||कलंक मतीचा झडो||

Source :    Date :09-May-2020   
|
शनिवार, दि.९ /५/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात दुपारी फावल्या वेळात व्हाॅटस् अॅपवरील एक संदेश वाचनात आला. गेली दहापेक्षा जास्त वर्षे परदेशात पोटापाण्यासाठी राहिलेल्या एका व्यक्तीने लिहिलेला तो संदेश होता. अमेरिका, जर्मनी आणि भारत या तिन्ही देशातील टाळेबंदीची तुलना करून सदर व्यक्तीने त्यावर भाष्य केले होते. लेखाच्या शेवटी भारतीय समाज म्हणून आपली वागणूक लज्जास्पद असल्याचे मत या अमेरिका स्थित अनिवासी भारतीयाने व्यक्त केले होते. प्रस्तुत माझ्या या लेखात मी या 'महनीय' व्यक्तीच्या विचारांवर चिंतन करून केलेले भाष्य आहे. हा लेख अनिवासी भारतीय असणा-या परंतु भारताविषयी स्वतःचा देश म्हणून अभिमान व राष्ट्रभक्ती असणा-या लोकांना लागू नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
 

image nri_1  H  
 
अमेरिका स्थित या महाशयांनी लिहिलेला लेख हा केवळ एकांगी विचाराचा असून त्यातून केवळ आपण राहतो त्या देशाविषयी आंधळे प्रेम व स्वतःच्या मायदेशाविषयी प्रचंड दुरभिमान व भारतीय समाज बांधवांप्रती घृणा दिसून येते. लेख लिहिताना आपणसुद्धा कधीतरी याच भारतीय समाजाचा घटक होतो, हे लेखक महाशय पूर्णपणे विसरून गेलेले दिसतात. त्याचप्रमाणे सध्या कोरोना साथीच्या काळात भारतामध्ये विविध स्तरांवर घडणा-या घटनांबद्दल ते अनभिज्ञ आहेत, असे वाटते. त्यांनी भारताविषयी, भारतीय समाजाविषयी करून घेतलेला मनोग्रह हा केवळ फेसबुक, व्हाॅटस् अॅप वा तत्सम समाजमाध्यमांवरील बातम्या या आधारावर उभा आहे. वास्तविक पाहता समाजमाध्यमे व त्यावरील संदेश हे खूपच आभासी असतात. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा? आणि जर का एखादे अनुमान काढण्यासाठी गोळा केलेली माहितीच जर अर्धवट असेल किंवा त्याचा स्त्रोतच जर अयोग्य असेल तर अशा अनुमानावर कितपत विश्वास ठेवायचा? वास्तविक पाहता भारतामध्ये जे काही स्वयंसेवक या साथीसंदर्भात सकारात्मक कार्य करत आहेत, ते संकटाला भिडून प्रश्न सोडवण्याच्या मानसिकतेने पछाडलेले असून त्यांना आता कोणत्याही समाजमाध्यमावर व्यक्त व्हायला ना वेळ आहे, ना आवड! वास्तविक पाहता कोणताही समाजाशी निगडीत असलेला प्रश्न सोडवताना घिसाडघाई करून चालत नाही, तर अतिशय संवेदनशीलपणे नाजूक हाताने भावनेला साद घालून विश्वास कमावून योग्य रितीने सोडवावा लागतो. भारतीय समाज हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषा यांनी युक्त असून त्याचवेळी अंधश्रद्धा, परंपरा, धार्मिक भावनांचा पगडा, अशिक्षितपणा, ब-याच अंशी शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव या सारख्या वैशिष्ट्याने ग्रासलेला आहे. भारतीय समाज म्हणजे केवळ उच्च शिक्षित, भरपूर पैसा कमावणा-या आणि फाड फाड इंग्रजी बोलणा-या उच्चभ्रू लोकांची वस्ती नव्हे. एकंदरीत भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर उच्चभ्रूंचे प्रमाण अतिशय अल्प आहे. कदाचित आज रोगराईचा प्रश्न हाताळताना शासन व्यवस्थेकडून एखादी गोष्ट राहून जात असेल, नाही असे नाही. एखादा निर्णय चुकतही असेल. पण अशा गोष्टी योग्य त्या रितीने त्या तथाकथित अनिवासी दीडशहाण्यांनी दर्शवून द्याव्यात. केवळ 'सब घोडे बारा टक्के' या न्यायाने संपूर्ण समाजाला नावे ठेवू नयेत. परदेशात स्थायिक झालेल्या ब-याच लोकांना नेहमीच ते राहात असलेला देश त्यांची कर्मभूमी आणि आपली मायभूमी यांची तुलना करण्याची वांझोटी सवय असते. प्रत्येक देश हा आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक या सर्व गोष्टी मिळून बनलेला असतो व प्रत्येक देशाच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान वेगवेगळे असते. प्रत्येक देशात आढळणारी मूल्यव्यवस्था, कौटुंबिक परिस्थिती, परस्पर नातेसंबंध या निरनिराळ्या पद्धतीने विकसित झालेल्या बाबी असतात. भारतासारखा अविकसित देश आर्थिक नुकसान झाले तरी चालेल पण लोकांचे प्राण वाचले पाहिजेत, असा विचार करून ५० दिवसांपेक्षा जास्त काळ संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर करतो तेथे अमरिकेसारखा बलाढ्य अतिश्रीमंत देश जनता मेली तरी चालेल; पण अर्थव्यवस्थेला खीळ बसता कामा नये, अशी धारणा करून घेतो. प्रत्येक राष्ट्राच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान वेगवेगळे आहे आणि म्हणून याची तुलना होऊच शकत नाही.
 
डाॅक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व तत्सम अत्यावश्यक सेवा पुरवत असणा-या कर्मचा-यांबरोबर विविध सामाजिक संस्था, गैरसरकारी संस्था, स्वयंसेवक, कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून जनतेला मार्गदर्शन करीत आहेत व गरजूंना मदत करीत आहेत. या योद्ध्यांची संख्या व त्यांचे कार्य याबद्दल परदेश स्थित लेखक महाशय अनभिज्ञ आहेत. आज छोटे मोठे काम करून स्वतःचे पोट भरणा-या कामगारांनीसुद्धा आपापल्या परीने आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलला आहे. भारतातील टाटा, अंबानी यासारखे उद्योगपती आज आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावत आहेत. घंटा वाजवून, टाळ्या वाजवून जनतेने केलेले अभिवादन हे प्रातिनिधिक असून, त्यातून पंतप्रधानांनी घातलेल्या सादेला भारतीय जनतेचा प्रतिसाद आहे व आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, याचेच ते उत्तम निदर्शक आहे.
 
कोरोनापश्चात काळात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात, त्यावेळी आवश्यक असलेले बदल करणे निश्चितच जरूरीचे आहे व लेखकाने स्वतःच्या लेखात दिलेली अमेरिका व जर्मनीतील उदाहरणे स्तुत्य आहेत व दिशादर्शक आहेत. परंतु आपल्या समाजातसुद्धा या प्रकारच्या चर्चा, माहितीचे आदानप्रदान, प्रतिबंधात्मक उपाय यावर निरनिराळ्या पातळ्यांवरील नागरिकांच्या समित्या सक्रिय झाल्या आहेत. याचा अर्थ भारतीय समाजात सर्वत्र आलबेल आहे, असा माझा बिलकुल दावा नाही. काही उजवे डावे असायचेच. एक जिनसी एकाच विचारसरणीचा समाज कधीच निर्माण होत नाही. परंतु अशा अपवादाने आढळणा-या गोष्टींनाच पूर्ण सत्य समजून छिद्रान्वेषी वृत्तीने निरीक्षण नोंदवून संपूर्ण भारतीय समाजाचे वर्तन लज्जास्पद आहे, हे अतिधाडसाने अज्ञानापोटी केलेले विधान आहे व त्याचा प्रत्येक स्तरातून निषेध व्हायलाच हवा. अशा मनोवृत्तींना कोणत्याही प्रकारचे खतपाणी घालता कामा नये! 'निंदकाचे घर असावे शेजारी' हे जरी खरे असले तरी जर दुर्दैवाने हे निंदक आपल्याच घरातले घरभेदी असतील, तर यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही!
 
प्रत्येक राष्ट्र आज आपापल्या परीने अतिकष्ट घेऊन साथीच्या संकटाचा मुकाबला करतो आहे आणि त्यातून भारतासारखा गरीब अविकसित देश जगाला औषधे पुरवत आहे व डाॅक्टरांची, परिचारिकांची फौज गरजू देशांमध्ये पाठवत आहे. प्रकृतीच्या पुढे जाऊन उदात्त अशा महन्मंगल भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण जगास दाखवून देत आहे व आजच्या या भारतात उद्याचे जागतिक नेतृत्व उदयास येत आहे. अशा वेळी स्वतः राहात असलेले राष्ट्र कर्मभूमी कसे उत्तम कार्य करतेय आणि बाकीची राष्ट्रे व समाज कसे लज्जास्पद वर्तणूक करत आहेत, हे म्हणणे म्हणजे स्वतःच्या कोत्या मनोवृत्तीचेच लक्षण आहे. असे दीडशहाणे अस्तनीतले निखारे दूरच बरे! देव त्यांना सद्बुद्धी देवो व त्यांच्या बुद्धीला लागलेला मायभूमीतील समाजबांधवांच्या लज्जेचा कलंक झडून जावो!
 
तोवर घरात रहा, सुरक्षित रहा! परदेशस्थ भारतीय तुमच्यावर नजर ठेवून आहेत!

....डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई