राहिले दूर घर माझे...

Source :    Date :10-May-2020   
|
रविवार, दि. १०/ ५/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात निरनिराळ्या कारणाने स्थलांतरित झालेल्या जनतेला त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणी शिक्षणासाठी, नोकरीसाठी, मोलमजुरीसाठी, सणासमारंभानिमित्त, घरापासून दूर दुस-या जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर दुस-या देशात गेलेल्या स्थलांतरिताची संख्या कित्येक लाखांच्या घरात आहे. प्रत्येकाचेच डोळे आपापल्या घराकडे, आपल्या कुटुंबियांकडे लागले आहेत. परंतु टाळेबंदीच्या काळात अचानक सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाल्याने टाळेबंदी संपण्याची प्रतीक्षा करण्यावाचून या नागरिकांकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. या सर्व प्रकारच्या स्थलांतरितांचा प्रश्न गहन होत आहे व त्यांचा संयम सुटण्यापूर्वी सरकारने त्यांना आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था हळूहळू सुरू केली आहे. पण त्यात खूप मोठी प्रतीक्षायादी आहे. परदेशातील स्थलांतरितांनासुद्धा परत मायदेशी आणण्यासाठी सरकार व्यवस्था करीत आहे.
 
Migrants_1  H x
 
फक्त मुंबईचा विचार केला असता ३० लाख मजूर मुंबईमध्ये देशाच्या कानाकोप-यातून मोलमजुरीसाठी येतात. स्वप्नांची नगरी म्हणून मुंबापुरीकडे पाहिले जाते. मुंबई कोणालाही निराश करत नाही, अशी मुंबईची ख्याती आहे. येथे दाखल झालेला प्रत्येकजण काही ना काही स्वप्न उराशी बाळगून आहे. मग त्यात कलाकारापासून अगदी सर्वसामान्य माणसांचादेखील समावेश आहे. आज कोरोनाच्या संकटात हे मजूर विवंचनेत आहेत. या स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालये, महापालिकेचे स्थानिक प्रशासन जरी पुढे सरसावले असले तरी त्या मदतीलासुद्धा मर्यादा आहेत. आज हे स्थलांतरित मजूर ज्या वस्त्यांमध्ये दाटीवाटीने राहात आहेत तेथे साथीच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे. काही मजूर बेघर आहेत तर काही मजूर कामाच्या ठिकाणी राहात आहेत. महापालिकेच्या निवारा घरामध्ये आसरा घ्यायला आता जागाच शिल्लक नाही. वस्त्यांमध्ये एकेका खोलीत वीसजण, पंचवीसजण राहात आहेत व आज ते सर्वजण रोजगार बुडाल्याने भविष्याच्या चिंतेने व्याकूळ झालेले आहेत. यातच अनेक मजूर रोजगाराची शाश्वती नसल्याने आपापल्या घराच्या ओढीने दूरपर्यंत परराज्यातील गावी जाण्यासाठी पायपीट करीत निघाले आहेत. जरी आज सरकार मजुरांनी घरी जाण्यासाठी मोफत रेल्वेसेवा देत असली तरी त्यासाठी आवश्यक असणारा वैद्यकीय दाखला मिळविण्यास मजुरांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यांचा मानसिक आणि शारीरिक ताण वाढत आहे. घरापासून दूर, कुटुंबापासून दूर असणारे, वसतीगृहात राहणारे विद्यार्थीसुद्धा आज काळजीत आहेत. त्यांनाही त्यांच्या पालकांच्या भेटीची आस लागलेली असून तेही चिंतेत आहेत. काही पर्यटन स्थळांवर पर्यटक अडकलेले असून आपण घरी कधी पोचणार या विचाराने व्यग्र आहेत. एकंदरीत सर्वच स्तरातील स्थलांतरितांना दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांवर सरकारने प्रभावीपणे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा संयम सुटून जर हे स्थलांतरित आक्रमक झाले तर त्यांना आवरणे कठीण जाईल.
 
नोकरी, सुरक्षितता आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अधिकाधिक माणसं सरहद्दी पार करू लागल्यानंतर अपरिचितांबरोबरचा संघर्ष, त्यांना सामावून घेणे, असे प्रश्न राजकीय व्यवस्थांपुढे उभे राहतात. जागतिकीकरणाने पृथ्वीवरील सांस्कृतिक भिन्नता मोठ्या प्रमाणावर कमी केली असली तरी स्थलांतरितांना अनेक प्रश्न नेहमी भेडसावत असतात. तशातच अशा संकटकाळात प्रश्न उग्र रूप धारण करतात. संत तुकडोजी महाराज आपल्या झोपडीसम मोडक्या तोडक्या घराचे वर्णन करताना म्हणतात, 'पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे | शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ||' चिमण्या, कावळे यासारख्या साध्या पक्ष्यांनासुद्धा आपल्या घरट्याची ओढ असते. स्थलांतरित तर हाडामासाची, भावनांनी भरलेल्या मनाची जिवंत माणसे! संकटकाळ कितीही कठीण असला तरी हे सर्व स्थलांतरित आपापल्या घरात, कुटुंबाकडे लवकरात लवकर परत जावोत. अन्यथा प्रक्षोभ अटळ आहे! आज जरी त्यांच्या मनात 'राहिले दूर घर माझे' ही भावना असली तरी लवकरच शासनाच्या प्रयत्नामुळे ते आपापल्या घरात, कुटुंबात पोचतील व सर्वांचीच काळजी मिटेल, अशी आशा करू या!
 
चला तर मग, स्थलांतरितांच्या गृहप्रवेशासाठी मंगल कामना करू या! आपण घरातच राहू या, गर्दी टाळू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई