आभासी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन .

05 Jan 2021 22:41:18


भासी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन .
 
विज्ञान प्रदर्शन _1 
  
"डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका,

जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका "

       विज्ञानाने अखंड मानवजातीचे कल्याण केलेले आहे. विज्ञानविषयक जागृती शालेय स्तरापासून व्हावी, विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी व आवड निर्माण व्हावी , विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा , विचार करण्याच्या शक्तीमध्ये वाढ व्हावी , अशा अनेक दृदृष्टीकोनांतून "शाळाबंद पण शिक्षण सुरू" हे शासनाचे आव्हान स्वीकारून आमच्या शाळेत मंगळवार दिनांक २९/१२/२०२0 रोजी आभासी प्रणाली या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान यांची सांगड घालून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते .

       सदर विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वर्ग स्तरावरून सहभागी होऊन आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून वर्गशिक्षकांना पाठवले. वर्गस्तरांवरून इयत्ता पाचवीचे ९ विद्यार्थी ,इयत्ता सहावीचे ९ विद्यार्थी , इयत्ता सातवीचे १७ विद्यार्थी , सहभागी झाले होते. अशाप्रकारे झालेल्या या प्रथम फेरीतून इयत्ता पाचवी मधून ४, इयत्ता सहावी मधून ६ व इयत्ता सातवीमधून ६ प्रकल्पांची निवड करण्यात आली .

       माननीय मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक २९/१२/२०२० रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत माननीय मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे मॅडम ,इयत्ता पाचवी ते सातवीचे शिक्षक ,विद्यार्थी व पालक ह्यांच्या उपस्थितीत या ऑनलाईन विज्ञान महोत्सवाची सुरूवात झाली व आमच्या शाळेच्या बालवैज्ञानिकाची निवड करण्यात आली. 'शहरी उष्णता बेट' हा प्रकल्प सादर करून कु.श्रुतिका अभ्यंकर या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवी तून प्रथम क्रमांक पटकावला. '' अन्न पदार्थातील भेसळ "या प्रयोगाच्या सादरीकरणातून कु.हर्षाली गुजर या विद्यार्थिनीने इयत्ता सहावीतून प्रथम क्रमांक प्राप्त केला . ‘ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट’ हा प्रयोग सादर करून कु. तन्वी झाड ही विद्यार्थिनी इयत्ता सातवीतून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

        सेंद्रिय (निसर्ग ) शेती ,अन्नभेसळ पर्यावरणाचे प्रदूषण ,निसर्गाचा होणारा ऱ्हास ,इंधन व ऊर्जा बचत ,स्मार्ट सिटी अशा विविध विषयांना हात घालत विद्यार्थ्यांनी प्रयोगांची मांडणी केली होती .त्या- त्या विषयाचा सखोल अभ्यास करून एकापेक्षा एक सरस असे प्रयोगांचे सादरीकरण करून आपले वेगळेपण विद्यार्थ्यांनी सिद्ध केले.सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास वाव मिळाला .कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून श्री माळी सर यांनी काम पाहिले . विज्ञानाची दृष्टी देण्यासाठी श्री.हुलवळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन प्रयोगांचे सादरीकरण करत असताना सर्व शिक्षकांनी प्रश्नोत्तराच्या सहाय्याने परीक्षण केले. . सौ.मानसी पवार मॅडम यांनी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळा समितीचे पदाधिकारी विद्यार्थी व पालक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .

"विज्ञानाची धरूया कास

अंधश्रद्धेचा करूया ऱ्हास

वैज्ञानिक दृष्टिकोनाची धरूया आस

देशाचा करूया विकास “

"जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय तंत्रज्ञान"

Powered By Sangraha 9.0