देऊळ बंद!

Source :    Date :08-Jun-2020   
|
सोमवार, दि. ८ /६ / २०२०
 
टाळेबंदी उठवण्याच्या दृष्टीने करावयाच्या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात दि. ८ जूनपासून केंद्र सरकारने जेथे प्रतिबंधित क्षेत्र नाही तेथील मंदिरे उघडण्यास आरोग्य मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्ती यांना अधीन राहून परवानगी दिली आहे. साधारणतः गर्दी टाळण्याच्या हेतूने महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यापासून मंदिरे बंद झाली . जरी मंदिरे बंद असली तरी रोजच्या पूजाअर्चा, आरत्या चालू आहेत. परंतु भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद केल्याने गर्दी टाळणे शक्य झाले व पर्यायाने साथीचे संक्रमण आटोक्यात ठेवण्यास मदत झाली. काही वर्षांपूर्वी एक 'देऊळ बंद' नावाचा मराठी चित्रपट आला होता. त्यातील कथेचा अतिरंजित भाग वगळला तर शास्त्र व श्रद्धा यातील वैचारिक द्वंद्व त्यामध्ये उत्तम रीतीने दर्शविण्यात आले होते. ज्याप्रमाणे सुखी मानवी जीवनासाठी शास्त्राची, संशोधनाची जरुरी आहे, त्याप्रमाणेच मनःशांतीसाठी, मनोधैर्य संतुलित राखण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता आहे. अर्थात श्रद्धास्थाने निरनिराळी असू शकतात हे निःसंशय! परंतु सर्वसामान्य माणसासाठी धर्म- धार्मिक भावना ह्या अफूच्या गोळीप्रमाणे काम करतात व समाजातील मोठा वर्ग आस्तिक बनतो. अर्थात त्यात गैर असे काहीच नाही. फक्त श्रद्धा व अंधश्रद्धा यातील सीमारेषेचे भान बाळगले म्हणजे बरे!
 

temple_1  H x W 
 
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ देवळे बंद असल्याने भक्तांकडून देवळामध्ये दानपेट्यात जमणारा निधी आणि मंदिरांना देणगीरूपात मिळणा-या निधीचा स्त्रोत पूर्णपणे ठप्प झाला आहे. उपलब्ध असलेल्या गंगाजळीतून अनेक मंदिरांनी यापूर्वीच कोरोना संकटाशी लढण्यासाठी जनतेला वस्तू वाटपाच्या माध्यमातून किंवा स्थानिक प्रशासन, राज्य सरकार व केंद्र सरकार यांना भरीव आर्थिक मदत दिली आहे. महाराष्ट्रातील मंदिरे रोजच्या पूजाअर्चा, उत्सव या व्यतिरिक्त त्यांना मिळणा-या निधीचा उपयोग लोकोपयोगी कामासाठी वर्षभर करीत असतात. जसे की रुग्णांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना मदत, पुस्तके देणे, ग्रंथालये चालविणे, आरोग्य केंद्र चालविणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, इतर वेळी येणा-या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना मदत करणे इत्यादी. हा सर्व खर्च भाविकांनी दानरूपात दिलेल्या निधीतून होत असतो. परंतु काही तथाकथित नास्तिक जनतेचा यावरही आक्षेप असतो. त्यांच्याकडून भारतातील देवळांच्या कमाईवर सवाल उठवला जातो. देवळांना पैसे द्यावेच का? इथपासून ते पैसा समाजातील गोरगरीब जनतेला, अडल्या नडलेल्यांना देऊ शकत नाही का?
 
  इथपर्यंत विचार करता उपरोक्त मुद्दा बरोबर आहे. चुकीचा नाही. पण हीच माणसे चित्रपट, आय पी एल आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे 'मद्य अथवा दारू' या तीन गोष्टीवरील जनतेने केलेल्या खर्चाबाबतीत कधीही अवाक्षर काढत नाहीत. या तीन गोष्टींवर केला जाणारा खर्च अडल्या- नडल्यांसाठी मदत रूपात नाही का खर्चता येणार? कितीतरी चित्रपट शेकडो कोटी रुपयांचा धंदा करतात. यावर्षीचा 'आय पी एल'चा टर्न ओव्हर १,२०० कोटी रुपयांचा आहे. शिवाय 'बी बी सी'ने प्रक्षेपणाच्या केलेल्या कराराची किंमत ८,२०० कोटी रुपये आहे. द हिंदू यांनी दिलेल्या अहवालानुसार भारतात दरवर्षी १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा व्यवहार दारू विक्रीमधून होतो. देवळांच्या आर्थिक व्यवहाराची तुलना करण्यासाठी या तीन गोष्टींचा व्यवहार पुरेसा आहे. आणि या तीन गोष्टी घेतल्या आहेत, कारण देवळातील देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून स्वेच्छेने जाते, त्याचप्रमाणे या तीन गोष्टींवरचा खर्चही सर्वसामान्यांच्या खिशातून स्वेच्छेने केलेला असतो. परंतु गमतीचा भाग असा की या सर्व गोष्टी आपण आता गरज या सदरात टाकलेल्या आहेत. पण त्याचवेळी देव हीदेखील समाजातील काही घटकांची भावनिक गरज आहे, हे आपण मान्य करत नाही. 'माझा देव ही माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे आणि तिचे सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खर्च करावा लागणार.' हे आपण मान्य करीत नाही.
 
लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोटींमध्ये हिशेब आहे तो बाहेर काढायला आपण पुढे सरसावतो. त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, हे हिशेब आपण हिरीरीने मांडतो. पण 'आय पी एल'चं तीन- चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचा खर्च निघू शकेल असा विचार हे तथाकथित शहाणे करीत नाहीत. मंदिरांच्या देणगीचा किंवा जमणा-या निधीचा योग्य विनियोग व्हावा, त्याचा हिशेब चोख ठेवला जावा, त्यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये हे निःसंशय! त्यासाठी उपाययोजना करायला हव्यात हेही तितकेच खरे. पण मंदिरांना देणग्याच देऊ नका, हे कसे मान्य करणार? त्यामुळे स्वतःची बुद्धी गहाण टाकून, बुद्धिभेद करणा-या तथाकथित अतिशहाण्यांच्या विचाराला बळी पडून मंदिराची देणगी थांबवता कामा नये. त्याचा हिशेब जरूर मागावा. पण मदतीचा ओघ थांबता कामा नये. कारण मंदिरांकडून भरपूर प्रमाणात लोकोपयोगी कल्याणकारी कार्ये होत आहेत. ज्याप्रमाणे समाजातल्या तळागाळातल्या लोकांना हात देणे हे आपले कर्तव्यच आहे, त्याचप्रमाणे सेवारूपी देव, देश आणि धर्म- मानवतेचा धर्म यांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण विसरता कामा नये
 
आणि मंडळी, त्यासाठीच आपण आपला सुरक्षित वावर वाढवू या आणि कोरोनाला हरवू या!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई