर, कुटुंबियांबरोबर, सहका-यांबरोबर व मित्रमंडळींबरोबर गप्पा मारा, गाणी म्हणा, खेळा, निसर्गात सर्व दिशांत बागडा व मस्त विहार करा. हास्याचे फवारे उडवा. त्यात न्हाऊन जा.
 
आपल्या भावी पिढीलापण आपले आयुष्य सुखी, आनंदी जगण्यासाठी कानमंत्र दिला पाहिजे. कारण समाधान हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे. माणूस असणे आणि माणुसकी असणे यात जमीन- अस्मानाचा फरक आहे. आपण माणुसकी मिळवण्यावर जास्त जोर दिला पाहिजे. या सगळ्यासाठी जर का कसली गरज असेल तर ती सर्वप्रथम मुक्तपणे व्यक्त होण्याची! आपण आपल्याच भावना मनापासून व्यक्त केल्या पाहिजेत. कुठेही खळखळ होता कामा नये. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, 'कळा येथूनी आलीया, विद्या इथेचिया गेलीया!' म्हणजे आधी कळ आणि नंतर विद्या हीच संकल्पना आहे. एकदा आपण मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकलो की दुसरा आधार घ्यायचा तो विनोदाचा. सर्व दुःखांवर विनोदासारखी औषधाची मात्रा नाही. विनोदाने थोडा वेळ का होईना, ओठावर हास्य उमलते व मनातील दुःखाचा निचरा होऊन मन आनंदी होते.
 
विशेष करून या संचारबंदीच्या काळात कंटाळून जाऊन निराशेने मन वैफल्यग्रस्त करून मनावरील तणाव वाढवण्यापेक्षा मुक्तपणे व्यक्त होऊन आनंदाची निर्मिती करणे ही या क्षणाची जरूर आहे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 'मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धींचे कारण||' आपली प्रत्येक इच्छा, आकांक्षा, मनोकामना सिद्धीस न्यावयाच्या असतील तर मन सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरून त्यानुसार वर्तन अनिवार्य आहे. म्हणजेच मन सदैव आनंदी, प्रसन्न ठेवणे जरुरीचे आहे. हे संकटांचे दिवस जसे आलेत तसे जातीलही. पण जाताना मनावर काळजीचे सावट सोडून जातील. आणि जर हे टाळायचे असेल तर मन प्रसन्न, आनंदी, उत्साही करण्याची नितांत आवश्यकता आहे.
 
चला तर मग, आनंदी होऊ या, समाधान पसरवू या! हो, पण घरात राहून, सुरक्षितपणे!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई