या जगण्यावर शतदा प्रेम करावे

Source :    Date :12-May-2020   
|
मंगळवार, दि. १२/ ५/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात काल दुपारी समाजमाध्यमांवरील संदेश वाचीत असताना प्रख्यात उद्योगपती श्री. रतन टाटा यांचा संदेश वाचनात आला. त्यात ते म्हणतात, २०२० हे साल फक्त जिवंत राहायचे वर्ष आहे. आणि म्हणून नफा- तोट्याच्या विषयी अजिबात विचार करू नका. स्वप्न आणि योजना याविषयी चकार शब्दही काढू नका. या वर्षी स्वतःला जिवंत ठेवणे, हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
 
simplicity_1  H
 
आणि आज आपल्याला दुर्दैवाने जिवंत राहण्यासाठीच संघर्ष करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. रोग वेगाने संक्रमित होत आहे. गेल्या दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्वजण टाळेबंदी अनुभवत आहोत. कित्येक लोकांचा रोजगार बुडालाय. नव्याने हाताला काम मिळेल याची शाश्वती नाही. बेकारीची टांगती तलवार डोक्यावर आहे. उपलब्ध असलेल्या अन्नधान्यात, भाजीपाल्यात आपल्याला आपली गुजराण करावी लागत आहे. उद्या किराणा सामान उपलब्ध असेल की नाही याबाबत मन साशंक आहे. संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संघर्षाविना माणूस मोठा होत नाही. भीक, भूक, दारिद्र्य आणि गुन्हेगारी हे संघर्ष करायला लावणारे मूळ घटक आहेत. या सर्व परिस्थितीत मानवाला दिशा प्राप्त झाली तर जगविकासासाठी व स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्षाचे मोठे योगदान असेल, यात दुमत नाही.
या संकटकाळात जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लहान- थोर, गरीब- श्रीमंत, शिक्षित- अशिक्षित सर्वच जनतेला संघर्ष करणे अनिवार्य आहे. आणि त्याहून मोठे आव्हान म्हणजे समाजातील मोठ्या घटकाला घरात सुरक्षित राहून संघर्ष करायचाय. घरात बसूनच रोग संक्रमित होणार नाही याची काळजी घेऊन स्वतःच्या व समाजाच्या चरितार्थासाठी हातपाय हलवावे लागणार आहेत. उपलब्ध असलेल्या परिघाची व्याप्ती खूपच मर्यादित असून त्यामुळे संघर्ष अधिकच कठीण आहे. पण त्याबरोबरीने तो करणेही अपरिहार्य आहे.
 
पण माणसाच्या संघर्षाला दिशा हवी. दिशाच नसेल तर संघर्ष वाया जाईल. खूप संघर्ष करून दिशाहीन, बेफाम धावणा-या अस्वस्थ माणसाच्या अवस्थेतून चांगले निर्णय होण्याऐवजी वाईटच निर्माण होईल. ते मानवी विकासाला, समाज परावर्तनाला व राष्ट्र उभारणीला बाधा करेल. पण सुयोग्य दिशेने संघर्ष करणारी अनेक माणसे पुढे आली आहेत. ती फिनिक्स पक्ष्याप्रमाणे शून्यातून पुढे आली. त्यांनी जगाच्या कल्याणाकरीता योगदान दिले. मातीमोल होणा-या लोकांना जिवंत राहण्याची प्रेरणा दिली. मानवी अस्तित्वाच्या सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिले. समाजाबरोबर स्वतःचेही जीवन अनमोल केले.
 
आणि म्हणूनच या कोरोना साथीच्या काळात व कोरोना साथीच्या पश्चातसुद्धा त्रिवार साधेपणा हवा! प्रत्येक नागरिकाचा 'साधेपणा व किमान गरजा' यावर कटाक्ष हवा! गरजा वाढवित जाणे आणि त्या भागवण्यासाठी धडपडत राहणे, हे माणसाचे पशूवत प्रेम त्याला सर्वनाशाकडे नेणार आहे. साध्या जीवनसरणीचा तत्त्वनिष्ठ आणि आचरणनिष्ठ पुरस्कार अत्यावश्यक आहे. नव्या गोष्टी मिळवण्याचा आटापिटा करू नका. जुन्यांनाच अंगीकृत करा. निखालस साधेपणाच हवा. प्रत्येकाने अल्पत्वात समाधान मानण्याचे व अनासक्त वृत्तीने संयम बाळगण्याचे कसब अंगिकारले पाहिजे. म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. जीवन ही मानवाला लाभलेली अनमोल देणगी आहे. जीवनात चढउतार असणारच. सतत दुःख किंवा सतत सुख असे क्वचितच आढळते. आज जरी संकटकाळ संघर्षमय असला तरी आजच्या काळात प्रत्येकाने जिवंत राहण्यासाठी सुयोग्य दिशेने संघर्ष करावयासच पाहिजे. त्याला पर्याय नाही. आपले जीवन अनेक अंगांनी नटलेले, सजलेले विलोभनीय आहे. आणि म्हणूनच असे जीवन पूर्णत्वाने अनुभवण्यासाठी आजचा संघर्ष अटळ आहे.
 
म्हणून आज घरातच रहा! सुरक्षित रहा! आजच्या संघर्षाची सुमधूर फळे उद्या चाखण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई