विनोदाची मीमांसा

Source :    Date :09-Jul-2020
|
गुरुवार, दि. ९/ ७/ २०२०
 
टवाळा आवडे विनोद' अशा शब्दांत जरी समर्थ रामदासांनी विनोद व टवाळ व्यक्ती यांचा संदर्भ जोडला असला तरी विनोदाची हेटाळणी करणे नेहमीच शक्य नाही.'. हसत खेळत जगणारी माणसे चेह-यावर कोणतेही मुखवटे चढवत नाहीत. पण चेह-यावर गांभीर्याचे भाव आणणारे तत्त्वज्ञ कुणाला आवडतात? विनोदी माणसे बुद्धिवंतांना आवडत नाहीत. प्रज्ञावंत मंडळी विनोदवीरांची थट्टा करतात. परंतु या जगात एखाद्याला रडवणे जितके सोपे आहे; तितकेच हसविणे महाकर्मकठीण!
 
comedy_1  H x W
 
 
मानवी जीवनातील पर्वताएव्हढ्या दुःखाने भरडून जाताना विनोदाचा आधार मोलाचा ठरतो. विनोदामुळे हास्य निर्माण होते आणि हास्य ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. म्हणूनच तर मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वी राजे महाराजांच्या काळात राजदरबारी विदूषकाची नेमणूक केली जायची. नित्याच्या कामातून येणा-या ताणतणावातून राजाची व दरबाराची करमणूक व्हावी हे त्यामागचे कारण असे. विनोदाने घटकाभर का होईना, पण दुःखाचा विसर पडतो आणि त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सुसह्य होतो. मानवी जीवनातील विनोद हा बरेचदा शब्दाच्या, अर्थाच्या, प्रसंगाच्या अथवा कल्पनेच्या चमत्कृतीपूर्ण वापरामुळे होतो. मानवी जीवनातील अनेक त-हेच्या विसंगती हे विनोदाचे उगमस्थान आहे. विनोदामुळे जीवनाला प्रवाहीपणा येऊन जीवनाचा आनंद ख-या अर्थाने खेळकरपणाने उपभोगण्याची लज्जत वाढते. हसण्याची इंजेक्शनं किंवा गोळ्या अजून उपलब्ध नाहीत. कारण त्यांची गरज नाही. प्रासंगिक विनोदनिर्मिती त्यासाठी पुरेशी असते.
हास्यामध्ये पर्यवसित होणा-या जीवनविषयक जाणिवेची प्रचीती देणारा धर्म म्हणजे विनोद. अशी विनोदाची सर्वसाधारण व्याख्या माझ्या वाचनात आली होती. संस्कृत विनोद या शब्दाची फोड 'वि+नुद' (आनंद देणे, रिझवणे किंवा घालवणे, दूर करणे म्हणजे दुःख, निराशा इ. घालवणे) अशी केली जाते. विनोद हा जसा साहित्यातून आविष्कृत होतो, तसाच तो चित्रातून दृश्यरूपाने प्रकटतो, नाटकातून अभिनीत होतो, सर्कशीतून, तमाशातून कृतिरूपाने प्रकट होतो. विनोद हा केवळ कलाप्रकारांतूनच प्रकट होतो असे नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही घडत असतो व सर्वसाधारणतः तो सर्वांना प्रिय व आस्वाद्य वाटतो.
 
विनोद हे माणसाच्या आयुष्याचे एक महत्त्वाचे अंग आहे. बुद्धिकौशल्य दाखवणारे विनोद/ चुटके वाचकांचे/ श्रोत्यांचे मनोरंजन करतात. गंमत म्हणजे बहुतांश चुटक्यांचे जनक वाचकांना वा श्रोत्यांना अज्ञात असतात. आणि कोणतीही व्यक्ती तिचे पालकत्व घेऊ शकते. आणि तरीही त्या गोष्टीचे चुटके रचणा-या बहुतांश माणसांना त्याचे वैषम्य वाटत नाही. चांगल्या दर्जाचा विनोद रचण्यातला आनंद त्यांना पुरेसा समाधानकारक वाटत असतो. माणसाच्या सामुदायिक आयुष्यातली कोणती ना कोणती घटना, अगदी यत्किंचित का होईना पण दुःखद घटना प्रत्येक विनोदाच्या तळाशी असते. आयुष्यातल्या कोणत्याही आनंददायक घटनेसंदर्भात विनोद रचणे खूपच कठीण असते पण माणसाच्या सामुदायिक आयुष्यातल्या दुःखाची तीव्रता कमी करण्याकरता माणसाच्या प्रगत कल्पनाशक्तीने विनोद हा एक सुंदर हमखास इलाज हजारो वर्षांपासून शोधून काढला आहे. कित्येक विनोदांचे दुस-या भाषेत भाषांतर शक्य नसते. किंबहुना ते केले तर त्यातली विनोदाची हवाच निघून जाते.
 
मराठी साहित्याचा विचार केल्यास विनोदी वाङ्मय या नावाने ओळखला जावा असा स्वतंत्र वाङ्मय विभाग निर्माण करण्याचे व एका नव्या वाङ्मय प्रथेला जन्म देण्याचे श्रेय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याकडे जाते आणि तेव्हापासून सुरू झालेली परंपरा राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, श्री. ज. जोशी, पत्रकार अच्युत बळवंत कोल्हटकर, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, जयवंत दळवी, वि. आ. बुवा, द. मा. मिरासदार, रमेश मंत्री यांच्यापर्यंत येऊन पोचते व आजही ती अव्याहतपणे चालू आहे. विनोद हा कधीकधी प्रसंगनिर्मित असतो तर कधी शाब्दिक कोटीतून झालेला असतो. विनोद हा सर्वसाधारणतः निकोप मानसिकता दाखवणारा असावा. तो माणसाच्या शरीराच्या व्यंगावर केलेला नसावा. विनोदामुळे केवळ हास्याची आणि हास्याची कारंजीच फुटणे अभिप्रेत आहे. विनोद हा माणसाच्या दुख-या जखमेवर फुंकर घालणारा असावा, ना जखमेवरील खपली काढणारा! विनोदाला काळावेळाचे वा स्थळाचे कोणतेही बंधन नाही. अगदी स्मशानातसुद्धा प्रसंगनिष्ठ विनोद घडल्याच्या विविध कथा सर्वश्रुत आहेत. विनोदामुळे कोणाचेही मन न दुखावता त्याला त्याचे दोष सांगता येतात. तसेच गुणही सांगता येतात.विनोदामुळे ताणतणाव कमी होतात. तसेच विनोदातून लोकांना शिक्षणसुद्धा देता येते. म्हणून विनोद हा मानवी सुख आणि दुःख यांच्यात सुवर्णमध्य साधतो!
 
खरे पाहता विनोद या जिव्हाळ्याच्या विषयावर गंभीरपणे लेख लिहिणे हे वाङ्मयीन पातक आहे हे लक्षात आल्याने मी लेखाच्या समारोपात 'विनोदावर हसा आणि लठ्ठ व्हा!' एव्हढाच सुखी जीवनाचा मंत्र देऊ इच्छिते!
 
...डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई