शिक्षक दिन २०२१

Source :    Date :10-Sep-2021

teachers day_1   
 
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वर |
गुरु: साक्षात परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः||
 
भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कारांची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. म्हणूनच गुरुला ब्रह्मदेवाची उपमा दिली जाते . कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली त्याप्रमाणे गुरूने ज्ञानाची निर्मिती केली. शिक्षक हा सामाजाचा निर्माणकर्ता आहे असे आपण मानतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान आणि जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.
स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम आणि आदर पाहून भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. शिक्षक एक विद्यार्थी नाही तर समाज घडवत असतो. म्हणूनच शिक्षकाला समाजात असामान्य महत्त्व आहे. गुरू-शिष्याच्या नात्याला महत्त्व असून शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षण हाच विकासाचा मंत्र आहे आणि यात शिक्षकांची भूमिका देखील मोलाची आहे.
कोरोनाच्या या महाभयंकर संकटातदेखील शिक्षक आपली सर्व कर्तव्ये पार पाडून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करत आहे.
शिक्षकांमध्ये अनेक प्रकारचे कलागुण असतात. त्यांच्या कलेच्या आविष्काराच्या रूपातून ते विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर आणि समाजासमोर यावेत आणि या सगळ्यांप्रती त्यांचा असणारा ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत व्हावा म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था , डोंबिवली संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय बेडसे बाई यांच्या संकल्पनेतून साकारलेला शिक्षकदिनाचा सोहळा डॉ. हेडगेवार सभागृहामध्ये सर्व नियमांचे पालन करून संपन्न झाला .
या कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री.नरेंद्र दांडेकर सर तसेच शाळा समितीच्या सदस्या माननीय सौ. मीना भिरुड बाई उपस्थित होते.
पोवाडा, भारुड, पथनाट्य, कथा, कविता, गाणे, स्वगत या विविध कलाप्रकारांतून शिक्षकांनी प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याचा सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.