परीक्षेची अग्निपरीक्षा

Source :    Date :23-May-2020   
|
शनिवार, दि. २३/ ५/ २०२०
 
दुपारच्या फावल्या वेळात व्हाॅटस् अॅपवरील संदेशांचे वाचन करीत असताना महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडे विद्यापीठाच्या स्नातक व स्नातकोत्तर वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पदवी प्रदान करण्याची परवानगी मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे, असा संदेश वाचनात आला. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा वगळता बाकीच्या सर्व विद्यापीठाच्या परीक्षा महाराष्ट्र शासनाने आधीच रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. भारतातील सर्व विद्यापीठे विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या अखत्यारित येत असून विद्यापीठांचे सर्व निर्णय, शर्ती व अटी या संस्थेकडून ठरवण्यात येतात व ते सर्व विद्यापीठांस बंधनकारक असतात. विश्वविद्यालय अनुदान आयोग ही केंद्रीय पातळीवरील सर्वोच्च शिखर संस्था असून ती पूर्णपणे स्वायत्त आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने पदवी वा पदव्युत्तर परीक्षा घेण्यास असमर्थता दाखवली असून सदर निर्णय घेतला आहे. जरी विषाणूचा प्रादुर्भाव कितीही तीव्र असला तरी विद्यापीठीय परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह निश्चितच नाही.
 

Exam_1  H x W:  
 
प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात असलेल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीपासून ते ब्रिटिशांनी सुरू केलेल्या आजच्या शाळा- महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा शिक्षण पद्धती ही अविभाज्य भाग आहे. अगदी मौखिक परीक्षेपासून ते लेखी परीक्षा, मुक्त पुस्तक पद्धती परीक्षा, मुलाखत, चर्चा व संगणकाद्वारे परीक्षा, बहुपर्याय पद्धतीने परीक्षा ते ऑनलाईन परीक्षेपर्यंत कोणतेही परीक्षेचे पर्याय वापरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मोजमाप करणे, हा शिक्षण पद्धतीतील महत्त्वाचा घटक आहे. आज महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये स्नातक व स्नातकोत्तर पदव्या परीक्षेशिवाय देण्याच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर परीक्षेशिवाय पदवी दिली गेली तर विद्यार्थ्यांच्या भाळी कायमचा ठप्पा लागेल व ही गोष्ट त्यांच्या भावी जीवनात अडचणीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले असून विरोधी पक्षानेसुद्धा सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांचे नोकरी- व्यवसाय मिळण्याच्या दृष्टीने, उच्च शिक्षणातील परदेशातील संधी मिळण्याच्या दृष्टीने, किंबहुना जेथे जेथे पदवी प्रमाणपत्राला अर्हतेचे स्वरूप प्राप्त असते तेथे तेथे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. परीक्षा घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असताना केवळ विद्यार्थी वर्गाच्या दबावाला बळी पडून परीक्षाच रद्द करणे यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही. आज विद्यार्थ्यांना आपले हित कशात आहे, ते कळत नाही. विद्यार्थी अजाण आहे, पण अशा वेळी वास्तविक पाहता शासनाने ताठर भूमिका घेऊन सर्व सुरक्षितता बाळगून विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन करणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांनी मागणी केल्याने उत्तीर्ण करण्याचे निकष बदलणे, तर कधी परीक्षा रद्द करण्याची मागणी असे प्रकार दबाव आणून घडवले जातात. खरे पाहता विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या मर्यादा ओळखून अशा विद्यार्थ्यांचे अहित करणा-या पण सवंग लोकप्रियता मिळवणा-या अवास्तव मागण्या करू नयेत. सध्याची अपवादात्मक परिस्थिती पाहता मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र बोलावणे व्यवहार्य नाही. मात्र त्यावर पर्याय शोधता येऊ शकतील. तात्त्विकदृष्ट्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने परीक्षा रद्द करणे योग्य नाही.
 
पदवीनंतर विद्यार्थ्यांना राज्यात, राज्याबाहेर किंवा परदेशातील अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असल्याने परीक्षा होणे महत्त्वाचे आहे. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार घेण्यात यावा. राज्य सरकारने या संदर्भात निर्देश देऊ नयेत व विद्यार्थ्यांचे अहित टाळावे. परीक्षा रद्द झाल्या तर हा विचार कितीही सुखावह असला तरी त्याचे परिणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील. परीक्षा हव्यातच. परीक्षा विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी व मिळवलेले ज्ञान पुन्हा पुन्हा पडताळून पाहण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा विद्यार्थ्याला त्याची विद्या आणि त्याची बुद्धी अधिक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा विद्यार्थ्याला जीवनात येणा-या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात. आणि म्हणूनच शिक्षण पद्धतीमध्ये परीक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सोन्यासारख्या मौल्यवान धातूलासुद्धा अग्निदिव्याची सत्वपरीक्षा पार पाडावीच लागते. तरच त्यातून बावनकशी सोने निर्माण होते. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने परत एकदा नव्याने परीक्षा न घेण्याच्या विचारावर विचार करावा व विद्यार्थ्यांचे हित जोपासावे. वेळप्रसंगी विद्यार्थी संघटनांचा रोष पत्करावा लागला तरी चालेल, पण विद्यार्थ्यांच्या अहिताचा निर्णय कदापि घेऊ नये.
 
विद्यार्थ्यांनो, तुम्हीसुद्धा परीक्षा रद्द करण्याची मागणी करू नका. ते तुमच्या फायद्याचे नाही. वरवर दिसणा-या मोहाच्या मृगजळाला बळी पडू नका. आज घरात रहा, सुरक्षित रहा, अभ्यास करा, परीक्षेला सामोरे जाण्यास सिद्ध होण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई