राष्ट्रीय शिक्षण संस्था, संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर (प्राथमिक) विभागाचा रक्षाबंधन सणानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम वृक्षाबंधन

Source :    Date :04-Aug-2020बहीण-भावाच्या नात्यांची पवित्र गुंफण- रक्षाबंधन...
निसर्गाचे वरदान जीवना ; मिळून करू वृक्षाबंधन 
वृक्षाबंधन.._1  .

ह्या विचाराने प्रेरित होऊन रक्षाबंधन हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करूच ; पण ह्या वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण रीतीने संपन्न करावा अशी कल्पना आम्हां सर्वांच्याच मनात रुजली. आणि त्यातूनच वृक्षाबंधन संकल्पनेचा जन्म झाला.
खरं तर बिहार राज्यात रक्षाबंधन हा दिवस 'वृक्ष सुरक्षा दिवस' म्हणून संपन्न होतो. ह्या माध्यमातून मानवी जीवनातील वृक्षांचे महत्व सर्वदूर सर्वांपर्यंत पोहोचावे हाच पर्यावरणवादी विचार आहे.
आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुनंदा बेडसे बाई, सर्व शिक्षक सहकारी, तसेच हरहुन्नरी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या अभिव्यक्तिला वाव देणारे पालक ह्या सर्वांच्याच एकात्मिक प्रयत्नातून साकार झालेला हा वृक्षाबंधन उपक्रम बंधुभावनेचा आणि वृक्षप्रेमाचा आविष्कार घडविणारा. आणि ह्या अनोख्या उपक्रमाचे आम्ही सर्व साक्षीदार...
      उपक्रमाचे स्वरूप असे होते की, विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीने साजरे करायचेच पण त्याच बरोबर निसर्गाला आपले भाऊ व बहीण मानून आपल्या घराजवळील झाडाला किंवा कुंडीतील रोपाला राखी बांधायची.कारण आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाचे आपण संरक्षण, जतन,संवर्धन करायचे आहे. भूतलावरील सर्वच घटकांमध्ये संतुलन राखणारा हा निसर्गही आपला बंधु आहे हीच भावना मनात ठेऊन साजरा करूया.
श्रावण मास आणि त्यातील सण... श्रावणमासाचा आणि सणांचा मनसोक्त आस्वाद घेणारा खरा निसर्गप्रेमी स्वत:ला वेसण घालूच शकत नाही. मानव आणि निसर्ग यामधील नातं अधिक दृढ करतात ते हे सणच... कितीतरी सण हे निसर्गाशीच निगडीत आहेत. रक्षाबंधन हाही त्यापैकीच एक..! परंतु आम्ही परंपरेला बगल देऊन बहिण-भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेल्या या सणाच्या बंधुभावाचा धागा वृक्षवल्लरींशी जोडला. जसे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवशी दरवर्षी एक रोप लावावे असे संस्कार आम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर करतोच;
               ह्यावर्षी रक्षाबंधनाला भावाला राखी बांधून झाली की विद्यार्थ्यांनी आपल्या
             परिसरातील वृक्षांना राखी बांधायची.
   त्यांच्या प्रति बंधुभाव व्यक्त करायचा.
त्यांची काळजी घ्यायची.
"मी तुझे कायम रक्षण आणि संवर्धन करेन..." अशी प्रतिज्ञा करायची.
 आणि इतरांनाही प्रेरक ऊर्जा द्यायची.
ह्या स्वरूपाचा हा उपक्रम आम्हां संस्कृती व पर्यावरणप्रेमींच्या मनाला
    अनोखे समाधान मिळवून देणारा अस्साच.
 

जैसा वृक्ष नेणे मान अपमान ।
तैसे ते सज्जन वर्तताती ।।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।
तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय ।।