माझा ब्रँड- माझा विचार

Source :    Date :26-Jun-2020   
|
शुक्रवार, दि. २६ /६ / २०२०
 
आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी 'आत्मनिर्भर भारत' घोषणा दिल्यापासून निरनिराळ्या प्रसिद्ध ब्रँडसचे उगमस्थान कोणता देश आहे, हे पाहण्याचा मला छंदच जडलेला आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणल्या जाणा-या निरनिराळ्या वस्तूंचे व सेवांचे ब्रँडस पडताळून त्या वापरायच्या की नाही, याचे अवलोकन करण्यासाठी मुख्यत्वेकरून 'ब्रँड' या संकल्पनेचा विचार केला असता जे काही मनात आले ते तुमच्यासमोर मांडत आहे.
 

branded_1  H x
 
 
सध्याचा जमाना हा ब्रँडचा आहे. ब्रँडेड वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत, सुखवस्तू घरातले असे समजले जाते. ब्रँड म्हणजे वस्तूचा उत्तम दर्जा, वस्तूची गुणवत्ता व त्याबद्दल ग्राहकांच्या मनात असणारा विश्वास. आणि हा विश्वास निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात त्या ब्रँडचा असणारा नावलौकिक. त्यामुळे ब्रँडेड वस्तू खरेदी करण्याकडेच लोकांचा कल असतो. कित्येकदा निव्वळ स्टेटस किंवा विश्वासार्हता म्हणून नव्हे तर वर्षानुवर्षे वापरत असलेल्या एखाद्या ब्रँडशी अनेकदा भावनिक नाते तयार होते व त्यामुळे हा विश्वास एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरित केला जातो. ब्रँडेड वस्तू वापरल्याने उपभोगकर्त्याला वस्तूची गुणवत्ता असल्याने अत्त्युच्च दर्जाच्या उपभोगाचे समाधान मिळत असते आणि सामाजिक प्रतिष्ठासुद्धा प्राप्त होत असते. जरा थोडे जास्त मूल्य देऊन ब्रँडेड वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूबरोबर मिळणारी सेवा, प्रत्येक छोट्या मोठ्या शहरासाठी उपलब्ध असणारे ग्राहक सेवा केंद्र, खात्रीची हमी यासारख्या अनेक कारणांमुळे ब्रँडेड वस्तूंना पसंती दिली जाते. आणि म्हणूनच 'सस्ता लो बार बार, महंगा लो एक बार!' या उक्तीने जन्म घेतला असावा.
 
पण वाचकहो, या बाजारीकरणाच्या गर्दीत वैयक्तिक ब्रँडचे काय? त्याचा काही विचार किंवा आपला वैयक्तिक ब्रँड बनवण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करतो का? वैयक्तिक ब्रँड म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच्या कर्तव्यांप्रती असे वैयक्तिक योगदान, जे अन्य लोकांपासून पूर्णतः भिन्न आहे. व जे अन्य लोकांपेक्षा थोडेसे का होईना उच्च दर्जाचे आहे. नोकरीच्या जागी अर्थ, दर्जा आणि प्रमाण या तीन महत्त्वाच्या व निर्णायक निकषांवर वैयक्तिक ब्रँड तयार होणे पूर्णतः अवलंबून असते. प्रत्येक कार्यालयीन कामकाजाची पद्धत व कामाची व्याप्ती भिन्न असल्याने या संदर्भात सार्वत्रिकीकरण करणे शक्य नाही. यामुळे प्रत्येक कर्मचा-याला वैयक्तिक ब्रँड बनवण्यासाठी स्वतःच्या कामाच्या स्वरूपानुसार व मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार स्वतंत्र विचार व नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वैयक्तिक क्षमता व वैयक्तिक मर्यादा या दोन बाबींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुमचा स्वतःचा ब्रँड तयार होताना तो इतर कोणत्याही ब्रँडप्रमाणे शक्तिमान, अस्सल, सातत्यपूर्ण, दृष्य आणि बहुमोल होणे गरजेचे आहे. स्वयंप्रतिमा, प्रतिमा विकास, संप्रेषण कौशल्ये, परस्पर मानवी संबंध व भावनिक बुद्धिमत्ता या महत्त्वाच्या पाच घटकांचा जाणीवपूर्वक अभ्यास व अंमलबजावणी करून तुम्ही स्व- ब्रँडिग विकसित करू शकता.
 
वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी लक्षात घेता माझ्या मते आपला 'विचार' हाच आपला ब्रँड आहे. आपला विचार हाच आपला ब्रँड बनतो. त्या ब्रँडने त्या विचाराने आपल्याला सर्व जग ओळखू लागते. कोणत्या परिस्थितीमध्ये कोण कसे वागेल हे आपल्या विचारधारेमुळे ठरते आणि तोच आपला ब्रँड असतो असे मला वाटते. त्यामुळे आपली विचारप्रणाली- विचारधारा आपण बनवायची की जेणेकरून माझा ब्रँड उत्तमोत्तम होईल. त्याचप्रमाणे आपल्या दुर्गुणांचा प्रभाव जेव्हढा आपण कमी करायचा प्रयत्न करू तेव्हढा आपल्या गुणांचा प्रभाव वाढत जाणार हे निश्चित आणि त्याप्रमाणे आपला ब्रँड बनणार. आणि एकदा का आपला ब्रँड तयार झाला की तो सातत्याने जोपासणे जरुरीचे असते. किंबहुना वैयक्तिक ब्रँड बनवण्यापेक्षा तो जोपासणे जास्त अवघड असते.
 आणि म्हणूनच आपण आपला वैयक्तिक ब्रँड काळजीपूर्वक बनवू या, टिकवू या व वाढवू यासुद्धा! कारण भविष्यातील अनिश्चिततेच्या काळात जर आपला ब्रँड टिकला तरच आपण टिकणार आहोत.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई