उंदीरमामा की जय!

Source :    Date :08-Jul-2020   
|
बुधवार, दि. ८/ ७/ २०२०
 
नुकतीच मराठी सुप्रसिद्ध लेखक कै. जयवंत दळवी यांची 'मंगलमूर्ती आणि कंपनी' ही विनोदी कादंबरी परत वाचनात आली. सदर कादंबरीत मुंबईच्या चाळीत राहणा-या एका कुटुंबाने गणपती विक्रीचा व्यवसाय सुरू केला व मूर्तींबरोबर नेमका उंदीर न आल्याने उंदीर बनवण्यासाठी कसे नाना प्रकारचे उपाय योजले व त्यातून निर्माण झालेली धमाल वाचून वाचकांचे पूरेपूर मनोरंजन होते.
 

MOuse_1  H x W: 
 
 
उंदीर या सस्तन प्राण्याला जरी भारतासारख्या शेतीप्रधान देशात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. तसेच ते भारतीय हिंदू संस्कृतीत श्री गणपतीचे वाहन म्हणून आद्यपूजेचाही मान आहे. ज्यावेळी श्री गणपतीला जगप्रदक्षिणा आपला भाऊ कार्तिक याच्या आधी पूर्ण करायची होती त्यावेळी श्री गणेशाने आपल्या वाहनावर म्हणजेच उंदरावर बसून शिव- पार्वतीला म्हणजे आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा घातली व जगप्रदक्षिणेची स्पर्धा जिंकली. तेव्हापासून उंदीर हा भारतीय पर्यटन क्षेत्राचाही आयकाॅन बनला आहे. कमीतकमी वेळात पूर्ण विश्वाचे पर्यटन कसे करायचे याचा उत्तम वस्तुपाठच उंदराने घालून दिला आहे.
साधारण ३०- ५० ग्रॅम वजन असलेला व ८ ते १० सेमी लांबी असलेला बारीक शेपटीचा उंदीर हा सस्तन प्राणी असून त्याचे कान मोठे व तोंड छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. उंदरिणीची गर्भावस्था १०- २० दिवस असते व एका विणीमध्ये मादी उंदरास ५ ते १० पिल्ले होतात. उंदीर मुळात पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थलांतराबरोबरच मग उंदीर जगभर स्थलांतरित झाले. जगभर उंदरांच्या १३७ प्रजाती आहेत. उंदीर फक्त धान्य खातात. एव्हढेच नव्हे पण त्यापेक्षा धान्याची नासाडी जास्त करतात. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. उंदरांवर असलेल्या पिसवांमधून शंभर वर्षांपूर्वी प्लेगसारखी वैश्विक महामारी आली होती.
 
ज्याप्रमाणे उंदीर एकदा घरात किंवा कार्यालयात घुसला की जसा धूमाकूळ घालतो व तेथील लोकांची त्रेधातिरपीट उडवतो, बरोबर त्याच्या विरुद्ध उंदराच्या नावाशी साधर्म्य असलेला संगणकाचा माऊस मात्र लोकांचे जीवन सुसह्य करतो. माऊस हे संगणकाला माहिती पुरवण्याचे एक उपकरण आहे. आधुनिक संगणकाचे माऊस हे एक अविभाज्य अंग होऊन बसले आहे. डग्लस एंगलबर्ट या संशोधकाने सर्वप्रथम माऊसचा शोध लावला व जगात सर्वप्रथम माऊस १९८१ साली झेराॅक्स कंपनीने तयार केलेल्या संगणकात वापरला गेला. संगणकाचा माऊस हा एकतर वायरने संगणकाशी जोडता येतो किंवा हल्ली नवीन प्रकारचा वायरलेस माऊसही बाजारात उपलब्ध आहे जो संगणकाच्या ब्ल्यू टूथ हार्डवेअरद्वारे जोडता येतो.
 
वास्तवातला उंदीर काय किंवा संगणकाचा माऊस काय, स्वतः पळण्यात व इतरांना पळवण्यात वाकबगार! गळ्यात डमरू घालून राजाची मस्करी करणारा गोष्टीतला उंदीर असो वा संगणकावर मिकी माऊसच्या गोष्टी कार्टूनरूपात दाखवणारा माऊस असो, हा प्राणी बालकांच्या जीवनात मात्र अतिशय जिव्हाळ्याचा आहे हे मात्र नक्कीच! मानवी औषधे व लसी यांच्या चाचणीसाठी वापरले जाणारे उंदीर असोत की कृष्णाची तक्रार केली म्हणून गोपिकेची चोळी पळवून भलत्याच माणसाच्या अंथरुणात टाकणारा उंदीर असो वा माऊसच्या एका क्लिकवर स्फोट घडवून आणणारा संगणकाचा माऊस असो. त्याची नोंद मानवी जीवनात घेतल्याशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे हे मात्र निःसंशयच!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई