|| इच्छा तिथे मार्ग||

Source :    Date :05-May-2020   
|
मंगळवार, दि. ५/ ५/ २०२०
 
संचारबंदी- टाळेबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळेत व्हाॅटस् अॅपवरील संदेश वाचत असताना एक जाहीरातसदृश माहिती देणारा संदेश वाचनात आला. आमच्या डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने वडापाव विक्रीचा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे व उदरनिर्वाह करत आहे. माझ्या घरी येणा-या सहकारणीनेसुद्धा सध्या घरगुती कामे बंद असल्याने अर्थार्जनासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे व ती घरपोच भाजी पुरवठा करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. अशा घटना पाहिल्यानंतर साहजिकच मनात त्यांच्याप्रती आदर दाटून आला व मनोमन त्यांना वंदन केले. संकटकाळ कितीही वाईट परिस्थिती आणत असला तरी डगमगून न जाता त्या संकटावर जिद्दीने दोन हात करण्याची वृत्ती खूप सकारात्मक प्रेरणा देऊन जाते.
 
कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या संकटामुळे कित्येक लोकांना स्वतःचा रोजगार बंद करावा लागला आहे. जे स्वयंरोजगारित आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना खूप कठीण आर्थिक विवंचनेतून रोजचे दिव्य पार पाडावे लागत आहे. आर्थिक कमाईचा स्त्रोत बंद झाला आहे व त्यामुळे काही ठिकाणी कुटुंबियांचा चरितार्थ कसा चालवायचा हा प्रश्न सदैव सतावत आहे. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी सामाजिक संस्था जरी सर्वतोपरी मदत देत असल्या तरी त्यावर किती काळ अवलंबून राहायचे? फुकट मिळणा-या गोष्टींवर किती काळ गुजराण करायची? या विचारांनी मन भंडावून जाते व कर्तृत्ववान सतत नाविन्याचा शोध घेणारे उद्योगी डोके नवीन व्यवसाय करण्याच्या सुसंधी शोधून अनेक क्लृप्त्या व युक्त्या शोधून काढतात.
 

food dielivery _1 &n 
 
संचारबंदीच्या काळात कित्येक उद्योजकांनी किराणा मालाची एकत्रित यादी घेऊन घरांच्या वसाहतीमध्ये माल पुरवणे, आठवडाभर पुरेल एव्हढ्या भाज्यांचे किट करून भाज्या पुरवणे, फळांची सोय करणे, दळलेली तयार पिठे उपलब्ध करून देणे, रोख पैसे घैऊन त्या बदल्यात ऑनलाईन रिचार्ज करून देणे, ऑनलाईन पैसे देवाण- घेवाण, ऑनलाईन शिकवण्या, घरात जेवण बनवून तयार जेवणाचे डबे करून देणे वगैरे छोटे मोठे व्यवसाय अर्थार्जनासाठी सुरू केले आहेत. संकटकाळात न डगमगता आलेल्या कठीण परिस्थितीशी मुकाबला करण्याचा आत्मविश्वास प्रचंड सकारात्मक ऊर्जा देतो व या प्रेरणेने परत एकदा नवीन जीवन जगण्याची इर्षा मनात उत्पन्न करतो. वाईट परिस्थितीमुळे रडत न बसता परिस्थितीशी दोन हात करण्याची मानसिक ताकद प्रचंड इच्छाशक्तितूनच जन्म घेते.
 
कोणतीही गोष्ट करावयाचे मनात असले म्हणजे काहीतरी मार्ग सुचतोच. काम करायचे नसले म्हणजे अनेक सबबी पुढे करता येतात. अनेकांना आपले काम फार कठीण वाटते. पण या जगात कठीण असे काहीच नसते. 'यत्न तो देव जाणावा' या उक्तीला अनुसरून सकारात्मक विचारांवर अंमल केला तर अशा प्रयत्नांना ईश्वरसुद्धा मार्ग दाखवतो व सहकार्य करतो. जिथे इच्छा तिथे मार्ग असतो, जिथे मार्ग तिथे अडथळे असतात, जिथे अडथळे असतात तिथे प्रयत्न व संघर्ष असतो. संघर्षाला जरी प्रथमतः अपयश आले तरी अंततः यश येतेच व ध्येयपूर्ती होऊन परमेश्वर भेटतो आणि जेव्हा ध्येयपूर्ती होते तेव्हा लक्षात येते की हा शेवट नाही; सुरवात आहे- एका नव्या प्रवासाची! 'डर के आगे जीत है!' हे खरं असल्याचा यथार्थ अनुभव येतो
.
जात, देश, धर्म, भाषा, संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसाला यशापर्यंत पोहोचवणारा एकच धागा असतो- माणसातला सच्चेपणा, काम करण्याची इच्छा व उद्देशातील तळमळ! ती असेल तर तुमची कळकळ समोरच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय रहात नाही व प्रगतिदर्शक मार्ग कोणतातरी दीपस्तंभ दाखवतोच.
 
चला तर मग, अशी नवीन वाट धुंडाळणा-या व्यक्तींना सलाम करू या व त्यांचा अनुनय करू या! पण आज घरात राहू या. उद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून विजयी भरारी घेण्यासाठी!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई