"जिसका काम उसी को साजे| कोई और करे तो डंडा बाजे||"

Source :    Date :15-May-2020   
|
शुक्रवार, दि.  १५/४/२०२०
 
फुरसतीच्या वेळात ई- स्वरूपातील वृत्तपत्र वाचन करीत असताना एक अपघाताची बातमी वाचनात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला रस्त्यावर नाकाबंदीचे काम दिले असताना कर्तव्य बजावताना एका जोरात वेगाने येणा-या गाडीने धडकले व त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे. अशा दुःखद घटना वाचून मन हेलावून जाते. आपले राज्य या कोरोनाच्या संकटातून जात असताना विषाणू विरुद्धच्या लढ्यात २० हजाराहून अधिक शिक्षक सहभागी झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवरील बंदोबस्त आणि नाकाबंदीसाठी गावपातळीवरील शिक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. वरील घटनेमध्ये ट्रकमधून प्रवाशांची अवैध रीतीने वाहतूक होत आहे का, हे पाहण्यासाठी ट्रकला थांबण्याचा इशारा केला. मात्र तपासणी पथकाच्या इशा-याकडे दुर्लक्ष करून ट्रक पुढे नेला. त्यावेळी या शिक्षकांच्या पथकाने त्या ट्रकचा दुचाकीवरून पाठलाग करीत ट्रकच्या पुढे जाऊन ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ट्रक चालकाने ट्रक तसाच त्याच्या अंगावरून नेला व त्यात या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला.

teach_1  H x W:
 
  राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. राज्यभरातील कोरोनाबाधित जिल्ह्यांमध्ये शिक्षक काम करीत आहेत. त्यांचा या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यात जिल्हा परिषद शाळा, महापालिका, खाजगी शाळांतील पुरुष आणि महिला शिक्षकांचा समावेश आहे. नेहमीच निवडणुका, जनगणना, सरकारी विविध योजना, रोग मुक्ती, विविध सर्वेक्षणे यासारखी अशैक्षणिक कामे करणारे शिक्षक सध्याच्या अवघड काळातही मागे नाहीत. संसर्गाचा धोका पत्करून शिक्षक प्रशासनाला हातभार लावत आहेत. तपासणी नाके, स्वस्त धान्य दुकाने, निवारागृहे, विलगीकरणाच्या शाळा या ठिकाणी लक्ष ठेवण्यासह स्वसंरक्षण साहित्य संच वाटप, आजारी नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण यासारख्या जोखमीच्या कामांची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. दुर्दैवाने मूर्तिजापूर येथील महाविद्यालयीन प्राध्यापकांना मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर गर्दी नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आले होते. हा अत्यंत संतापजनक प्रकार होता.
 
वास्तविक पाहता ज्या समाजात शिक्षकाला, शिक्षण विचाराला सुयोग्य असे स्थान आहे, त्या समाजाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. त्यामुळे प्रगत देशांमध्ये शिक्षकाला- शिक्षणाला प्रतिष्ठा आहे. मानसन्मान आहे. शिक्षकाचे सामर्थ्य प्रगत समाजाने ओळखलेले आहे. जर्मनीसारख्या देशात तर केवळ शिक्षकालाच न्यायालयात न्यायाधीशासमोर बसण्याची परवानगी आहे. विचार व विवेक ही प्रगतीची कारणे आहेत. शिक्षक हा केवळ शिकवत नसतो, तर विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रपणे ज्ञान ग्रहण करून त्यावर चिंतन करण्याची क्षमता निर्माण करत असतो. शिक्षकीपेशा हे एक सतीचं वाण आहे. शिक्षकांनी ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार याला सदैव वाहून घेतलेले असते. शिक्षक 'माणूस' घडवतात. आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक व शिक्षण हे नेहमी हातात हात घालूनच जात असतात. नेहमीच उताराकडे धाव घेणा-या जीवनाला उन्नत करते ते शिक्षण होय! आणि ते जो उत्कृष्टपणे देतो तो शिक्षक! आणि म्हणूनच प्रगत समाजव्यवस्थेमध्ये शिक्षकाची भूमिका व त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे हे निःसंशय!
 
खरे पाहता भारतासारख्या देशात एकूण राष्ट्रीय खर्चातील अतिशय कमी खर्च शिक्षणक्षेत्रावर केला जातो. मा. न्यायालयाने आदेश दिला असतानासुद्धा शिक्षकांना वर्षभर अशैक्षणिक कामांना जुंपले जाते. कोरोना संकटामुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल येऊ घातले आहेत. तंत्रज्ञानाचा शिक्षण पद्धतीमध्ये प्रभावी वापर होणे अपेक्षित आहे. वास्तविक पाहता या टाळेबंदीच्या काळाचा त्यांना स्वतःला तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यास, हाताळण्यात सहजसुलभता आणण्यास वापर करू दिला पाहिजे. किंबहुना त्यांना त्यासाठी उद्युक्त केले पाहिजे. काही अंशतः अपवाद वगळता हे दुर्दैवाने कुठेही दिसून येत नाही. रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहणे, मद्य विक्री केंद्राच्या बाहेर गर्दी नियंत्रणात आणणे यासारखी कामे शिक्षकांची नाहीत. तरीही कोरोना साथीच्या संकटाचे भान बाळगून शिक्षकवर्ग जीवाची बाजी लावून कार्यरत आहे. तरीही तो दुर्दैवाने सदैव निंदानालस्तीला बळी पडतो व त्याचे वेतन व इतर महत्त्वाचे प्रश्न शासनदरबारी कायमच दुर्लक्षिले जातात. म्हणूनच शासनकर्त्यांना विनंती आहे की संकटकाळ हा खूप मोठा असला तरी शिक्षकांना अशा प्रकारच्या अशैक्षणिक कामात गुंतवू नये. तर सदर काळ हा नवीन तंत्रज्ञान शिकण्यास, स्वतःला विकसित करण्यास वापरू द्यावा. ऑनलाईन कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून त्यांची कौशल्ये विकसित करावीत की जेणेकरून आत्मनिर्भर भारत- आत्मनिर्भर नागरिक हे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. त्यासाठी सर्व शिक्षक बंधू- भगिनींनो, सुरक्षित रहा, गर्दी टाळा, उद्याचा आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी!
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई