"माणूस नावाचे बेट"

Source :    Date :01-May-2020   
|
 शुक्रवार, दि.१/ ५/ २०२०
 
संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फावल्या वेळात डिजिटल स्वरूपातील वृत्तपत्रांची पारायणे करीत असताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने केलेली घोषणा वाचनात आली. 'टीसीएस'सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील कंपनीने ठरवले आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात आला व जनजीवन पूर्वपदावर आले तरी त्यांच्या ४,७०,००० कर्मचा-यांपैकी ७५% कर्मचारी हे नेहमी घरूनच कार्यालयीन काम संगणकाच्या- आंतरजालाच्या सहाय्याने पूर्ण करतील. एक मात्र नक्की, या कंपनीचा कित्ता दुस-या कंपन्या गिरवणार! ही बातमी वाचल्यानंतर मनात विचारांचे काहूर माजले व घोषणेच्या अनुषंगाने साधक- बाधक विचारांचे चक्र सुरू झाले.
 
 
 
Work from home_1 &nb
 
 
'घरातून कार्यालयीन काम' ही कार्यप्रणाली अवलंबल्यानंतर मानवी श्रम, ऊर्जा, पैसा व वेळ यांची मोठीच बचत होणार आहे. रोज प्रवास करणे गरजेचे नसल्याने वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल व पर्यायाने इंधनाची बचत होईल. हवेचे, ध्वनीचे प्रदूषण टळेल. कौटुंबिक जबाबदा-यांमुळे ज्या बुद्धिवान व सामर्थ्यवान स्त्रिया उत्पादन- सेवा क्षेत्रात आपले योगदान देत नाहीत, त्या स्त्रिया 'घरातून काम' या प्रणालीमुळे आपले उत्पादन क्षेत्राला योगदान देणे सुरू करतील व दडून बसलेली प्रज्ञा बाहेर येऊन त्यामुळे सेवा क्षेत्राची उत्पादकता निश्चितच वाढेल व महिलांचे सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होईल. या नवीन कार्यप्रणालीमुळे कर्मचारी जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांसमवेत, आपल्या जिव्हाळ्याच्या- प्रेमाच्या माणसांसोबत घालवू शकतील.
 
फेसबुक, गुगल, मायक्रोसाॅफ्ट, अॅमेझाॅन यासारख्या बलाढ्य कंपन्यांनी अगोदरच या कार्यप्रणालीचा वापर सुरू केला आहे. या कार्यप्रणालीमुळे जनतेला शहरात गर्दीच्या ठिकाणी दाटीवाटीने राहणे, गरजेचे असणार नाही व त्यामुळे शहरांमधील सोयी- सुविधांवरील ताण काही अंशी कमी होईल. जनता या कार्यप्रणालीमुळे ग्रामीण भागात स्थलांतरित झाली तर ग्रामीण भागांचा विकास होऊन विकास व प्रगती यांचे संतुलन साधले जाईल व महात्मा गांधीजींचे 'खेड्याकडे चला' हे स्वप्न पूर्ण होईल व एक भारत- एकसंघ भारत- विकसित भारत हे प्रत्यक्ष अनुभवता येईल.
 
पण या कार्यप्रणालीची काळी बाजूसुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. या कार्यप्रणालीचे अवलंबन करण्यापूर्वी आपल्याला भारतीय समाज व्यवस्था- भारतीय संस्कृती यांचा विचार प्राथमिकतेने करणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्ट्या जे दोष या कार्यप्रणालीमध्ये आहेत, उदाहरणार्थ- कार्यालयीन माहितीची गोपनीयता, एकांगी विचार करण्याची पद्धत वगैरे, ते कदाचित काढूनही टाकता येतील. पण मानवी परस्परांच्या संबंधांचे काय? कार्यालयीन कामाच्या निमित्ताने आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच आपले एक विस्तारित कुटुंब निर्माण झालेले असते आणि असे विस्तारित कुटुंब असणे, हे मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप गरजेचे असते. विचारांची देवाणघेवाण, सल्ला मसलत, किंबहुना कित्येक वेळेला व्यक्त होण्यासाठी आपल्याला विस्तारित कुटुंबाची, मित्र- मैत्रिणींची गरज असते. त्याहीपेक्षा पुढे जाऊन या ना त्या कारणाने समाजात वावरल्याने मनामध्ये संघभावना निर्माण होत असते. एखाद्या ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा, तडजोडीची तयारी, खूप कष्ट करण्याची तयारी, सहकार्य, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, शिस्तबद्धता, ध्येयाप्रती संघाप्रती एकनिष्ठता ही मूल्ये मानवामध्ये विकसित होत असतात.
 
या नवीन कार्यप्रणालीमुळे या सर्व मूल्यांना तिलांजली द्यावी लागेल. आणि भारतीय संस्कृतीला व त्यावर आधारभूत असणा-या भारतीय समाजाला हे नक्कीच पचणारे नाही. आर्थिकदृष्ट्या माणसे संपन्न होतील. सर्व ऐहिक सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेतील. पण दुर्दैवाने बनतील ती माणसांची बेटं! स्वतःलाच मर्यादा घातलेलं, वाढ खुटलेलं मानवी बेट! निकोप दृष्टिकोनाचा अभाव असलेलं मानवी बेट! म्हणून ही कार्यप्रणाली स्वागतार्ह नाही, हे नक्कीच! यावर परत एकदा सर्वंकष विचार करू या.
 
हो, पण आज घरात बसू या, सुरक्षित राहू या, गर्दी टाळू या, उद्याच्या मानवी बेटविरहित भारतीय समाजासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई