|| चाह भी है और राह भी है ||

Source :    Date :30-May-2020   
|
शनिवार, दि. ३०/ ५/ २०२०
 
मध्यंतरी दि.१२ मे २०२० रोजी कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादात रु. २०लाख कोटी इतक्या रकमेच्या सवलतीची जाहीर घोषणा केली व त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत हा नारा दिला. त्यानंतर दि. १३ मे २०२० ते दि. १७ मे २०२० या पाच दिवसांच्या काळात भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन् यांनी या एव्हढ्या मोठ्या सवलतीचे विश्लेषण करून त्याचे सर्व बारकावे जनतेपर्यंत पोहचवले. एक अर्थशास्त्राची अभ्यासक म्हणून मी या सर्व घोषणांचा बारकाईने अभ्यास करत असून त्यातून मला जे काही आत्मनिर्भर भारत या संकल्पनेविषयी उमगले त्याचा मी प्रस्तुत लेखात माहितीवजा विश्लेषण करून धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
atmanirbhar bharat_1  
 
वास्तविक पाहता आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या आर्थिक सवलती किंवा 'आर्थिक पॅकेज'ची व्याप्ती रु.२० लाख करोड इतकी असून साधारणतः भारताच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या १०% इतकी आहे. त्याचप्रमाणे भारत हा अमेरिका, जर्मनी यासारख्या विकसित देशाबरोबरच संपूर्ण विश्वात असे पॅकेज देणारा चौथ्या क्रमांकाचा देश आहे. आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण. आपल्या गरजा आपणच पूर्ण करायच्या असा याचा ढोबळमानाने अर्थ होतो. खरे पाहता भारतासाठी स्वयंपूर्णता ही काही तशी नवीन संकल्पना नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशीच्या संकल्पनेने केलेले जनजागरण आपणा सर्वांना ज्ञात आहे. गेल्या काही वर्षांत 'मेक इन इंडिया' हा मोदी सरकारचाच उपक्रम आपण पाहिला आहे. मग आताच कोरोना विषाणूच्या जागतिक आरोग्य संकटाच्या तोंडावर मोदींनी स्वयंपूर्णतेची हाक का दिली? विचार करता असे लक्षात येते की हे काही फक्त भारतातच झालेले नाही. अमेरिका, जपान या देशांतही स्वयंपूर्णतेलाच महत्त्व दिलेले दिसून येते.
माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या ३६ मिनिटांच्या भाषणात एकदाही स्वदेशी हा शब्द उच्चारला नाही. कदाचित स्वदेशी ही थोडी कमी व्याप्ती असलेली संकुचित संकल्पना म्हणू शकतो. परदेशी वस्तू आयात करण्याची शक्ती नसल्याने किंवा नीतीचा भाग म्हणून परदेशी वस्तू उपलब्ध होत नाहीत असे कदाचित त्यात अभिप्रेत असावे. परंतु आर्थिक संदर्भात आत्मनिर्भरता म्हणजे संकुचितता, सुरक्षितता, सदैव स्वदेशी, जागतिकीकरणाकडे पाठ फिरवणे, याला सध्याच्या युगात आत्मनिर्भर म्हणता येणार नाही. आत्मनिर्भर म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात आपण इतर देशांवर अवलंबून आहोत, मग ते आयातीसाठी असो वा परदेशी गुंतवणुकीसाठी असो, त्यांच्यावर अवलंबून असतानाही आपण आपले उद्योग, आपल्या सेवा अधिकाधिक कार्यक्षम आणि जागतिक दर्जाच्या करणे अशी आत्मनिर्भरता अपेक्षित आहे. कारण इतिहास पाहता असे आढळून येते की जगात असा एकही देश आढळणार नाही, ज्याची आर्थिक समृद्धी व श्रीमंती हे फक्त त्याच देशातील उद्योगांना प्रोत्साहन देऊन झाली आहे. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर भारतियांनी जागतिक बाजारपेठेतील उच्च दर्जाच्या वस्तूंचे व सेवांचे उत्पादन भारतात करून त्याचा उपभोग घ्यायचा व त्याचा जास्तीत जास्त बोलबाला करून त्या वैश्विक स्तरावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासाठी कार्यवाही करायची. आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये जागतिकीकरणाकडे पाठ फिरवलेली नाही. किंबहुना 'बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल' अशीच कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे.
 
सध्याच्या परिस्थितीमध्ये हेच धोरण योग्य आहे. आणि त्यासाठी केलेली २० लाख कोटींच्या आर्थिक सवलतींची घोषणा भरीव आहे. पण हे धोरण किती काटेकोरपणे पोलादी हातांनी शिस्तीत अंगिकारले जात आहे यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे. आत्मनिर्भरतेची हाक देताना स्थानिक गोष्टींसाठी महत्त्व देताना देशाच्या पुनर्बांधणीसाठी जागतिकीकरणाकडे काणाडोळा न करता स्वदेशीकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. या आर्थिक संकटाच्या काळात स्वावलंबन आपल्याला प्रगतीपथावर नेईल. आणि त्यासाठी आत्मनिर्भरता मिळवणे हा एक प्रमुख पर्याय आहे. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा (तंत्रज्ञानाचा वापर), सशक्त मनुष्यबळ आणि मागणी या पाच स्तंभांवर भारताची आत्मनिर्भरता आधारित असेल. आणि याच पाच घटकांच्या कमाल परिणामकारक उपयोगाने अपेक्षित उद्दिष्ट साधणे शक्य आहे. जर प्रत्येक भारतीयाने स्वदेशी उत्पादने वापरण्याचा निर्धार केला तर येत्या पाच वर्षात भारताची लोकशाही आत्मनिर्भर होऊ शकते. आणि त्यासाठी सर्वात गरज आहे ती भारतीय उत्पादने व सेवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या उत्पादने व सेवांच्या तोडीस तोड असण्याची. म्हणजे मग आपोआपच स्वदेशी उत्पादने वापरण्यासाठी जनतेवर सक्ती करावी लागणार नाही. नागरिक स्वतःहूनच स्वेच्छेने भारतीय उत्पादने व सेवा यांचा पुरेपूर उपभोग घेतील.
 
आर्थिक विश्लेषकांच्या मते आपण सध्या ज्या जगात राहतो, तिथे जागतिकीकरणाकडे पाठ फिरवणे, उदारीकरणाकडे पाठ फिरवणे, हे शक्यही नाही व श्रेयस्कर त्याहूनही नाही. त्यामुळे एक मात्र नक्की की जागतिकीकरण व आर्थिक राष्ट्रवाद यामधील समतोल राखणं ही प्रत्येक राष्ट्राच्या नेत्यासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. माननीय पंतप्रदानांनी केलेल्या घोषणेनुसार खरोखरच भारताला आत्मनिर्भरता शक्य आहे का? ही शंका आपल्या सर्वांच्याच मनात येणे अगदी रास्त आहे. परंतु कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात एकही सुरक्षा कवच (पीपीई किट) व मुखपट्टी (N-95 मास्क) यांचे उत्पादन होत नव्हते. पण आज अगदी थोडक्या काळात दररोज दोन लाखांचे उत्पादन भारतात सुरू झाले आहे हे आपल्या भारतात शक्य झाले आहे. आणि ठरवलं तर आपण काहीही करू शकतो.
 
आणि म्हणूनच चला मंडळी, स्वदेशीचा पुरस्कार करू या, आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवू या! त्यासाठी आज स्वतःला कोरोनापासून सुरक्षित करू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई