पाऊले (लक्ष्मीची) चालती भारताची वाट

Source :    Date :31-May-2020   
|
रविवार, दि.३१/ ५/ २०२०
 
कोणत्याही युद्धात कोणत्या देशाचे पारडे जड हे त्या युद्धग्रस्त राष्ट्रांच्या सांपत्तिक अथवा ऐहिक वर्चस्वावरून ठरत नसते, तर ते त्या राष्ट्राच्या जनतेची प्रबळ इच्छाशक्ती, वैज्ञानिक व सामाजिक जाण यावर बहुतांश अवलंबून असते. युद्धे नेहमी मानवतेसाठी प्राण पणाला लावण्याची भावना जागवूनच जिंकता येतात. आजही वैश्विक स्तरावर एक युद्ध चालूच आहे. शत्रूपक्षात एक अतिसूक्ष्म विषाणू आहे. मानवी शरीरावर हल्ला करून मानवतेचा संहार करू पाहणारा हा विषाणू असला तरीही संधी मिळेलच हा आशावाद त्या विरोधातील लढ्याचे सर्वात मोठे अस्त्र आहे.
 

Bharat_1  H x W 
  
पुढचे काही दिवस- महिने खूपच कष्टदायी असतील. जगासाठी आणि भारतासाठीही आर्थिक परिणाम किती भयानक असतील याचे वर्तमान आताच वर्तविणे कठीण आहे. एकंदरीत कोरोनाची साथ व सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीचे वर्तमान व भविष्य याबद्दल अनिश्चिततेने भारलेली सारी परिस्थिती आहे. साधारण दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालू राहिलेल्या टाळेबंदीने उद्योगविश्व ठप्प झाले आहे. आणि या थंडावणा-या अर्थचक्राची मोठी किंमत भारतीय अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल हे निश्चितच! कोरोनाच्या उद्रेकानंतर ठप्प झालेले अर्थचक्र व विस्कटलेली पणन व्यवस्था याचा विचार केल्यास, भारतातील टाळेबंदी आणखी लांबल्यास ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ०% असेल. जागतिक बँकेच्या मते कोरोना साथीच्या परिणामी भारताचा आर्थिक विकास दर २०२०-२१ मध्ये १.५% ते २.८% असेल, तर आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मते विकासदर १.९% इतका असेल. अर्थात किती काळ टाळेबंदी आहे त्यावर हे अवलंबून आहे.
 
कोरोना विषाणू जसा गरीब- श्रीमंत, मालक- कामगार असा भेद न करताना मुक्तपणे वावरताना दिसत आहे, तसाच कोरोनापश्चात परिस्थितीचा सामनासुद्धा प्रत्येकाला हतबल होऊन अगतिकपणे करावा लागणार आहे. 'मी पूर्ण तयारी करीन आणि कधीतरी संधीचा अवकाश मला गवसेल' हे अमेरिकेचे अखंडत्व कायम राखत तिला एक प्रगत राष्ट्र म्हणून तिच्या उभारणीत योगदान दिलेल्या अब्राहम लिंकन यांचे हे विधान. हे वाक्य आजच्या काळात जनतेचे ब्रीदवाक्य झाले पाहिजे.
परंतु भारताची अर्थव्यवस्था नेहमी संकटकाळातच विकास पावते, हा अनुभव आहे. या संकटाच्या काळातसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था परिणामकारक उपाययोजना केल्या तर तरून जाईल हे नि:संशय! भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था कोरोनाच्या आर्थिक संकटावर मात करायला मदत करेल. युरोपच्या तुलनेत भारत हा तरुण लोकांचा देश असल्याने भारताकडे उत्पादनक्षम मनुष्यबळ भरपूर उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्याने महागाई व इतर खर्च कमी होईल. आजही भारतात देशी वस्तू वापरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्रास चालना मिळेल. भविष्यात भारत औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार होऊ शकेल. आणि बीसीजी लस व मलेरियाविरोधी औषधे हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा नियमित पुरवठा करण्यासाठी जगभरातील देश आपल्याकडे लक्ष देतील. चीनच्या ऐवजी स्वस्त मनुष्यबळामुळे भविष्यात भारत हे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचे केंद्र बनेल. भविष्यात भारतातील वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) आयुर्वेद व निसर्गोपचार प्रणालीमुळे भरभराटीस येईल. योग आणि प्राणायाम शिक्षकांना मोठी मागणी येईल. परदेशात स्थलांतरित झालेल्या सर्वोत्कृष्ट भारतीय बुद्धिवंतांकडून भारताचे उत्पादन वाढवून 'मेक इन इंडिया' वास्तवात येईल.
 
थोडक्यात २०२० जगाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असेल. येथून पुढे संपूर्ण जग भारताच्या समृद्धी मार्गावर असेल. भारतीय संस्कृतीत पैशाला केवळ विनिमयाचे साधन म्हणून न पाहता लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. लक्ष्मी देवता म्हणून संबोधले जाते. भविष्यात जर परिणामकारक योजना प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर राबवल्या तर भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र खूप आशावादी असेल. लक्ष्मीची पाऊले भारताकडे निश्चितच वळतील.
 
हो मंडळी, पण आज तुमची पावले घरातच असू द्यात! घरात रहा, सुरक्षित रहा! उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी- विकासासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई