वारी ते परतवारी!

Source :    Date :06-Jul-2020   
|
सोमवार, दि.  / ७/ २०२०
 
महाराष्ट्रात पंढरपूरची वारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून माऊलीचे प्रत्यक्ष किंवा कळसाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी मिळेल त्या वाहनाने परततात. ज्ञानोबा, तुकोबा यासारख्या संतांच्या पालख्याही पंढरपुरात संतांचा मेळा झाल्यावर दोन दिवस विसावा घेऊन गुरुपौर्णिमा झाली की आपापल्या मुक्कामी परत जाण्यास रवाना होतात. आणि तीच परतवारी होय. पंढरपुरात पोचण्यासाठी जो प्रवास वीस दिवस पायी करतात तोच प्रवास परतवारीसाठी फक्त दहा दिवसांत करतात. मध्यंतरीच्या काळात या परतवारीच्या विषयावर श्री. सुधीर महाबळ यांनी लिहिलेले पुस्तक वाचनात आले होते व परवाच या पुस्तकावरील परीक्षणही वाचले. त्या निमित्ताने परतवारीच्या मनातील नोंदी जागृत झाल्या.
 

varkari_1  H x  
 
वारी सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे वारकरी खूप कमी आहेत. आठ ते दहा लाख लोकांचा सहभाग असलेल्या वारीच्या परतवारीत पालखीबरोबर केवळ पाचशे ते सातशे लोकांचा समावेश असतो. परतवारीला ना कोणता डामडौल, ना कोणता बडेजाव! वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक, स्वयंसेवी संस्था सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र परतवारी ही तुलनात्मक दुर्लक्षितच असते. यावेळी मात्र अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला सौंदर्याचे आकर्षण आहे तर परतवारीला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण! वारीतील सर्व वारकरी केवळ पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची इच्छा बाळगतात. हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक तृष्णेचे प्रतिबिंब आहे. तर परतवारी ही माऊलीच्या- विठुरायाच्या- दर्शनाने तृप्त झालेल्या मनाची कहाणी आहे. बाह्य सुखापेक्षा स्थायी सुखाचा शोध घेण्याची वृत्ती जोपासण्याची परतवारी हे सकारात्मक प्रतिबिंब आहे. वारीत विठ्ठलाला भेटण्याची असीम इच्छा असते तर परतवारीत माऊलीना भेटल्याने मनाला मिळालेले आध्यात्मिक समाधान असते. आणि त्या समाधानाच्या जोरावरच वारीचा वीस दिवसांचा पायी प्रवास परतवारीत दहा दिवसांत पूर्ण होतो.
 
वारीत काय किंवा परतवारीत काय, अध्यात्म जगायला मिळते. सध्याच्या काळात त्यात विज्ञानानेही शिरकाव केला आहे. त्यामुळे आगामी काळात आध्यात्मिक वारीबरोबर ती विज्ञानवारी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी व लोकशिक्षणासाठी वारी- परतवारीसारखे व्यासपीठ नाही. वारकरी संप्रदायाच्या रूपाने ऊर्जेची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. तिची सकारात्मक तत्त्वे आधुनिकतेत अंगीकारल्यास त्याचा समाजाला निश्चित चांगला उपयोग सोईल. वारी- परतवारीचा उपयोग विज्ञानाधिष्ठित संकल्पना समजावून देण्यास केला गेल्यास, म्हणजेच विज्ञानवारीद्वारे आरोग्यसंपन्न वारी होण्यास वेळ लागणार नाही व मानवाच्या हतबलतेपायी विठ्ठलाला चमत्कारासाठी साकडे घालण्याची भविष्यात गरज भासणार नाही व 'शहाणे करून सोडावे सकळ जन' या उद्दिष्टाची ध्येयपूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
 
थोडक्यात काय तर प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात ऐश्वर्याचे प्रतीक असलेली वारी वा वैराग्याचे प्रतिबिंब असलेली परतवारी एकदा तरी नक्कीच अनुभवावी. म्हणजे त्याची ऐहिक सुखाकडून आध्यात्मिक सुखाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही, एव्हढेच अंततः नमूद करावेसे वाटते.
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई