रेल्वे नव्हे, जीवनवाहिनी!

Source :    Date :07-Jun-2020   
|
रविवार, दि. ७/ ६/ २०२०
 
परवाच्याच दिवशी डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेला जाताना रेल्वे पादचारी पूल ओलांडण्याचा प्रसंग आला. नेहमी माणसांची दुथडी भरून वाहणारा रेल्वे पूल व त्याखालील लांबच लांब जाणा-या रुळांवरून क्षणाक्षणाला धावणा-या रेल्वे गाड्या, मग त्या मालगाड्या असोत वा बाहेरगावच्या प्रवासी वाहतुक करणा-या गाड्या असोत वा मुंबई ते कर्जत, मुंबई ते कसारा प्रवास करणा-या रेल्वे उपनगरी गाड्या असोत, याचे लोभसवाणे दृश्य गेल्या कित्येक दिवसांपासून दिसणे दुरापास्त झाले आहे. खचाखच गर्दीने भरलेली रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्या व त्यांचा रुळावरून धावताना येणारा दूरपर्यंत पोचणारा एकसुरी आवाज व त्यांचे कर्णकर्कश भोंगे आज सारे हवेहवेसे वाटत आहे. साधारण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रेल्वे वाहतुक गर्दी टाळण्यासाठी सरकारतर्फे बंद करण्यात आली व प्रथमच रेल्वे कर्मचा-यांनी ७०च्या दशकात केलेल्या संपानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांची व उपनगरी रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली व त्यामुळे सर्व जनजीवनच यातायात थांबल्याने एकाच ठिकाणी स्थिर झाले.
 

Railways_1  H x 
'देशाची जीवनवाहिनी' हे ब्रीदवाक्य घेऊन अविरत यातायात करणारी भारताची रेल्वे ही भारत सरकार नियंत्रित सार्वजनिक सेवा आहे. ही रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतात रेल्वेमार्गाची एकूण लांबी साधारणतः एक लाख किलोमीटरपेक्षाही जास्त असून भारतीय रेल्वे दररोज साधारण २ कोटी २५ लाख टन मालाची वाहतूक करते. १६ एप्रिल १८५३ मध्ये व्हि. टी. ते ठाणे असा पहिलावहिला प्रवास करणा-या भारतीय रेल्वेचे सन १९५१ मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. साधारण २५,००,००० इतके कर्मचारी असणा-या या कंपनीसाठी रेल्वे मंत्रालयाची स्वतंत्र व्यवस्था असून तिचे १६ रेल्वे विभाग व स्वतंत्र कोकण रेल्वे काॅर्पोरेशन असे एकूण १७ विभाग आहेत. भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक संस्थेत होते, जी कर्मचारी संख्येत फक्त चिनी लष्करापेक्षा लहान आहे. एका अहवालाच्या प्राप्त माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ मालवाहू डबे, ३०,२६३ प्रवासी डबे व ७,७३९ इंजिने आहेत व रोज ८७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १४४४४ गाड्या धावतात.
 
उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी अनेक शहरांमध्ये स्वतंत्र रेल्वेप्रणाली चालवली जाते. तसेच मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई व कोलकाता या शहरांमध्ये मेट्रोसेवा कार्यरत असून नवनवीन मेट्रो मार्गांची निर्मिती करण्याचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणा-या उपनगरीय गाड्या इ एम यु (इलेक्ट्रिक मोटर युनिट) या तत्त्वावर आधारित असून सर्वसाधारणपणे त्या ६ डबे, ९ डबे, १२ डबे व कधीकधी १५ डब्यांच्याही असतात. साधारणतः एका डब्यातून ४५० ते ५०० प्रवासी प्रवास करतात. इतर उपनगरीय वाहतुकीच्या तुलनेत मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्या खूपच जास्त प्रवासी संख्या हाताळतात. सर्वसाधारणपणे या प्रणालीमध्ये ४ मार्ग आहेत. पश्चिम, मध्य, हार्बर व ट्रान्स हार्बर. या चारही मार्गावरून साधारण दररोज ७५ लाख प्रवासी ये- जा करतात. दैनंदिन व्यवहारासाठी मुंबईकर या उपनगरीय सेवेवर अवलंबून असल्याने मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईची नस मानली जाते.
 
कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात जरी उपनगरीय रेल्वे सेवा गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांसाठी बंद ठेवली असली तरी 'कोणतीही रेल्वे गाडी अविरतपणे रुळावर सदैव धावतच असते.' या न्यायाने भारतीय रेल्वेने देशव्यापी टाळेबंदीच्या काळात ११५० टन वैद्यकीय मालाची वाहतूक केली. या काळातही विभागीय रेल्वे वेळापत्रकानुसार धावणा-या गाड्यांमुळे औषधे व इतर वैद्यकीय उपकरणांच्या वाहतुकीला वेग आला आहे. वैद्यकीय सामानाबरोबरच अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूही देशाच्या कानाकोप-यात पोचवण्याचे महान कार्य रेल्वेने या टाळेबंदीच्या काळात पूर्णत्वास नेले. त्यानंतर मे महिन्यापासून स्थलांतरित मजूरांना देशाच्या कानाकोप-यातून त्यांच्या गावी सोडण्यासाठी रेल्वेने 'श्रमिक एक्स्प्रेस' या नावाने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली व ती सेवा आजही चालू आहे.
 
या संकटाच्या काळात भारतीय रेल्वे मानवी जीवनाचे महत्त्व जाणून आहे. एप्रिल महिन्यात एका गतिमंद (ऑटिस्टिक) लहानग्याच्या पालकांनी समाजमाध्यमावरून मदतीसाठी हाक दिल्यावर त्याच्यासाठी अजमेरहून मुंबईला पार्सल रेल्वेने स्किम्ड कॅमल दुधाचा पुरवठा करण्यात आला. तसेच अजमेरच्याच अजून एका दुर्धर आजाराशी झुंजत असलेल्या मुलासाठीचा औषधाचा साठा संपत आल्याने रेल्वे अधिका-यांनी औषधे अहमदाबादहून अजमेरपर्यंत रेल्वेने पाठवून त्या मुलाला जीवनदान दिले. आज कित्येक बाहेरगावच्या रेल्वे गाड्यांचे रूपांतर कोरोनाच्या रुग्णांसाठी इस्पितळात केले आहे व तिथे प्राणवायूच्या पुरवठ्याची सोयपण केलेली आहे.
 
अशी ही प्रवाशांच्या आयुष्याची नस असलेली जीवनवाहिनी रेल्वेगाडी लवकरात लवकर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी पूर्वपदावर येणे गरजेचे असले तरी विषाणू संक्रमणाचा धोका जास्त असल्याने सध्यातरी काही काळ प्रवाशांसाठी प्रतिक्षेचाच असणार आहे. अशा या जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे व त्याच्या कर्मचा-यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!
 
मंडळी, आपण सध्यातरी विषाणू नष्ट होण्याची प्रतीक्षा करू या की जेणेकरून उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सिद्ध होईल! म्हणूनच आपण आपला सुरक्षित वावर वाढवू या! कोरोनाला हद्दपार करू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई