कठीण समय येता आंतरजाल (इंटरनेट) कामास येते!

Source :    Date :08-May-2020   
|
शुक्रवार, दि. ८/ ५/ २०२०
 
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व विश्वात तंत्रज्ञानाच्या प्रगतीची घोडदौड वेगाने चालू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून संगणकाचा जन्म झाला. जशाजशा संगणकाच्या अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ, सहज उपयोगी पुढच्या पिढ्या जन्माला येऊ लागल्या, तसतसे सामान्यातल्या सामान्य आबालवृद्धांची नाळ संगणकाशी जोडली जाऊ लागली. कधी गरज म्हणून तर कधी अपरिहार्यता म्हणून! संगणकातून पुढे निर्मिती झाली ती इंटरनेटची. आजच्या युगात टेलिफोनचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले तरी त्यालाही मागे टाकण्याची किमया इंटरनेट करीत आहे. नजिकच्या काळात इंटरनेट सर्वत्र पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणीचे एक महत्त्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरलंय ते! हे आहे तरी काय 'इंटरनेट' म्हणजे? तर संगणकाद्वारे संदेशवहन. अनेक संगणक एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा नेट तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की तयार होते इंटरनेट!

Maya Jaal_1  H  
 
इंटरनेटमुळे जगभरातील विखुरलेली माहिती वा बुद्धिमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण शक्य होते. इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्ज्वल भविष्याकडे नेईल, अशी खात्री आहे. सध्याच्या या संचारबंदीच्या- टाळेबंदीच्या काळात इंटरनेट सर्व जनतेला विनम्रपणे तत्परतेने सेवा पुरवीत असून स्मार्टफोन, लॅपटाॅप, वाय- फाय मोडेम आणि हाॅटस्पाॅट डिव्हाईस यांना घराघरात अत्त्युच्च दर्जाचे स्थान मिळाले आहे. बातम्या त्वरित पसरवणे, शासन निर्देशित संदेशांचे संप्रेषण, घरात बसून कार्यालयीन काम करणे, बँकांचे सर्व व्यवहार घरात बसून ऑनलाईन पद्धतीने करणे आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात बसून निरनिराळ्या अॅपच्या मदतीने कार्यालयीन कामासाठी बैठका घेणे, धोरणात्मक निर्णय प्रणालीसाठी बैठका घेणे यासाठी आंतरजालाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
 
या संचारबंदीच्या काळात इंटरनेटमुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले असून शिक्षकांकडून ज्ञान विद्यार्थांकडे संक्रमित होत आहे. निरनिराळी चर्चासत्रे, कार्यशाळा व परिषदा सध्याच्या काळात इंटरनेटवरूनच आयोजित केल्या जात आहेत. करमणुकीच्या क्षेत्रातही, मग ते नाट्य, क्रीडा, सिनेमा, संगीत, वाचन कोणतेही असो, इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंटरनेटमुळे व्हाॅटस् अॅप व तत्सम अॅपस् महत्त्वाचे संदेश परावर्तित करत आहेतच. पण करमणुकीसाठीसुद्धा या अॅपस् चे महत्त्व अद्वितीय आहे. इंटरनेटमुळे जगातील दुस-या कोप-यात असलेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलणे, त्याची खुशाली विचारणे, अगदी दररोज आणि तेही अत्यंत माफक खर्चात शक्य होत आहे. थोडक्यात काय तर या संकटकाळात इंटरनेट संकटमोचक हनुमानाचे कार्य उत्तम रितीने करत आहे. आता कधीतरी त्याचा विकृत व्यक्तींकडून गैरफायदाही घेतला जातो व त्यामुळे कधीकधी वैयक्तिक अथवा समूहाचे नुकसान होते व समाजस्वास्थ्य बिघडते.
 
परंतु वास्तव असे आहे की सूतापेक्षासुद्धा १/१० इतकी लहान असलेली तार संपूर्ण विश्वात भूगर्भातून समुद्राच्या पोटातून आरपार प्रवास करते व त्याद्वारे इंटरनेटचे जाळे विणून सर्व विश्वाला जवळ आणण्याचा प्रयत्न करते व त्यात यशस्वी होते. एव्हढी नाजूक पातळ असलेली फायबरची तार विश्वातील लोकांना जवळ आणण्यासाठी कार्य करते व त्यात यशस्वीसुद्धा होते. आणि यातूनच मी- माझे देशबांधव व त्याही पलीकडे जाऊन 'हे विश्वचि माझे घर' या सहभावनेने वसुधैवकुटुंबकम् या भारतीय संस्कृतीची प्रचिती देते. आणि म्हणूनच 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असणा-या या पातळ नाजूक फायबरच्या तारेला की ज्यायोगे इंटरनेट कार्यान्वित राहते, तिच्याकडून प्रेरणा घेऊन साथीच्या काळात सामाजिक अंतर राखत असलो तरी मनामनातील अंतर नष्ट करू या, द्वेषभावनेतून प्रेमभावनेकडील प्रवासासाठी! उद्याच्या आनंदमयी विश्वासाठी! हो, पण आज घरातच राहू या, सुरक्षित राहू या! गर्दी टाळू या!!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई