|| एकमेका सहाय्य करू||

Source :    Date :03-May-2020   
|
रविवार, दि.३/ ५/ २०२०
 
संचारबंदीमुळे फावल्या वेळात वृत्तपत्र वाचन करत असताना राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झालेली बातमी वाचून मन विषण्ण झाले. गेला महिनाभरापेक्षा जास्त काळ शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा अजून रुग्णांमध्ये भयावह वाढ होत आहे. राज्यातील काही भाग जरी कोरोनामुक्त असला, तरी काही जिल्ह्यांत संक्रमणाचा वेग अतिशय जास्त आहे. कोरोनावर मात करणा-यांची संख्या वाढत असली तरी विषाणूची लागण आटोक्यात आणण्यात अपेक्षित यश लाभलेले नाही. आरोग्य यंत्रणांवरील ताण यामुळे वाढला आहे. मुंबईत एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यामुळे पोलीस दलातही चिंता वाढली आहे.
 
अशा संवेदनशील व नाजूक परिस्थितीत सरकारी यंत्रणांबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या संघटना, स्थानिक नेते, बिनसरकारी संस्था, स्थानिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था आपापल्या परीने मदतकार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. अनेक कार्यकर्ते व स्वयंसेवक आपल्या जीवाची बाजी लावून मदतीचा हात पुढे करत आहेत. सर्वच कार्यकर्ते, स्वयंसेवक, कोरोना योद्धे व शासन यंत्रणा, बँक कर्मचारी, सफाई कामगार, सुसज्ज आरोग्य व्यवस्थेचे सर्व घटक हे सारेच वंदनीय आहेत.
 
'इदं न मम| राष्ट्राय स्वाहा||' म्हणत निरपेक्ष बुद्धीने सेवाकार्य करणारे स्वयंसेवक मनाला खूपच भावतात. स्वयंसेवक हे सदैव राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसारासाठी व संवर्धनासाठी प्रेरित झालेले असतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनासाठी स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात. 'देश हा देव असे माझा' या भावनेतून आजही आपल्या मातृभूमीला- देशबांधवांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना विरुद्धच्या युद्धातील मदतयज्ञात स्वयंसेवक शांतपणे आपल्या सेवाकार्याची आहुती देत आहेत. तेही गाजावाजा न करता! कोणतीही जाहिरातबाजी न करता!!
  
अशा या युद्धजन्य परिस्थितीत सर्व शासन यंत्रणांनी, समाज घटकांनी, सामाजिक संस्थांनी आणि मुख्य म्हणजे सर्व जनतेने एकमेकांना सहाय्य करीत, हातात हात घालून, मानवी साखळी उभारून युद्ध लढण्याची व शत्रूला परतून लावण्याची गरज आहे. एकमेकांच्या हेतूबद्दल कोणताही संशय न घेता परस्परपूरक काम करण्याची जरूर आहे. गेल्या एका महिन्यात आपल्याला भारतीय जीवनमूल्यांची परत एकदा नव्याने ओळख झाली आहे, जसे की करुणा, सहकार्य, दया वगैरे वगैरे. भारतीय जनता ही सदैव प्रकृतीच्या एक टप्पा पुढे जाऊन नेहमी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून विचार करते व सर्व विश्वाला विशाल भारतीय संस्कृतीचे व्यापक दर्शन घडवते आणि भारतीय व्यवस्थेतील सर्व घटक कोरोना विषाणूच्या लढाईत एकमेकांना सहाय्य करत आल्याचे दिसून येते.
 

help_1  H x W:
 
आज कोरोना या विषाणूच्या रोगामुळे जगभरात जी महामारी पसरली आहे त्यावर भगवान बुद्धांचा एक उपदेश संपूर्ण विश्वासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भगवान बुद्ध म्हणतात, "अत्तानं रक्खन्तो परं रक्खति| परं रक्खन्तो अत्तानं रक्खति||" अर्थात, तुम्ही तुमचे रक्षण केले तर इतरांचे रक्षण होईव. इतरांचे रक्षण झाले तर तुमचे स्वतःचे रक्षण होईल! आज अनिश्चिततेच्या व अस्वस्थतेच्या वातावरणात भगवान बुद्धांचा उपदेश खूप महत्त्वपूर्ण आहे. अखिल मानवजातीला दाखवलेला सरळ आणि सोपा, पण शाश्वत व आत्मिक सुखाची प्राप्ती करून देणारा हा मार्ग होय आणि म्हणूनच आखिल मानवजातीला युद्धजन्य अंधारमय वातावरणातून प्रकाशाकडे जाण्यासाठी गरज आहे ती एकमेकांना सहाय्य करण्याची! एकमेकांना विश्वास देण्याची! एकमेकांचे हात बळकट करण्याची!
 
हो, पण हे सर्व सहकार्य करा सुरक्षित राहून, गर्दी टाळून, उद्याचा अंधःकार टाळण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई