भित्यापाठी ब्रह्मराक्षस

Source :    Date :03-Jun-2020   
|
बुधवार, दि. ३/ ६/ २०२०
 
 विषाणूचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे नियंत्रित न झाल्याने प्रतिबंधित क्षेत्रात अजूनही टाळेबंदी सुरू असून बाकी क्षेत्रात हळूहळू निर्बंध उठवून जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास आजपासून सुरवात झाली आहे. आणि आताच ख-याखु-या परीक्षेची वेळ सुरू झाली आहे. आता प्रत्यक्ष कोरोनासोबतचीघराबाहेर पडून, पण स्वतःला सुरक्षित ठेवून लढायची आहे. आता या लढ्यात सर्वसामान्य नागरिकांचा सहभागपण होत आहे. त्यामुळे अधिक काळजीपूर्वक रीतीने सावधगिरी बाळगायला हवी. काळजीग्रस्त न होता काळजी घ्यायला हवी.

Precautions_1   
 
वास्तविक पाहता एका अहवालानुसार मुंबईमध्ये जिथे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे प्रमाण संपूर्ण भारतामध्ये जास्त आहे तिथूनसुद्धा दिलासादायक बातम्या दृष्टिक्षेपात येत आहेत. मृत्यूदराचे प्रमाण ३.२% इतके कमी झाले आहे. तर रुग्णसंख्या दुपटीचा दर १६ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अर्थात यामध्ये अजूनही सुधारणांची गरज आहे हे निःसंशय! पण चालू असलेल्या उपाययोजना योग्य निकाल देत आहेत हेही तितकेच खरे! जे वृद्ध आहेत, ज्यांना रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार यासारख्या आधीपासूनच व्याधी आहेत, ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे, सर्वसाधारणपणे असे रुग्ण मृत्युमुखी पडतात. त्याचप्रमाणे जे रुग्ण लक्षणांकडे दुर्लक्ष करून रोग अंगावर काढतात, योग्य उपाययोजना करून घेत नाहीत व आरोग्याची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली की इस्पितळात जातात, दुर्दैवाने अशा रुग्णांच्या बाबतीत वैद्यकीय प्रयत्न निष्फळ ठरतात. का बरे असे रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतात? का रोग अंगावर काढतात? त्यामुळे स्वतःच्याच नाही तर कुटुंबिय, शेजारीपाजारी, ओळखीचे पाळखीचे या सर्वांचीच हे संबंधित लोक त्रेधातिरपीट उडवतात.
 
सर्वसाधारणपणे असे रुग्ण माझ्या मते केवळ अज्ञानापोटीच दुर्लक्ष करत असतील असे नव्हे, तर समाज काय म्हणेल? समाज आपल्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? आपल्याला वाळीत तर टाकणार नाही ना? या आणि तत्सम शंका मनात आल्याने रोग दडवायचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे दूरदर्शनवर विविध माध्यमांद्वारे दाखवल्या जाणा-या कोरोना इस्पितळातील दुर्दशा, रुग्णांचे होत असलेले हाल, खाजगी इस्पितळांतून आकारली जाणारी भली मोठी बिले यासारख्या नकारात्मक बातम्यांचा भडीमार रुग्णाचे आधीच मनोधैर्य कमी करतो व रुग्ण नकारात्मक रीतीने विचार करू लागतो. 'मी या रोगातून नक्की बरा होईन' ही भावनाच दुर्दैवाने नाहीशी होते व इच्छाशक्तीवरच घाला पडतो. पण असे होता कामा नये. हे अत्यंत दुर्दैवी आहे. नागरिकांनी सध्याच्या काळात रोग अंगावर न काढता वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन ठोस उपाययोजना करून रोगाला हद्दपार केले पाहिजे.
 
वास्तविक पाहता कोरोनाबाधित व्यक्तीला इस्पितळात दाखल केल्यानंतर त्याच्या आजाराच्या परिस्थितीनुरूप औषधोपचार केले जातात. रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे दिली जातात. व रुग्ण पूर्णपणे वैद्यकीय निरिक्षणाखाली असतो. जर प्राणवायू घेण्याची रुग्णाची क्षमता कमी होत असेल तर बाहेरून प्राणवायू दिला जातो. व अगदीच गरज पडली, जी फार कमी रुग्णांना लागते, तर रुग्णांना कृत्रिम पद्धतीच्या श्वसन यंत्रणेवर ठेवले जाते, ज्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. रोगाची लक्षणे आटोक्यात येण्याची औषधे, रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्याची औषधे, दोन वेळचे सकस व पोषणमूल्य असलेले जेवण व एक वेळची न्याहरी व आठ ते दहा तास पुरेशी झोप घेतल्यास इतर काही व्याधींची गुंतागुंत नसेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येतो. साधारण आठवड्याभराने परत रुग्णाची चाचणी केली जाते व अहवाल नकारात्मक आला की रुग्णालयातून घरी सोडून स्वतःच्याच घरात १४ दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो.
 
त्यामुळे या आजाराने काळजीग्रस्त होण्याचे कारण नाही, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोटभर सकस जेवा, व्यायाम करा, रोज पुरेशी ८ तासांची मस्त झोप घ्या. सर्दी व खोकला होईल असे थंड पदार्थ कटाक्षाने टाळा, व्हिटॅमिन सी असलेली फळे खा की ज्यायोगे प्रतिकारशक्ती वाढेल. घरात व कार्यालयात वातानुकूलन यंत्राचा वापर करू नका, मोकळी खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश येईल असे वातावरण ठेवा आणि मुख्य म्हणजे वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या बुद्धीने औषधे घेऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. बाहेर जाताना मास्क वापरा. हात सतत स्वच्छ धुवा. एकंदरीतच परिसरात, घरात स्वच्छता राखा. आणि मुख्य म्हणजे सुरक्षित अंतर राखा. स्वतः आनंदी रहा व आनंद पसरवा. सकारात्मक विचाराने व ठोस कृतिशील उपाययोजनांनी कोरोना विषाणूच्या भीतीचा मनातील ब्रह्मराक्षस गाडून टाका! म्हणूनच सुरक्षित वावर वाढवा आणि कोरोनाला घालवा!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई