|| दाता भवति वा न वा ||

Source :    Date :14-Jul-2020   
|
मंगळवार, दि. १४/ ७/ २०२०
 
मध्यंतरीच्या काळात संस्कृत सुभाषितांचा अभ्यास करीत असताना दानशूर व्यक्तीची उपलब्धता किती दुर्मीळ असते हे दर्शविणारे सुभाषित वाचनात आले. सुभाषितकार असे म्हणतात की,
 
शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः|
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||
 
अर्थात् शंभरात एक शूर निपजतो, हजारात एक पंडित असतो, दहा हजारात एक वक्ता मिळतो, पण दानशूर व्यक्ती मिळणे खूपच मुश्किल आहे. का बरे असे सुभाषितकार म्हणतात? दान एव्हढी कठीण क्रिया आहे? दानाची महती एव्हढी असूनसुद्धा दानशूर व्यक्तींची समाजात वानवा असावी?
 

Daan_1  H x W:  
 
भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली संस्कृती ओळखली जाते. विविध पर्वकाळात विविध प्रकारचे दान करावे हे आपली संस्कृती शिकवते. प्रत्येक व्यक्तीने काही ना काही दान करावे असे आपले शास्त्र सांगते. दान व्यक्तीस मोह, माया, मत्सर यासारख्या प्रवृत्तीपासून दूर कसे राहावे हे शिकवते. दा (ददाति) या धातुवरून 'दान' या मूळ संस्कृत शब्दाची निर्मिती झाली आहे. व्यक्तीने प्रदर्शन न करता केलेले सत्कार्य, चांगले काम म्हणजे दान होय. याचाच अर्थ व्यक्तीने कोणतीही परतफेडीची अपेक्षा न बाळगता केलेले कार्य म्हणजे दान होय. अशा प्रकारचे कार्य केल्यास माणसाला आत्मिक समाधान प्राप्त होते व त्या व्यक्तीचा त्याच्या सुप्त मनाशी संवाद साधला जातो व हा सुप्त मनाशी संवाद साधणे म्हणजेच पुण्य प्राप्त होणे असे भारतीय अध्यात्म सांगते. म्हणूनच दानातून पुण्य प्राप्त होते असे म्हणतात.
 
तसे बघितल्यास मनुष्यप्राणी हा लालसी आहे. अनेक गोष्टींची लालसा त्याच्या मनात दडलेली आहे. या लालसेमुळेच त्याचा सुप्त मनाशी संवाद साधला जात नाही व माणसास मनःशांती मिळत नाही. सुप्त मनाशी संवाद व्हावा, आत्म्यास त्याला बोध व्हावा म्हणून दान करावे असे आपले शास्त्र सांगते. हे दान करताना ते प्रसिद्धीसाठी नसावे म्हणजेच उजव्या हाताने केलेले दान हे डाव्या हातासही कळू नये असे म्हणतात. धन किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती 'दानी' म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती महादानी म्हटली जाते. तर गुण व शक्तीचे दान करणारी व्यक्ती वरदानी म्हटली जाते. मात्र ईश्वरीय ज्ञानानुसार यथार्थ दान तेच असते ज्या दानाने देणारा व घेणारा या दोहोंचेही जीवन सर्वकाळ सुखमय होते.
 
औदार्य व परोपकार यामध्ये मानवतेची प्रतिष्ठा सामावलेली असल्यामुळे सत्पात्री दान करण्याच्या प्रवृत्तीचा सर्व धर्मांनी पुरस्कार व गौरव केलेला आढळून येतो. दानाला जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच ते सामाजिकदृष्ट्यासुद्धा अतिशय मोलाचे आहे. भूदान, दुष्काळप्रसंगी अन्नदान, साथीच्या काळात रक्तदान वगैरे वगैरे. दानाच्या मोहिमेचा समाजात हिरीरीने पुरस्कार व प्रचार होत असलेला आपल्याला आढळून येतो व तो समाजस्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी अत्यावश्यक आहे. बिल गेटस्, वाॅरन बफे सारखी मंडळी त्यांनी कमावलेल्या आर्थिक संसाधनातून बराचसा भाग समाजासाठी दान स्वरूपात देतात. तर कै. बाबा आमटे, डाॅ. प्रकाश आमटे, सिंधूताई सपकाळ यासारख्या व्यक्ती त्यांचे आयुष्यच समाजसेवेसाठी दान म्हणून देतात. त्याचप्रमाणे पाऊस, ऊन, थंडी यांचा बाऊ न करता देशाच्या रक्षणासाठी लढणारे सैनिक देशासाठी हौतात्म्य पत्करून देहाचे बलिदान देतात. तसेच आजकालच्या काळात मरणोत्तर स्वतःच्या अवयवांचे दान करून स्वतःच्या मृत्यूनंतरसुद्धा एखाद्या रुग्णाच्या जीवनात आनंद निर्माण करता आला तर तोसुद्धा करण्याचा प्रयत्न अवयवदानाच्या माध्यमातून केला जातो. धन्य ते दाते! धन्य त्यांचे दातृत्व!
 
आपल्या संस्कृतीप्रमाणे परमार्थाचे परमोच्च साधन म्हणजे दान. असे दान करताना कोणताही स्वार्थ आडवा येऊ नये, अशी भावना आहे. शेवटी दान म्हणजे काय हो? कोणतीतरी आपल्याकडे असलेली गोष्ट दुस-याला विना खळखळ देणे. दान करणे हे प्रत्येकाला शक्य आहे का? निश्चितच आहे. अहो, काही नाही तर दुःखी माणसाच्या दुःखावर फुंकर घालण्याचे सांत्वनपर दोन शब्द तरी दान करू शकतो की नाही? खचलेल्या अपयशी माणसाला दोन शब्दांचे दान देऊन प्रोत्साहन तरी देऊ शकतो की नाही? संकटाशी दोन हात करणा-या माणसाला पाठीवर थाप मारून पाठींब्याचे दोन शब्द तरी बोलून दाखवू शकतो की नाही? किमान एव्हढे जरी केले तरी एखाद्या माणसाचे मनःस्वास्थ्य संतुलित राहण्यास मदत होईल व आपणांस दानाचे पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई