मिले न मंदिर, मिले न मस्जिद, मिल जाती है मधुशाला!

Source :    Date :07-May-2020   
|
गुरुवार, दि.  ७/ ५/ २०२०
 
संचारबंदीच्या दिवसांत फुरसतीच्या वेळात डिजिटल वृत्तपत्र वाचत असताना एक विस्मयकारक बातमी वाचनात आली. त्या बातमीत माहिती दिल्याप्रमाणे सरकारने दारू विक्रीची दुकाने चालू करायला परवानगी दिल्याने बंगळूर स्थित जगातील सर्वात मोठ्या विदेशी दारू विक्री करणा-या टाॅनिक (TONIQUE) या दुकानाने पहिल्याच दिवशी चार कोटी रुपये किमतीची दारू विकली. ही बातमी वाचल्यानंतर डोक्यात विचारांचे भुंगे गुणगुणू लागले. या विचारांना खूप संदर्भ होते. निरनिराळे आयाम होते. चित्रविचित्र कंगोरे होते.

liquor selling_1 &nb
 
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या साथीच्या काळात दुर्दैवाने आरोग्यासाठी सकाळचे फिरणे- चालणे हा गुन्हा ठरला आहे आणि दारू ही जीवनावश्यक वस्तू ठरली आहे. या इतकी हास्यास्पद गोष्ट कोणती नाही. एव्हढेच नव्हे तर ही दारू पिणारे मद्यपी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संगोपनासाठी योद्धे म्हणून स्वतःला मिरवून घेत आहेत. या इतका दैवदुर्विलास तो कोणता? एका दिवसात जर का केवळ एका मद्याच्या दुकानाचे उत्पन्न एव्हढे होत असेल तर आश्चर्याने तोंडात बोटे घातली जातात. खरंच भारत अविकसित देश आहे? भारतात खरोखरच आर्थिक समस्या आहे?
 
सरकारी तिजोरी रिकामी झाल्याने सरकारी खजिन्यात कररूपाने परत भरणा व्हावा, या हेतूने या दारूच्या दुकानांना, 'मधुशालां'ना विक्रीस परवानगी दिली आहे. या बाबतीतील माहितीची सत्यासत्यता केवळ सरकारच जाणे! आणि हे जर का सत्य असेल तर सरकारी धोरणांवर परत एकदा नव्याने चिंतन होणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मद्यपान करणं हे आरोग्यासाठी घातकच आहे. याबाबतीत संतुलित मद्यपानसुद्धा अपवाद नाही. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, जखमी होणे, यकृताचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, संसर्गजन्य रोग यासारख्या रोगांना मद्यपी लवकर बळी पडतो. सर्व प्रकारच्या दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमीअधिक प्रमाणात असतो. त्यामुळे या सर्व प्रकारांचे व्यसन लागू शकते. मद्यार्काचे मेंदूवरील परिणाम रक्तातल्या प्रमाणानुसार आणि वेळ जाईल तसे बदलत जातात. मेंदूवरील ताबा हळूहळू सुटतो. संवेदना कमी वेगाने होतात, क्रियांचा वेग मंदावतो, भीतीपासून मुक्तता व बेदरकारपणा वाढतो. ज्याप्रमाणे दारूचे शरीरावर दुष्परिणाम आहेत त्याप्रमाणे सामाजिक दुष्परिणामसुद्धा भयानक आहेत. दारूच्या व्यसनांमुळे अनेक अपघात, खून, गुन्हे, भांडणे, आत्महत्या, कौटुंबिक कलह, घरगुती हिंसा, अत्याचार अशा घटना मद्यपींच्या बाबतीत वारंवार निदर्शनास येतात. एकंदरीत मद्यामुळे मद्यपींचे आर्थिक, शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य डळमळीत होते व दारूचे व्यसन मद्यपींच्या वैयक्तिक व पर्यायाने कौटुंबिक -हासास कारणीभूत ठरते.
 
एव्हढे सर्व अनर्थ घडवणारी मदिरा ही अर्थव्यवस्था कशी सावरू शकते, हे केवळ सरकारच जाणे! आपल्या भारतीय संस्कृतीत पैशाला 'अर्थ' म्हणतात. पण त्या पैशालाच जर त्याच्या स्त्रोतामुळे काही अर्थ राहणार नसेल तर हे सर्व प्रयत्न निरर्थकच म्हणावे लागतील. एकीकडे कोरोनाच्या संकटापासून जनतेला वाचवण्यासाठी टाळेबंदी जाहीर करायची आणि दुस-या बाजूला साथ काळातसुद्धा दारू विक्री करून जनतेला व्यसनाच्या खाईत लोटायचे! दारू विक्री करून मिळालेल्या करात राजस्व वाढवून कोणती विकासकामे करायची? अशा विकासाचा उपयोग तो काय? हा विकास की भकास? मद्य विक्री केंद्राच्या बाहेरच्या साथ सोवळ्याचे काय? त्यामधून होणा-या संक्रमणाचा परिणाम काय? एकीकडे समाजातील डाॅक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, पोलीस दल हे जीवाची बाजी लावून कोरोनाचे संकट परतावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इकडे दुसरा घटक वैयक्तिक सुखासाठी व्यसनाच्या अधीन झाल्याने सुखलोलुपता उपभोगण्यासाठी मद्यपी बनतोय! नाही, हे कदापि मान्य नाही. हे पूर्णपणे अन्याय्य आहे. साथीच्या प्रादुर्भावाची भीती बाळगून निरनिराळ्या आस्थापना, उद्योगक्षेत्रे, सेवाक्षेत्रे, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, देवालये वगैरे आज महिन्याभरापेक्षा जास्त काळ बंद आहेत आणि मद्याची दुकाने विक्री करत आहेत, हे कधीही सुजाण नागरिकाच्या मनास पटणारे नाही. भारतीय तत्त्ववेत्त्यांनी केवळ संसाधनांनाच महत्त्व दिले नाही, तर त्या संसाधनांची शुचिता, त्यांचे पावित्र्य, त्यांच्या स्त्रोतांची अधिष्ठाने यालाही त्याहून जास्त महत्त्व दिले आहे. भारतीय संस्कृतीला संकटकाळात धार्मिक स्थळे, विद्यालये, कामाची ठिकाणे ठप्प असताना मद्यविक्री ही मनाला पटणारी नाही, भावणारी नाही. म्हणून अशा निर्णयाचा सर्व स्तरातून निषेधच व्हावयास पाहिजे. असा निर्णय शासनास निश्चितच भूषणावह नाही.
 
आणि म्हणूनच मद्यविक्रीच्या निर्णयावर एकदा परत नव्याने विचार होणे आवश्यक आहे. कितीही कठीण आर्थिक संकट असले तरी एव्हढी हतबलता उपयोगाची नाही. यात जनतेचे नक्कीच भले नाही. आणि म्हणूनच अशा या मधुशाला अर्थशून्य भासतात.
आणि मंडळी, म्हणूनच स्वतःला- कुटुंबियांना यापासून दूर ठेवा. सर्वांनी आज सुरक्षित रहा, गर्दी टाळा! मोहाच्या वाटा चालू नका!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई