अरे मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?

Source :    Date :06-Jun-2020   
|
शनिवार, दि. ६ /६ /२०२०
 
फावल्या वेळात इंटरनेटवर बातम्या चाळत असताना एका भुकेल्या गर्भवती हत्तिणीला फटाकेयुक्त अननस खायला दिल्याने तिचा तडफडून मृत्यू झाल्याची बातमी वाचनात आली. केरळ राज्यात मलप्पुरम् येथे प्राण्यावरील अत्याचाराची घटना घडली आहे. अन्नाच्या शोधात ही मलप्पुरम् जिल्ह्यातील भुकेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. काही खोडकर व निर्दयी लोकांनी या गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात वाढणा-या तिच्या पिल्लासह तिचा मृत्यू झाला. हत्तिणीने माणसावर विश्वास ठेवला. हत्तिणीला केवळ स्वतःलाच नव्हे तर तिच्या पोटातील पिल्लाला- बाळालाही त्रास झाला असावा. केव्हढे हे मानवाचे क्रौर्य!
 
 
darks_1  H x W:
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील 'अरे मानसा मानसा, कधी व्हशील मानूस?' ही ओळ आज आठवली व पुन्हा एकदा माणसाला असे विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते. त्या निर्मिकाने ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्यात जीव, जंतू, झाडे, वेली, नदी, नाले, वन्यप्राणी, सागर, डोंगर याचबरोबर मानवालाही जन्माला घालून सगळ्या चराचर सृष्टीमध्ये रंग भरून सर्वांना चेतना दिली. निर्मिकाने सर्व काही उगीच निर्मिले नाही. प्रत्येक निर्मितीपाठी त्याचे काही प्रयोजन होते. सूक्ष्मातिसूक्ष्म जीव जंतूही कुठले ना कुठले कर्म घेऊन या भूतलावर आला व रुजला. ईश्वराने माणूस या त्याच्या कलाकृतीत जरा जास्तच प्राण ओतला आणि त्यामुळे माणसाला मन दिले, बुद्धी दिली व भावना दिल्या. त्याचबरोबरीने जगण्याचे नवरस, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, कर्तृत्वही दिले. त्यातूनच पुढे अहंकार, उन्माद व षड्रिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) हेही आले आणि येथेच काहीतरी गडबड झाली. सर्वकाही चांगले मिळूनही मानवाच्या निर्मितीच्या रचनेला षड्रिपूंच्या उपस्थितीने काळीमा लागला आणि त्यामुळे माणूस बेदरकारपणे वागू लागला. केवळ 'मी आणि मलाच' या भावनेने तो आंधळेपणाने वर्तन करू लागला. सर्वत्र स्वतःच वरचढ ठरण्याच्या भावनेने तो पेटून उठला व अराजकास सुरवात झाली.
इतर प्राणी आपापल्या विश्वात मश्गुल असतात. खेळावे, बागडावे, जोडीदार शोधावा, अन्नाचा शोध घेऊन क्षुधा शांत करावी. पाणी पिऊन तृषा शांत करावी आणि वंश वाढवावा. त्यांच्यात इतर व्यवहारच नाहीत. केवळ 'खाणे, पिणे व विणे' यापुरतेच काय ते आयुष्य मर्यादित! पण माणसाला मिळालेल्या बुद्धीच्या जोरावर अधिक बलवान झालेला माणूस षड्रिपूंच्या अस्तित्वाने अंध झाल्याप्रमाणे त्याचा प्रगतीकडे सुरू झालेला प्रवास अधोगतीकडे कधी वळला हे खुद्द मानवालाच कळले नाही.
माणसामाणसातसुद्धा जाती, धर्म, वंश, भाषा यावरून विभागणी झाली. नवनवीन शोध लागत गेले. पण त्यातून माणसाचा सहृदयतेचा आत्मा विरून गेला. जग जिंकण्याच्या नादात जीवन हरवून बसला. नफा- फायदा यासाठी लबाडी, फसवणूक आली. जीवघेणी स्पर्धा आली आणि माणूस हा माणूस उरला नाही. संशोधन करून माणसाने अनेक गुढे उकलली.थेट अंतराळात जाऊन पोचला. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली. अगदी निसर्गावरसुद्धा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. सकारात्मक प्रवास झाला तेव्हढाच माणूस नकारात्मक व माणुसकीला कलंकीत करणारी कृत्ये करण्यात मागे राहिला नाही. वास्तविक पाहता बुद्धी नसूनही जंगलामध्ये सर्व प्राणी त्यांच्या निसर्गनियमाला अनुसरून सुखेनैव संचार करीत असतात. जंगलात वाद नाही, दंगल नाही, हेवा नाही, तसेच गैरवाजवी स्पर्धापण नाही. मग या माणसाचेच असे अधःपतन का बरे होते आहे? कुठे पोचायचेय माणसाला?
 
खरे पाहता आताच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण विश्वात एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूने थैमान घातले असताना संपूर्ण जग ठप्प करून ठेवलेले असताना आपण निसर्गचक्रात बदल करून काही चूक तर केली नाही ना, असा विचार करण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली आहे. सदैव वरचढ होण्याच्या भावनेने पछाडलेले असताना निसर्ग साखळीलाच कुठे धोका पोहोचवलेला नाही ना, यावर गंभीरपणे विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. या वैश्विक महामारीच्या काळात कित्येक माणसे अत्यंत धडाडीने देवाच्या रूपाने जनतेला मदतकार्य करीत आहेत. तर दुसरीकडे काही खोडकर निर्दयी माणसे जनावरांना, वन्य प्राण्यांना त्रास देण्यात, त्यातून स्वतःचे मनोरंजन करून घेण्यात मश्गुल आहेत. अजून किती मानवाचे अधःपतन व्हायचे बाकी आहे? 'माझ्या मनाप्रमाणे, केवळ माझ्या आनंदासाठी जगण्याच्या ईर्षेने' आपण अजून किती प्राणीमात्रांचे बळी देणार? हे सर्वच भयंकर असून निषेधार्ह आहे. माणसाने स्वतःच्या अधःपतनाची परिसीमा गाठली आहे हे निःसंशय! एका सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूमुळे जगातील लाखोजण मृत होत असताना अजूनही माणसाचा उन्माद- माज- मस्ती कमी झालेली दिसत नाही. पण दुर्दैवाने निसर्ग माणसाला धडा शिकवल्याशिवाय राहात नाही. पण एव्हढ्या वैश्विक महामारीतून प्रवास करत असूनसुद्धा जर आपण काहीच शिकणार नसू तर तो माणूस जातीला प्रचंड मोठा काळीमा आहे. तेव्हा वेळीच स्वतःला सावरण्याची, सुधारण्याची गरज आहे. आणि अशा मूक जनावराच्या जीवाशी खेळ करणा-या माणसांचा धिक्कार करावा तेव्हढा थोडाच आहे.
 
तेव्ह मंडळी, आपण अधिक सजगतेने वागू या. आपल्या मनाची काळी बाजू प्रकाशमान करू या. स्वतःला सुरक्षित करू या, कोरोनाला हरवू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई