परिचारिका न तू भगिनी!

Source :    Date :28-May-2020   
|
.गुरुवार, दि. २८ /५ /२०२०
 
नुकताच जागतिक परिचारिका दिन साजरा केला गेला. दिनांक १२ मे १८२० यादिवशी जन्मलेल्या आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका ब्रिटीश परिचारिका व 'द लेडी विथ द लॅम्प' या नावाने वैद्यकीय क्षेत्रात अजरामर झालेल्या थोर परिचारिका फ्लाॅरेन्स नाईटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून १२ मे हा दिवस 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या या साथीच्या काळात परिचारिकांचे योगदान अनन्यसाधारण असल्याने यावर्षी हा दिवस विशेषत्वाने अधोरेखित केला गेला. रुग्णसेवेत अतिशय जीव ओतून कार्य करणा-या फ्लाॅरेन्स नाईटिंगल या परिचारिका सेवेच्या देवता मानल्या जातात. त्यांनी जणू आदर्श परिचारिका कशी असते, याचे आदर्श उदाहरण आपल्या व्यक्तिमत्वाद्वारे जगापुढे ठेवलेले आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोहोचून जखमी सैनिक हा आपल्या पक्षाचा आहे की शत्रू पक्षाचा याचा विचारही न करता अहोरात्र त्यांनी त्या जखमी सैनिकांची फक्त एक मानव अशा अर्थाने मानवसेवा केली आणि संपूर्ण जगाला रुग्णसेवेचा पायंडा घालून दिला. या अनुभवातूनच आपल्यातल्या काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल या उद्देशाने सन १८८० मध्ये लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कुलची स्थापना केली. त्यामुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या या समाज व रुग्णसेवा कार्याचा गौरव म्हणूनच त्यांचा दि. १२ मे हा जन्मदिवस इ. स. १९७४ पासून 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. दरवर्षी ६ मे ते १२ मे हा आठवडा संपूर्ण जगभरात 'आंतरराष्ट्रीय परिचारिका आठवडा' म्हणून साजरा केला जातो. फ्लाॅरेन्स नाईटिंगल या थोर मानवसेविकेला या निमित्ताने विनम्र अभिवादन. 
 
सर्वसाधारणपणे डाॅक्टरांनी सांगितलेली उपाययोजना परिचारिका राबवत असतात. सरकारी व निमसरकारी रुग्णालये, आरोग्यकेंद्रे, खाजगी प्रसुतीगृहे, शुश्रूषालये, पंचतारांकित इस्पितळे या सर्व आस्थापनांमध्ये रुग्णांच्या सतत संपर्कात असणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका. डाॅक्टर व रुग्ण यांच्यातील त्या एक महत्त्वाच्या दुवा असतात. भारतामध्ये महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेने १९५२ मध्ये एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठामार्फत 'लीलाबाई ठाकरसी काॅलेज ऑफ नर्सिंग'ची स्थापना झाली. परिचारिका ही संकल्पना इतर पाश्चात्य संकल्पनांबरोबर आपल्या देशात आली असावी असे मानले जाते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर नर्सिंग विषयातील पदविका व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नर्सिंग विषयातील पदवी प्राप्त करता येते. या अभ्यासक्रमामध्ये व्याख्याने व प्रत्यक्ष इस्पितळात प्रशिक्षण या दोहोंचा समावेश असतो. परिचारिका परिषद ही परिचारिकांचे प्रमाणीकरण व नोंदणी करणारी भारतातील मानद संस्था आहे. ही संस्था परिचारिकांच्या अभ्यासक्रमाची आखणी करण्याबरोबरच त्यास मान्यता देऊन त्या संबंधीच्या परीक्षा घेण्याचे काम करते. तसेच परिचारिकांचे शिक्षण देणा-या संस्थांना मान्यता देण्याचे व त्यांची वेळोवेळी तपासणी करण्याचे कर्तव्यही बजावते. एका सरकारी अहवालानुसार सध्या भारतामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य केंद्रात, इस्पितळात काम करणा-या नोंदणी झालेल्या परिचारिकांची संख्या ३७,००,००० इतकी आहे.
 

Nursing_1  H x  
 
एकदा माणूस अंथरुणाला खिळला किंवा त्याला एखादा आजार जडला की रक्ताचे नातेही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशावेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणत्याही नात्याचे संबंध नसताना परिचारिका रुग्णालयात आपलं माणूस म्हणून रुग्णांची काळजी घेते. औषधे देते व वेळप्रसंगी मानसिक आधारही देते. आवश्यक तेव्हा रुग्णाला ओरडून किंवा त्याला समजावून त्याचे समुपदेशनही करते. रुग्णाला काही सांगावेसे वाटले तर त्याचे ऐकणारीदेखील तीच असते. खरोखरच जीवाभावाच्या व्यक्तीसारखीच ही 'सिस्टर' असते. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कोरोनाशी दोन हात करताना वैद्यकीय सेवा क्षेत्रात परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय या सेवेला पूर्णत्व मिळू शकत नाही. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता तर दुसरीकडे स्वतःच्या कौटुंबिक जबाबदा-या अशा या बाजू त्या भक्कमपणे सांभाळत आहेत. कोरोना आजारामुळे परिचारिकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. रुग्णांची काळजी घेताना रुग्णांकडून इतरांची सुरक्षा करणे, तसेच स्वतःला विषाणूंपासून दूर ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागते. डाॅक्टरांपेक्षा रुग्णांना सोबत या परिचिरिकांचीच मिळते. सध्या या परिचारिका आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून केवळ त्यांच्याशी दूरध्वनीद्वारेच संपर्क साधून आहेत. कोरोना कक्षात काम करताना काही वेळा त्यांच्या घरातूनही विरोध होतो. त्यामुळे कुटुंबियांना समजावून वा वेळप्रसंगी विरोध पत्करून त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. पीपीई परिधान केल्यानंतर त्यांना कित्येक तास ना पाणी पिता येत, ना प्रसाधनगृहात जाता येत! तरीही त्या जीवावर उदार होऊन कोरोना कक्षात रुग्णांना औषधे देत आहेत, सकस आहार देत आहेत, त्यांचे मनोबल वाढवीत आहेत. स्वतःच्या सुखदुःखाची, हालअपेष्टांची पर्वा न करता कोरोनाच्या रुग्णाच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालण्याचे काम करीत आहेत. स्वतःचे दुःख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणा-या या परिचारिकांच्या कार्याला सलाम!
 
'परिचारिकांचा पुढाकार, आरोग्य हा मानवाधिकार!' या घोषणेला अनुसरून परिचारिकांशिवाय आरोग्य सेवा होणे शक्यच नाही. ही सेवा परिचारिकाच देत असते म्हणून तिला आरोग्य सेवेचा कणा म्हटले जाते. हा कणा सरळ, मजबूत आणि कणखर राहण्यासाठी शासनाने रुग्णसंख्येवर आधारित परिचारिकांची नेमणूक करण्याची गरज आहे. परिचारिकांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा पुरवण्याची नितांत गरज आहे. तरच त्या अखंडितपणे रुग्णांना सेवा देऊ शकतील व कोरोनावर मात करणे त्यामुळेच शक्य होईल.
 म्हणून तर मंडळी, परिचारिकांना मानाचा मुजरा करू या! आपण सुरक्षित राहून त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करू या!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई