असुनी नाथ, आम्ही अनाथ!

Source :    Date :19-May-2020   
|
मंगळवार, दि. १९/ ५/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात दुपारच्या वेळात मैत्रिणींशी दूरध्वनीवर बोलत असताना प्रत्येकीच्या बोलण्यात वाढलेले घरकाम, रुचिपालटासाठी रोज नवीन करावयाचे पदार्थ, घराची स्वच्छता करण्यात होणारी दमछाक या विषयांवर वारंवार चर्चा होत आहे. घरात कामाला ठेवलेली मदतनीस, सहकारी, मोलकरीण ही आज ब-याच घरांची अनन्यसाधारण गरज बनलेली आहे. त्यामुळे मुख्यतः शहरात मोलकरीण ही बहुतांश घरांचा अविभाज्य भाग बनलेली आहे.
  
जागतिकीकरणाच्या रेट्यात व गरजांच्या पूर्ततेसाठी आज शहरातील बहुतांश स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या आहेत. जरी त्या अर्थार्जनही करीत असल्या तरी त्यांची घरातील गृहिणीची जबाबदारी काही कमी झालेली नाही. भारतीय समाजातील पुरुषसत्ताक कुटुंब प्रणालीमुळे घर- मुले- कुटुंब आणि नोकरी व्यवसाय या सर्वच आघाड्यांवर आजची स्त्री झुंजत आहे. आणि अशा वेळेला घरातील कामाच्या मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते ती घरातील मोलकरीण! केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे, घराची स्वच्छता व वेळप्रसंगी स्वयंपाकही! या सर्व कामात मोलकरीण मदतीचा हात सदैव पुढे करत असते. कधीकधी घरातील लहान मुले, वृद्ध माणसे यांचीही सेवा ती करीत असते व त्यांच्याशी विशेष प्रकारचे तिचे नाते जमून गेलेले असते. पूर्वी राजे- महाराजे आपल्या राण्यांसाठी दासी ठेवीत. या दासी राणीच्या वेषभूषेपासून तिचे स्नान, भोजन आदी सर्वच बाबतीत जबाबदारी सांभाळीत. पुराणकाळापासून सर्वच कथांमध्ये दासी- मोलकरीण या समाजघटकाचे अस्तित्व जाणवते.
 
maidservant_1  
 
सर्वसाधारणपणे घरात काम करणा-या मोलकरणी या बहुतांशी असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार या गटात मोडल्या जातात. जरी भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाकडे या मोलकरणींची नोंद करणे शक्य असले तरी फार कमी मोलकरणी स्वतःची नोंद करतात. आणि त्यामुळे दुर्दैवाने शासनाकडून मिळणा-या सोयी- सुविधांपासून वंचित राहतात. मोलकरीण या गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु त्यांची स्थिती ही फार समाधानकारक नाही. भारतातील घरकामगारांची वर्तमान स्थिती ही आपले हक्क मागण्याइतपत आजही भक्कम झालेली नाही. घरकाम करणा-या स्त्रियांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यापैकी बहुतांश स्त्रिया कौटुंबिक प्रश्नाने व पर्यायाने सामाजिक प्रश्नाने ग्रासलेल्या आहेत. बहुतांश ठिकाणी या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या वा व्यसनी, ऐतखाऊ नवरे असलेल्या आढळून येतात. स्वतःच्या कुटुंबासाठी खस्ता खात अर्थार्जन करीत असूनसुद्धा कित्येकदा स्वतःच्या कुटुंबात हिंसाचाराला नित्याने बळी पडत असतात. पुणे विद्यापीठात केल्या गेलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार उद्धटपणाची वागणूक, अधिक काम; कमी दाम, आजारपणात रजेला नकार किंवा औषधासाठी पगारातील उचल न देणे, वाईट वागणूक, लैंगिक शोषण, पगारात कपात, शिवीगाळ, अपशब्द, कामावरून काढून टाकण्याची वरचेवर दिली जाणारी धमकी यासारख्या समस्या घरकामगारांना कायम भेडसावत असतात.
 
अशा प्रकारे घरकामगारांच्या समस्या पाहिल्यानंतर एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सध्याची वर्तमान सामाजिक व आर्थिक रचना या असहाय्य वर्गासाठी काही नवीन संधी निर्माण करतील का? की ज्यामुळे त्यांची स्थिती सुधारू शकेल. मूलभूत अधिकारांपासून वंचित अशा या वर्गातील कामगारांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा कोणताही ठोस कार्यक्रम शासनासमोर असल्याचे दिसून येत नाही. मुळातच शासन यासाठी काही प्रयत्न करत आहे याची जाणीव वा माहितीही या मोलकरणींना नाही. कारण हे प्रयत्नच त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. जरी आज केंद्र सरकारचे असंघटित कामगार हिताचे धोरण असले तरी म्हणावी तशी व्यापकता त्याला आज प्राप्त झालेली नाही. सरकारने ही परिस्थिती बदलून, जे सामान्यातले अतिसामान्य आहेत, त्यांना त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेची हमी देणारा 'सामाजिक सुरक्षा' कार्यक्रम प्राधान्याने हाती घ्यायला हवा. त्यांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वतःला व समाजालाही ते या देशाचा 'सुजाण व जबाबदार' नागरिक असल्याचा विश्वास निर्माण करणारी विशेष कामगार कल्याण योजना ही काळाची गरज आहे.
आज या टाळेबंदीच्या संकटकाळात आपल्या रोजच्या जीवनातील सहका-यांवर समस्यांचा भडीमार होत आहे. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या मोलकरणींचे महत्त्व रोजच्या रामरगाड्यात खूपच अधोरेखित झाले आहे.
 
या संकटाच्या वेळी त्यांचे आपले झालेले मतभेद- वाद आजच्या घडीला विसरून, शक्य होईल तेव्हढी मदत करणे आपले कर्तव्य आहे. जरी पूर्णांशाने आपण त्यांना मदत करू शकत नसलो तरी किमान त्यांची रोज आठवण काढून त्याच्या अस्तित्वाची जाण ठेवून शक्य होईल तेव्हढी पैशाची, अन्नधान्याची, औषधपाण्याची, नाहीतर धीराची, पाठिंब्याच्या दोन शब्दांची मदत तरी करू या.
 
चला तर मग, प्रेमाचे, धीराचे दोन शब्द त्यांच्यापर्यंत पोचवू या! हो, पण तेसुद्धा घरात बसून, सुरक्षित राहून!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई