卐 बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल 卐

Source :    Date :01-Jul-2020
|
बुधवार, दि. १ / ७ / २०२०
 
 
     Vitthal_1  H x
 
 
आज देवशयनी आषाढी एकादशी! प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस वेळा एकादशी येते. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यातही आषाढी एकादशीचे महत्त्व अधिक मानण्यात येते. आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती व मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. सर्व जाती- जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णव धर्मच होय.
 
विठुरायाच्या नामगजरात निघणा-या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या वारक-याचे तन, मन आणि धन सर्वकाही विठ्ठलाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. पंढरपूरची पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जीवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे.
 
भारतीय संस्कृतीत सन्मार्गाने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यास सांगितली आहेत. 'परोपकाराय पुण्याय' हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडला. पण त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे. याची कमीअधिक प्रचीती प्रत्येकास येतच असते. त्यामुळे मनाची स्वाभाविक चंचलता कमी करून सरावाने मनोनिग्रह करणे अत्यावश्यक आहे. मनावर नियंत्रण हा यशाचा राजमार्गच असतो. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. एकादशी हे व्रत प्रत्येक माणसाने आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे. 'नर का नारायण' होणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकीर्तनाने नक्कीच साध्य होतो.
 
अशा या देवशयनी आषाढी एकादशीच्या पुण्यपर्वावर भक्तिरसात नाहून निघणे, हा एक पवित्र व मंगलदायी अनुभव आहे. आत्मा आणि परमात्मा तादात्म्य पावणे म्हणजे काय? सामान्य माणूस आणि ईश्वर यांचे अद्वैत कसे असते? मानवी मन त्या जगन्नियंत्याच्या चरणी लीन होणे कसे असते? या सर्वांचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर पंढरपूरच्या वारीतील वारक-याचे दर्शन घ्यावे. ज्याच्या मुखी केवळ 'माऊली माऊली' या शब्दांचाच गजर आहे व हरिनामातच ज्याचे भान हरपले आहे त्या वारक-याचे दर्शन हे भगवंताच्या दर्शनापेक्षा वेगळे आहे काय? केवळ देवळाच्या कळसाचे दर्शन घेऊन त्यात धन्यता मानणारा वारकरी हा नक्कीच वंदनीय आहे. आजच्या ज्या व्यापारीकरणाच्या बाजारू जगात जेथे पैसा, नफा- तोटा या भोवती चक्रे फिरत असतात त्या जगात वारक-यांच्या असीम श्रद्धेची कल्पना कशी बरे करणार? मुखाने सदैव हरिनामात मग्न असणारा वारकरी आपली सर्व प्रापंचिक दुःखे, संसारातील कष्ट केवळ त्या भगवंतावरील अपार श्रद्धेपायी व गाढ विश्वासामुळे माऊलीवर सोपवतो व सदैव हरिनामाचा गजर करण्यात धन्यता मानतो यातच त्या वैश्विक कल्याणकारी पांडुरंगाची महती दडलेली आहे. इतकेच या निमित्ताने म्हणावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई