चाय पे चर्चा!

Source :    Date :07-Jul-2020   
|
मंगळवार, दि.  ७/ ७/ २०२०
 
गेले दोन तीन दिवस आषाढसरी आभाळातून धबाधबा कोसळत आहेत. त्यामुळे चहाप्रेमींची चहाची चाह मर्यादेबाहेर वाढली आहे. आले, मसाला घालून उकळवलेला मस्तपैकी वाफाळणारा चहा चहाप्रेमींच्याच नव्हे तर इतरांच्याही घशाखाली उतरला की अनोखी तरतरी येते. चहा कोणीही कधीही कितीही वेळा प्यावा! भले मग तो आजारी असल्याच्या निमित्ताने घेतलेला चहा असो वा लहानपणी दोन्ही हातांनी बशी धरून टाॅम अॅण्ड जेरी बघत आईने फुंकून दिलेला चहा असो! पत्त्यांचा डाव आणि गप्पांची मैफिल रंगात आल्यानंतरचा कांदाभजी बाजूला ठेवत अधाशासारखा घेतलेला चहा असो वा रिमझिम पावसात गाणी ऐकत गॅलरीमध्ये बसून घेतलेला चहा असो. सेमिनारमधला कागदी कपातला घोटभर चहा अन् घरचा आले- वेलचीचा पूर्ण कप भरून घेतलेला चहा असो! आनंद साजरा करण्यासाठी मित्राकडून उकळलेला चहा असो वा रात्रीच्या वेळी नातेवाईकांबरोबर हाॅस्पिटल ड्यूटी करताना जाग्रणं करताना घेतलेला चहा असो. रेल्वेगाडीतला 'डिप डिप'चा चहा असो वा 'लिप्टन'च्या मशिनातला चहा असो. काहीच सुचत नाही म्हणून घेतलेला चहा अन् काहीतरी सुचावं म्हणून घेतलेला चहा! चहा तो चहाच! चहा म्हणजे चहा असतो, तुमचा आमचा सेम असतो!


cutting_1  H x
 
हल्ली वैविध्याच्या युगात चहाची घराणी निर्माण होऊ लागली आहेत. उदा. येवले चहा, अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, मोरेचा चहा, शोभाचा चहा वगैरे वगैरे. वास्तविक पाहता चहाच्या क्षेत्रातही घराणेशाहीने केलेला प्रवेश बघून ख-या चहाभक्ताचे रक्त उसळल्याशिवाय राहणार नाही. गरीब असो वा श्रीमंत, सुशिक्षित असो वा अडाणी, विकसित असो वा अविकसित, शहरी असो वा ग्रामीण अशा प्रकारच्या माणसामाणसांमधील सर्व भेद विसरायला लावून एकजूट करणा-या चहाच्या बाबतीत चहाप्रेमी कदापीही घराणेशाही व भेदाचे राजकारण मान्य करणारच नाहीत. अन्यथा 'चाय पे चर्चा'चे महत्त्व ते काय उरले? त्याचप्रमाणे चहाच्या नवीन जातीही निर्माण होऊ लागल्या आहेत. उदा. ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हनी टी वगैरे. सच्च्या चहाप्रेमींना हा भेदाभेदसुद्धा मान्य नाही. खरा चहाभक्त सर्व चहा प्रकारांचा मनमुराद आनंद घेऊन जातीय सलोख्याचे उत्तम प्रदर्शन करीत असतो.
 
जगभरात १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात चहाचे शौकीन कोट्यावधींच्या संख्येने आहेत आणि अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरवात एक कप चहानेच करतात. चहाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागला हे एक सत्य अनेकांना माहीत नसेल. शीन् नुंग नावाच्या राजाच्या गरम पाण्याच्या कपात नजरचुकीने चहाचे वाळलेले पान पडले व त्या पाण्याचा रंग बदलला. राजाने त्या पाण्याची चव घेतली. तेव्हा त्याला तो स्वाद खूपच आवडला व त्यातून चहाचा शोध लागला. आज पाण्याच्या खालोखाल जगात सर्वाधिक कुठले पेय प्यायले जात असेल तर ते आहे चहा! सुरवातीला हे पेय फक्त हिवाळ्यात औषध म्हणून प्यायले जात असे. पण दररोज चहा पिण्याची प्रथा सर्वप्रथम भारतात १८३५ पासून सुरू झाली असे म्हणतात. आज जगात १५०० प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. चहा हे इराण आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रीय पेय आहे. वाफाळता चहा, उकाळा, बिनसाखरेचा चहा, दुप्पट साखरेचा चहा, पिचकवणी चहा, गारढोण चहा, दुधाचा चहा, कोरा चहा, पानी कम चाय हे चहाचे मानवनिर्मित प्रकार होत.
 
चहाच्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस असे असून ही वनस्पती १०-१७ मीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे ही झुडुपाच्या स्वरूपात दिसते. पाने साधी, जाड व एकाआड एक असून भाल्यासारखी, दंतूर काठाची व चकचकीत असतात. कोवळी पाने लवदार असतात. चहाच्या वनस्पतिची फुले पांढरी व सुवासिक असून त्याचे फळ कठीण असून त्यात १-३ बिया असतात. चहा वनस्पतीच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून चहा हे पेय तयार करतात. चहाची पाने हाताने खुडली जातात. पाने खुडताना शेंड्याकडील अडीच पाने खुडतात. या पानांपासून होणारा चहा सर्वोत्कृष्ट असतो. पानांवर केल्या जाणा-या प्रक्रियेनुसार चहाचे विविध प्रकार पडतात. चहामधील एल थेनाइन हे द्रव्य मेंदूची शक्ती वाढवते. तणाव कमी करते व बुद्धीचा विकास करते. यामुळे झोप पळून जाते असेही मानले जाते.
 
इंद्राला ताकसुद्धा दुर्लभ झाले होते. तसाच देवांना चहादेखील माहीत नव्हता. भक्त चहा पितात आणि तोसुद्धा अमृततुल्य आहे. म्हणून देवांनीसुद्धा हट्ट चालवला आहे की-
 
भक्ताहाती चहा पाहुनी| देवा वाटे हेवा||
म्हणू लागले एकमुखानी| आम्हालाही तो हवा||
अमृत आता कडू जाहले| गोड न लागे जीवा||
घरी जाऊनी हट्ट करीती| आम्हालाही चहा हवा||

...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई