जिच्या हाती पाळण्याची दोरी...

27 Apr 2020 10:27:13
सोमवार, दि.२७/ ४/ २०२०
 
संचारबंदीच्या काळात फुरसतीच्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करत असताना एक आश्चर्यचकित करणारी माहिती निदर्शनास आली. त्या माहितीप्रमाणे ज्या राष्ट्रांच्या प्रमुख नेत्या महिला आहेत त्यांनी बलाढ्य व इतर विकसित देशांपेक्षा कोरोना विषाणूंच्या महामारीची परिस्थिती अत्यंत सुयोग्य व परिणामकारक रीतीने हाताळली आहे. अर्थात याला अपवादसुद्धा आहेच. हा काही सरसकट नियम नाही व ज्या राष्ट्रांचे प्रमुख पुरुष आहेत त्यांची निंदानालस्ती करून त्यांना हिणवण्याचा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. ही आहे केवळ शारीरिक व नैसर्गिक दुर्बलतेमुळे अबला म्हणून ज्यांना कमी दर्जा दिला जातो त्या स्त्री शक्तीची कहाणी! त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न!
 

stree shakti_1   
तैवान, जर्मनी, न्यूझीलंड या देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न फार आधीपासून केले गेले व त्यात ते यशस्वीही झाले. जरी अजूनही हे देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाले नसले तरी त्या देशांतील परिस्थिती फारच चांगली आहे. तैवानमध्ये खूप आधीपासूनच महामारी रोखण्याचे सर्व प्रयत्न केले गेले व त्यामुळे आज तैवान युरोपीय खंडातील खूप देशांना लाखोंच्या संख्येने मास्क पुरवित आहे. जर्मनीचा विचार केला तर सर्वात जास्त नागरिकांचे परीक्षण केले जात असून साधारणपणे प्रत्येक आठवड्याला ३,५०,००० नागरिकांचे परीक्षण केले जात आहे. त्यामुळे खूपच पहिल्या पातळीला अथवा सुरवातीच्या अवस्थेमध्ये रोगाचे निदान झाल्याने मृत्यूदर खूपच कमी आहे. न्यूझीलंडमध्ये प्राथमिक पातळीला अगदी सुरवातीच्या दिवसातच पर्यटन व्यवसाय बंद करून महिन्याभराची टाळेबंदी जाहीर केली व कोरोनाबाधितांचा मृत्यूदर अगदी नगण्य राखण्यात यश मिळवले.
 
या तिन्ही देशांचा विचार केला तर जर्मनी आहे युरोपाच्या हृदयस्थानी, तैवान आहे आशिया खंडात तर न्यूझीलंड खूपच दूर दक्षिण पॅसिफिकमध्ये. पण या सर्वांमध्ये एक सामायिक गोष्ट आहे आणि ती म्हणजे या तिन्ही राष्ट्रांच्या प्रमुख महिला आहेत. एकंदरीत संपूर्ण विश्वाचा विचार केला असता केवळ ७% महिलाच जगातील राष्ट्रांच्या प्रमुख नेत्या आहेत. या तिन्ही देशांमध्ये बहुपक्षीय लोकशाही पद्धत असून शासन पद्धतीवर जनतेचा अत्युच्च विश्वास आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सुयोग्य पद्धतीने साथीचा विचार करून साथ नियंत्रित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त जनतेचे परीक्षण, उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधेची सहज उपलब्धता, रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या इतर जनतेची शोधमोहीम करून त्यांचे अलगीकरण व सामाजिक एकत्रीकरणावर- संमेलनावर अतिशय कठोर बंधने ही त्यांच्या कार्यपद्धतीची काही वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. यामागे तैवानच्या अध्यक्षा त्साई वूंग वेन, जर्मनीच्या अध्यक्षा ऐंजेला मर्केल व न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा आरडर्न या तीन कर्तृत्ववान महिलांची अनोखी कार्यशैली दडलेली आहे. आणि म्हणूनच त्या अभिनंदनास पात्र आहेत.
हे सर्व वाचले की एक स्त्री म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. आपल्याकडे ३६- ३६ तास अविरतपणे सेवा पुरवणा-या महिला पोलीस, सफाई कामगार, परिचारिका, डाॅक्टर, बँक कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी या अशाच महान स्त्री नेत्यांचा वारसा चालवीत आहेत. भिलवाड्यासारख्या जिल्ह्याच्या स्त्री जिल्हाधिका-यांनीसुद्धा स्वतःचा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात यश मिळवले आहे. पोटातल्या बाळाची जोखीम घेऊन कोरोनाच्या निदानाचे परीक्षण करण्याची सामुग्री बनवणारी पुण्याची संशोधक, कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनासाठी कार्य करणारी अश्विनी भिडे या प्रशासकीय अधिकारी नारी शक्तीचे उदात्त व मंगल दर्शन घडवतात.
 
भारतीय समाजाला पुराणकाळापासून सीता, द्रौपदी, गार्गी, मैत्रियी यासारख्या स्त्रियांचा वारसा मिळाला असून राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाबाई यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे. आधुनिक काळातील विजयालक्ष्मी पंडित, सयोजिनी नायडू, इंदिरा गांधी यासारख्या धैर्यवान व कणखर स्त्री नेत्यांचे नेतृत्व लाभलेले आहे व आजच्या काळात कल्पना चावलाच्या रूपाने गगनभरारी घेऊन अंतरिक्षाला स्पर्शण्याची जिद्द ठेवण्याचा आदर्श मिळालेला आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यासारखी 'माय' अनाथ, एकट्या मुलांची माता होते व त्यांचे आयुष्य मार्गाला लावते.
 
या सर्वांचे रहस्य दोन गोष्टींमध्ये दडलेले आहे. एक म्हणजे स्त्रीमधील निसर्गाने बहाल केलेली सृजनतादुसरी म्हणजे स्त्रीमधील असलेली ममतेची भावना! कोणत्याही परिस्थितीत संयमित वृत्तीने संकटाशी दोन हात करण्याची वृत्ती व प्रचंड आत्मविश्वासाने केलेले नियोजन यशस्वीपणे राबवण्याची कृतिशीलता!
 
चला तर मग, नारीशक्तीला, जगाचा उद्धार करणा-या स्त्रीदेवतेला नमन करू या. पण घरात राहून, सुरक्षितपणे, गर्दी टाळून!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई
Powered By Sangraha 9.0