टाळेबंदीची फलश्रुती!

Source :    Date :12-Jun-2020   
|
शुक्रवार, दि. १२/ ६/ २०२०
 
डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूने चीन या देशात प्रवेश केला व हळूहळू जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे संपूर्ण विश्वात त्याचा फैलाव झाला. मार्च २०२० च्या पहिल्या आठवड्यात आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात हा कोरोना विषाणू अवतीर्ण झाला व सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. एकमेकांशी संपर्क टाळणे, हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय असल्याने २२ मार्च २०२० च्या 'जनता कर्फ्यू'पासून संचारबंदीला टप्प्याटप्प्याने सुरवात झाली, ती थेट ३१ मे २०२० पर्यंत. १ जून २०२० पासून हळूहळू टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण सर्व परिस्थिती पूर्णपणे कधी पूर्वपदावर येईल याचा अंदाज आताच बांधणे कठीण आहे. कोरोनामुळे किती हानी झाली, आर्थिक स्थिती किती बिघडली, त्याचे परिणाम भविष्यात काय भोगावे लागतील हे सारे यथावकाश कळेलच, पण या सूक्ष्मातिसूक्ष्म जीवाने मनुष्य प्राण्यासारख्या सर्वच दृष्टीने बलाढ्य प्राण्याला काही धडे नक्कीच शिकवले आहेत. या टाळेबंदीची फलश्रुती काय? यातून मी काय शिकले? याबाबत माझी मते मी व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे प्रस्तुत लेखात मांडणार आहे.
 
टाळेबंदीच्या फलश्रुतीचा विचार करता आर्थिक नुकसान झाले, राष्ट्राची व पर्यायाने समाजाची आर्थिक प्रगती कुंठीत झाली, उद्योगविश्व ठप्प झाले, बेरोजगारी, अनिश्चितता यासारखे गंभीर नकारात्मक परिणाम तर झालेच आणि त्याचे परिणाम पुढील कित्येक वर्षे आपणा सर्वांना भोगावे लागणार आहेत, हे निश्चितच!पण त्याही पुढे जाऊन टाळेबंदीच्या परिणामांचा विचार केला तर काही सकारात्मक फायदेही लक्षात येतात. टाळेबंदीच्या फायद्याचा विचार करता माणसाच्या वैयक्तिक जीवनातील फायदे व समाजजीवनातील फायदे अशा दोन स्तरावरील फायद्यांचा विचार करणे आपल्याला अपरिहार्य आहे.
 

economy_1  H x  
वैयक्तिक स्तरावरील फायद्याचा विचार करता टाळेबंदीमुळे सर्वच ठप्प झाल्याने जास्तीत जास्त जनता घरातच राहिली व त्यामुळे विषाणूचा फैलाव त्यामानाने कमी प्रमाणात झाला व साथीच्या रोगाचा समाजातील फैलाव काही अंशी रोखला गेला. या विषाणूच्या साथीमुळे 'सारे जमीन पर' अशी काहीशी अवस्था अनुभवास मिळाली. धर्म, जात, लिंग, शिक्षण, पैसा यापलीकडे जाऊन आपण सारी माणसेच आणि तीही एकसारखी ही भावना कोठेतरी मूळ धरू लागली. आणि मुख्य म्हणजे माणसांचा गर्व- माज- मस्ती- उन्माद गळून पडायला सुरवात झाली. 'माझे मीपण गळून जावे' या कवितेत वर्णिल्याप्रमाणे माणसाची मानसिक स्थिती झाली. आरती प्रभू यांनी कवितेत सांगितल्याप्रमाणे 'दुःख ना आनंदही, अन् अंत ना आरंभही। नाव आहे चाललेली, कालही अन् आजही॥' अशीच अवस्था सर्व मानवजातीची झालेली आहे. पैशाची उधळपट्टी, हाॅटेलिंग, ऑनलाईन ऑर्डर देऊन बाहेरचे खाणे बंद झाल्याने घरच्या अन्नपूर्णेच्या हातच्या स्वयंपाकाची चव कळू लागली व स्वयंपाक करताना त्यात तिने ओतलेल्या जीवाचा परिपाक म्हणून सुग्रास अन्न बनते याची जाणीव मनाला होत गेली. पैसे शिजवून खाता येत नाहीत. त्यामुळे घरच्या गृहिणीची किंमत कळली व त्यातूनच श्रमविभागणी घरात सुरू झाली. त्यामुळे कुटुंबात पुन्हा एकदा नव्याने संघभावना बळकट झाली. प्रत्येक गोष्टीला ब्रँड पाहिजेच, ही मानसिकता कमी होऊन, कमीत कमी वस्तू वापरून जीवन जास्त छान जगता येते याची अनुभूती अनेकांना आली. अत्यावश्यक सेवेच्या किमतीची प्रचिती आली. दूधवाला, भाजीवाली, कामवाली यासारख्या जगण्याशी निगडीत वस्तू व सेवा पुरवणा-यांचे महत्त्व अधोरेखित झाले व शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा आहे, ही भावना मनाला चाटून गेली. निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे. सारे त्याच्यासमोर सर्व समान आहेत, ही भावना मनात दृढ झाली. अविकसित देशांच्या जुन्या परंपरा श्रेष्ठ ठरल्या. बड्या देशातील सा-या अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा एका क्षणी तोकड्या पडल्या. प्रदूषणामुळे निसर्गाच्या होत असलेल्या हानीला काही काळ तरी ब्रेक मिळाला व निसर्गाच्या सान्निध्यात जायचे असते याची जाणीव झाली. त्यामुळे 'स्वच्छ भारत' अभियानालासुद्धा हातभार लागला. माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, हा गैरसमज आहे. हे टाळेबंदीने समजावून सांगितले. आर्थिक संकटामुळे आपसूकच बचतीची सवय लागली व काटकसरीचे जीवन जगता येऊ लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटच आपल्याला बळकट करते, या सत्याचा साक्षात्कार झाला. वाचन, गायन, वादन यासारख्या जुन्या छंदांना परत उजाळा मिळाला आणि कॅरम, पत्ते, बुद्धिबळ यासारखे बैठे खेळ घरातील मुलांसोबत खेळून परत एकदा बालपण जगता आले.
 
समाजपातळीवरील टाळेबंदीच्या फलश्रुतीचा विचार करता सगळ्यात महत्त्वाची भावलेली गोष्ट म्हणजे एक देश, एक राष्ट्र म्हणून एकसंघ होऊन सर्व जनता या संकटाला तोंड देण्यास एकजुटीने उभी राहिली व सरकारी यंत्रणेला सक्रिय पाठींबा देऊ लागली, हेच खूप महत्त्वाचे आहे. परस्परांमध्ये कितीही मतभिन्नता आली, विचारभिन्नता असली तरी राष्ट्रावरील आलेले संकट एकजुटीने उलथवून लावू शकतो व त्याकरीता सर्व राष्ट्राचे एकत्रीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या एकत्रीकरणाचा प्रत्यय या संकटकाळी आला. वेळोवेळी देशाच्या माननीय पंतप्रधानांनी असेल किंवा महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांनी असेल, केलेल्या आवाहनाला अनुसरून जनतेने त्याप्रमाणे काटेकोरपणे वर्तन करून आपले कर्तव्य बजावलेले आहे. राष्ट्रकार्यासाठी अनेक सामाजिक संस्था, गैरसरकारी संस्था, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक जीवाची बाजी लावून सेवाकार्यात समर्पण करीत आहेत. त्यातूनच त्यांची मी- माझा समाज व माझे देशबांधव यांच्याप्रती असलेली निष्ठा प्रत्ययास आली. देशातील संपूर्ण वितरण व्यवस्थेमधेच बदल घडून येत आहे व शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. नवनवीन संशोधने उदयास येत असून 'जुगाड' करून अत्याधुनिक यंत्रे निर्माण करण्याची भारतीयांची प्रवृत्ती परत एकदा दृष्टीस पडली. आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यास आपण कमी पडलो आहोत, याचे भान येऊन भविष्यात त्या दृष्टीने वैद्यकीय सोयीसुविधा उभारण्याचे नियोजन सुरू झाले आहे. एकंदरीतच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून जास्तीत जास्त आत्मनिर्भर कसे बनता येईल याचा विचार व त्यावर अंमल सुरू झाला आहे. संकटातही सुसंधी शोधण्याच्या विचाराने परत एकदा मान वर काढली असून गरज हीच शोधाची जननी असते हे परत एकदा सिद्ध झाले आहे. एकंदरीतच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन परत निकोप होत असल्याचे दिसून येत आहे.
 
काही अपवाद वगळता या जनजीवन पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसूर न करता परत एकदा नव उमेदीने 'प्राप्तकाल हा विशाल भूधर। सुंदर लेणी तयात खोदा॥' या उक्तीप्रमाणे अधिकाधिक प्रयत्न करणे जरुरीचे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना पूर्व काळात केलेल्या चुका विशेषतः निसर्गाचा असमतोल करण्याच्या चुका परत न करता नवोन्मेषाची अधिकाधिक शिखरे पादाक्रांत करावयास हवीत हे निश्चितच! चला तर मंडळी, एकमेकांचे हात बळकट करू या, भारताला आत्मनिर्भर बनवू या!
 
********************************************************************************************* 
 
॥वंदे मातरम्॥
...आमुचा राम राम घ्यावा!
प्रिय वाचकहो,
सस्नेह नमस्कार!
'जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनी!'
  
उपरोक्त ओळी या प्रसिद्ध कवी केशवसुत यांच्या तुतारी या कवितेतील आहेत. कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्वत्र निराशेचे, भीतीचे, नकारात्मक वातावरण असताना माझ्यासारख्या नेहमीच सकारात्मक विचार करणा-या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकाला समाजात उमटणारे विविध तरंग दृष्टीस पडत होते व त्याचा मी निरनिराळ्या दृष्टीने विचार करीत असे. आणि ते विचार व्यक्त करण्यासाठी मी दिनांक १४ एप्रिल २०२० पासून दैनंदिन लेखमाला सुरू केली आणि आज दिनांक १२ जून २०२० रोजी या लेखमालेतील शेवटचा ६० वा लेख प्रसारित केला आहे. हे विविध लेख लिहीत असताना मी वाचन, चिंतन, मनन, संशोधन या प्रक्रियेतून जात होते व त्यातून मला मानसिक समाधान मिळत होते. निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करताना वैचारिक परिपक्वता वाढल्याचे जाणवत होते व तेच अत्यंत गरजेचे असते. गेले ६० दिवस सातत्याने लेखमाला प्रसिद्ध करणे हे काही सहकार्याशिवाय शक्यच नव्हते. रोजच्यारोज लेखमाला मराठी भाषेत मुद्रित करणारे डाॅ. श्रीनिवास आठल्ये, त्याचप्रमाणे तांत्रिक बाजू सांभाळून रोज वेळेत लेख आपल्यापर्यंत पोचवणारे प्रा. अमित जोशी यांची मला या कार्यात अनमोल मदत झाली आहे. त्यांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत. त्याचप्रमाणे माझ्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावरून (website) हे लेख रोज प्रसारित झाले. त्यामुळे संस्थेचे मी ऋण व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हा वाचक मंडळींमुळे, तुमच्या प्रोत्साहनामुळे, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमुळे मी ही लेखमाला सलग ६० दिवस चालवू शकले. यासाठी तुम्हालाही धन्यवाद!
 
आता परत एकदा पुनश्च हरि ॐ म्हणत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. माझेही काॅलेजचे कार्यालय चालू झाले आहे. गेली अडीच- तीन महिने खोळंबलेली कामे हातावेगळी करायची आहेत. परत एकदा नव्याने नवीन 'जुगाड' करून ध्येय गाठायचे आहे. मी- माझा समाज- माझा देश- माझे देशबांधव यांच्याप्रती माझी असलेली निष्ठा आणि त्यातून आलेले कर्तव्य चोख बजावण्याची वेळ सुरू झाली आहे. म्हणून सर्वांनी परत एकदा जोमाने भयमुक्त होऊन ध्येयाप्रती पोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू या. राष्ट्रकार्यास समर्पित करण्यास कटिबद्ध होऊ या. कारण--
 
दिव्य तेज अंतरी आमुच्या
अंधाराचे भय न कुणा ।
आसमंत व्यापून निनादे
राष्ट्र गर्जना पुन्हा पुन्हा ॥

।जय हिंद।
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई