अती राग आणि भीक माग |

Source :    Date :25-Jun-2020   
|
गुरुवार, दि. २५/ ६/ २०२०
 
सकाळच्या घाईच्या वेळेत स्वयंपाकघरात काम करीत असताना शेजारील इमारतीमधील एका घरातून जोरजोरात चाललेल्या भांडणाचा आवाज कानी पडत होता आणि शेवटी त्याचे पर्यावसान जोराने दरवाजे आदळणे व भांडी आपटण्यात होत होते. हे कानावर पडलेल्या आवाजावरून कळत होते. भांडणाचे रूपांतर अतिक्रोधात झाले होते व तो आक्रस्ताळेपणा करून व्यक्त केला जात होता. सर्व प्रसंगाचा विचार करता माझ्यातील होतकरू मानसशास्त्राचा विद्यार्थी जागृत झाला व राग या भावनेविषयी अभ्यास सुरू केला. त्या अभ्यासातून मला जे काही उमगले ते प्रस्तुत लेखातून तुमच्यासमोर मांडणार आहे.
 

Anger_1  H x W: 
राग- क्रोध ही मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. जेव्हा इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. मनाविरुद्ध घडणा-या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय. अपयश, नैराश्य, वैफल्य, संशय, भीती, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा यावर मात करण्यासाठी आपल्या मनाने उभारलेली ती एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते. जीवशास्त्रीय घटक जसे की विस्कळीत स्वायत्त मज्जासंस्था, डोपोमिन व सिरोटानिन यासारख्या संप्रेरकांचा सहभाग, अनुवांशिक घटक जसे XYY सिंड्रोम असणा-या व्यक्ती, अनुवांशिक व्यक्तिमत्व दोष आणि मानसशास्त्रीय कारणे जसे की तीव्र स्वयंकेंद्री असणा-या व्यक्ती, न्यूनगंड, लैंगिक दमन इत्यादी., त्रासलेल्या व्यक्ती, अतार्किक वृत्ती वगैरे वगैरे. ही मुख्य तीन कारणे क्रोधाच्या भावनेस जबाबदार आहेत. शारीरिक किंवा मानसिक हत्यारांचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीविषयी राग व्यक्त केला जातो. सातत्याने निरनिराळ्या पद्धतीने राग व अति राग व्यक्त केल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. यातून भांडण- तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नातेसंबंध बिघडतात व मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्वावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतात. रागावणा-या क्रोधिष्ट व्यक्तीमध्ये मनोविकाराचे तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.अस्वस्थता, बेचैनी, नैराश्याची भावना, मंत्रचळेपणा तसेच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते. म्हणजे अनियंत्रित राग कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.
 
उपरोक्त नमूद केलेले सर्व कोपिष्ट स्वभावाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर रागावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी रागाचे व्यवस्थापन शिकण्याची गरज आहे. त्याचीच पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे व इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे. ज्या दुस-या व्यक्तीवर रागावलो आहोत त्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत अशी कल्पना करून आपल्या वर्तनाचा फेरविचार करणे. त्याच बरोबरीने आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील याचा विचार करणे. रागाचे व्यवस्थापन कसे करायचे व त्यातून आपल्याला हवे असलेले परिणाम कसे मिळवायचे आणि नको असलेले परिणाम कसे टाळायचे, यासाठी वेळीच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन योग्य रीतीने उपाययोजना करावी.
 
वास्तविक पाहता 'राग येणे' ही एक नैसर्गिक भावना असली तरी तिचा आविष्कार नियंत्रणात असणे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. रागाला बाहेर पडण्यासाठी सकारात्मक समाजमान्य मार्ग देणे अत्यावश्यक आहे. सात्विक संताप जो लोकहितकारी असतो तो वगळता राग ही आपल्याला सर्वात महागात पडणारी भावना आहे. खरे म्हणजे राग ही तात्पुरती भावनेची उर्मी असते. ती ओसरण्याआधीच आपण तिच्या स्वाधीन झालेलो असतो. मात्र या उर्मीची लाट होऊ न देणे हे आपल्याला रागाच्या योग्य व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करून करणे निश्चितच अशक्य नाही.
 
जरी अति कोपिष्टपणाच्या देवदेवतांच्या गोष्टी ऐकायला मनोरंजक असल्या किंवा दुर्वास ऋषींच्या कोपिष्टपणाच्या गोष्टी रोचक असल्या तरी अती राग हा वाईटच. जेव्हा अतिक्रोधाने भगवान महादेव तिसरा डोळा उघडतात तेव्हा सर्वत्र विनाश होतो व आपत्ती येते. तद्वतच वेळीच रागाचे व्यवस्थापन केले नाही तर मनुष्याला आपत्तीला तोंड देण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई