|| जाणिजे कलामर्म ||

Source :    Date :12-Jul-2020   
|
रविवार, दि. १२/ ७/ २०२०
 
श्री  गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे, असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. संस्कृत पंडितांनी कला या शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. कल म्हणजे सुंदर, कोमल, मधुर व सुख देणारे आणि त्याला अनुकूल असेल ती कला होय. आनंद देणारी ती कला असेही सांगण्यात आले आहे. दहाव्या शतकातील ग्रंथकारांनी म्हटले आहे की कलावंत एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा जो आविष्कार करतो त्याला कला म्हणावे. ईश्वराच्या कर्तृत्वशक्तीचा जो आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो तीच कला होय. कलाकार हा नवीन काही निर्मिती करीत नाही. तर तो अस्तित्वात असलेल्याचाच शोध घेतो. तर नोबेल पारितोषिकाने सन्मानित केलेले भारतीय लेखक रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की माणूस आपले प्रतिबिंबच कलेच्याद्वारे व्यक्त करीत असतो. कला म्हणजे अभिव्यक्ती. अभिव्यक्ती ही प्रथम माणसाच्या मनात असते व नंतर तिचा बाह्य आविष्कार होतो. प्राचीन ग्रंथांमध्ये चौसष्ट कलांची नावे देण्यात आली आहेत. कालानुरूप त्यामध्ये नवनवीन कलांची भर पडली आहे हे निःसंशय!
 

skills_1  H x W
 
 माणसाला पूर्णत्वाची नेहमीच आस असते, ओढ असते. पूर्णता हे त्याचे स्वप्न असते. परंतु दुर्दैवाने मानवी जीवन हे कधीच परिपूर्ण नसते आणि म्हणूनच माणूस कलेच्या माध्यमातून त्याची पूर्णतेची इच्छा अभिव्यक्त करीत असतो. कोणत्याही कलेमध्ये अत्युच्च दर्जाचे कौशल्य प्राप्त करून मानवी जीवनातील पूर्णत्वाचे स्वप्न फलद्रुप करीत असतो. मानवाकृत कला ही मानवाने स्वानंदासाठी अंगीकारलेली निर्मितीप्रक्रिया आहे. त्यामुळे कलाविष्कारात मानवी आशय अंतर्भूत असणे अपरिहार्य आहे. कला ही जादुगारासारखे काम करते. तिचा स्पर्श वस्तूला, विचारांना अगर भावनांना झाला की त्यांना चिरंतन रूप प्राप्त होते. मनुष्याच्या मनात अनेक भावना थैमान घालत असतात. या भावना उत्कट झाल्या म्हणजे त्यांना प्रत्यक्षरूप देणे भाग असते. मग या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार चित्र, शिल्प, गायन, वादन, कविता, नृत्य, अभिनय यासारख्या कलांतून मूर्त स्वरूपात येतात. हे मूर्त स्वरूपात आणताना त्याला कौशल्य दिले की ती कला होते. कौशल्य कशासाठी? तर सुंदरता हा कलेचा आत्मा आहे आणि सुंदरता आणण्यासाठी कौशल्य आवश्यक असते. कलेचा संबंध माणसाच्या आचार, विचार, भावना व निसर्गातील घटकांशी असतो. खरे पाहता, सर्व प्रकारची कला म्हणजे आत्म्याचे प्रगटीकरण!
 
मानवी जीवनाच्या बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धापकाळ या तिन्ही अवस्थेत कला मानवास साथ देते. मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असे बुद्धीचे वरदान लाभले असल्याने त्याची इतरांपेक्षा विकसित व उच्च दर्जाची जीवनप्रणाली अविभाज्य अंग बनली आहे. जसजसा मानवाचा सांस्कृतिक विकास होत गेला तसतशी कला त्याच्या जीवनात ठामपणे दृढमूल झाली आणि एक मात्र खरे की कलेचा विकास हा कोणत्याही शास्त्रीय प्रगतीवर अवलंबून नाही. माणूस रानटी अवस्थेतून संस्कृतीच्या दिशेने विकसित होत गेला तो परिपूर्णतेच्या ओढीने. अनेक कला जगात आहेत, खूप परिपूर्णतेची स्वप्ने मनात आहेत; पण सगळ्या कलांत महान कला मानवाने शोधली... ती म्हणजे जीवन जगण्याची कला!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई