स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णूनगर :-

Source :    Date :09-Aug-2019
डोंबिवली पश्चिम भागात तीस वर्षांपूर्वी वस्ती वाढू लागली आणि त्या भागात मराठी शाळेची गरज भासू लागली. त्या वेळी विष्णू नगर भागात विद्याप्रेमी नागरिक श्री. रा. मो. अंतुरकर यांच्या राहत्या घरी 1968 च्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिशू विकास मंदिर, या नावाने 3 विद्यार्थ्यां सह शाळा सुरू झाली. सौ. अंतुरकर ह्या मॉन्टेसरी ट्रेंड असल्याने त्या हे कार्य करीत होत्या. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. मोकाशी यांनी हे काम पाहीले. 1970 मध्ये अंतुरकर यांची ही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेने सामावून घेतली. डोंबिवली पश्चिमेला संस्थेच्या कार्याची अशा तऱ्हेने सुरुवात झाली. सौ विनिता रामकृष्ण अंतुरकर यांच्याकडे पूर्वप्राथमिक विभागाची जबाबदारी देण्यात आली. नामवंत उद्योजक श्री. नाख्ये यांच्या दुकानाच्या गळ्यात सुरुवातीला शाळेचे वर्ग भरवण्यात येत होते. संस्थेचे माजी विश्वस्त श्री. सुभाष चिटणीस, माजी अध्यक्ष श्री प्र. श. वाणी, कै. मोकाशी आणि श्री मो. रा. अंतुरकर यांच्या प्रयत्नातून आणि श्री. नाख्ये यांच्या सक्रिय सहकार्यातून कै. नवरे यांच्या मालकीचा एक प्लॉट अत्यंत अल्प किमतीत राष्ट्रीय शिक्षण संस्थेला मिळाला. त्या जागेवर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेची भव्य वास्तू "राणा प्रताप भवन" या नावाने उभी आहे.


 
 
शाळेचा तळमजला आणि पहिला मजला याचे बांधकाम श्री. नाख्ये यांनी केले होते. सन 1975 ते 1990 या कालखंडात टप्प्याटप्प्याने शाळेचे बांधकाम पूर्ण झाले. राणा प्रताप भवनातच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यालय आहे. येथेच तळमजल्यावर संस्थेचे" डॉ. हेडगेवार सभागृह" ही आहे. या सभागृहाचे उद्घाटन ख्यातनाम लेखक श्री. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते आणि खासदार श्री. राम कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. माध्यमिक विभागाच्या शालांत परीक्षेची प्रथम तुकडी मार्च 1983 मध्ये पाठवण्यात आली. सन 1995 मध्ये शालांत परीक्षेत कु. अपर्णा दिलीप गोळे पहिली आणि कु. अनिष अ. खांडेकर दुसरा आला. या दोघांसह 1995 मध्ये त्यावेळी गुणवत्ता यादीत सात विद्यार्थी आले होते.
बांधकामाच्या बाबतीत 1987 मध्ये पहिला मजला आणि दुसरा मजला बांधून झाला 1989 ला स्काऊट गाईड सुरू झालं. विष्णुनगर ची माध्यमिक शाळा 1980 पासून सुरू झाली.