विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव

Source :    Date :18-Dec-2021

...... आणि सरस्वती हसली..!
संपली प्रतिक्षा, आता पुन्हा आरंभ करूया ज्ञानयज्ञाचा,
सळसळत्या पिंपळ पानांचा, क्षण हा शारदास्तवनाचा...
बहरले प्रांगण, भारावले वृंदावन, मनी चैतन्य गोंदण,
मंतरलेल्या मनाच्या शुभ शिडांना माऊलीचे अक्षय औक्षण...


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा बुधवार दिनांक १५ डिसेंबर, २०२१ रोजी "कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा कोरोना नियमांची बंधने पाळून दिनांक १६ डिसेंबर,२०२१ पासून सुरू कराव्यात." असा निर्देश आला आणि गेली दीड-दोन वर्षे कोरोनाच्या जागतिक महामारीने मेटाकुटीला आलेल्या कोवळ्या मनांना पुन्हा प्रत्यक्ष शाळाशिक्षण मिळणार ह्या विचाराची शिशिरातही पालवी फुटली.
दोन वर्षांच्या खडतर काळानंतर उगवलेली ही रम्य पहाट..!
उत्साहाचे आणि कर्तव्यतत्परतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या डोंबिवलीच्या ज्ञानपंढरीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक शाळेची शिक्षणाची दिंडी ऐन मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आनंदप्रभाती सुरू झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती सुनंदा बेडसे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मनात दिव्य महत्त्वाकांक्षांची बीजे पेरली आणि कोरोनारुपी महासागराला,त्याच्या अक्राळ-विक्राळ लाटांना खडसावून सांगितले की, "अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला..!अखेर या चिवट जिद्दीपुढे कोरोनाही नतमस्तक झाला आणि ज्ञान पंढरीच्या वैष्णवांनी आणि बाळगोपाळांनी अभंग शिक्षणाचा एकच गजर केला.
शाळेचे आवार रांगोळ्यांच्या सुंदर सड्यांनी सजले... विजय पताकांच्या माळांनी आणि इटुकल्या-पिटुकल्या चिमण्या पाखरांनी वर्ग-वर्ग गजबजले... हवाहवासा वाटणारा वातावरणातील सुखद गारवा मनामनात नव विचारांचा रुजवा निर्माण करत होता. आनंदाच्या डोही आनंद तरंगउमटवत होता... आणि शाळेच्या आवारात ही अशी रोमांचकारी लगबग सुरू होती. अख्ख्या निसर्गाचे प्रतिबिंब शाळेच्या विश्वात मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनात पहायला मिळत होते सगळ्यांनाच..!
विद्यार्थी, पालक यांचे सहकार्य; संस्था आणि शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांची उत्साहभरली उपस्थिती यामुळे हा ज्ञानयज्ञ सर्वांवर मात करून अखंड तेवत ठेवण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण करत होता. अशाच भारावलेल्या मनाने शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे आणि सर्व शिक्षक यांनी ढोल ताशांच्या वाद्यवृंदात विद्यार्थ्यांचे दिमाखात स्वागत केले. कोरोना काळातील सर्वच बंधने स्वीकारून अथक परिश्रमाने सर्वांनी नियोजन केले होते.
ऑक्सीमीटर, सॅनिटायझर, पालकांचे संमतीपत्रक यांची अंमळ पूर्तता केली होती. काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीतच नव्या युगाला सुरुवात झाली. इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या वर्गातील मुलांची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशी दोन सत्रात विभागणी करून शालेय कामकाजाच्या वेळा ठरविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा बिगुल वाजवला. शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री. नरेंद्र दांडेकर सर सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांच्या वेळी, शाळा समितीचे सदस्य माननीय श्री. दीपक बापट सर सकाळी दहा वाजता विद्यार्थीनींच्या वेळी तर दुपारी एक वाजता इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वेळी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख माननीय सौ. कीर्ती मुरादे विद्यार्थ्यांच्या वेळी आणि तीन वाजता शाळा समितीच्या सदस्या माननीय सौ. भिरूड बाईआणि संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री .शिरीष फडके सर विद्यार्थिनींच्या वेळी स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होत्या. सर्वच विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टीने झालेले स्वागत आणि सजवलेल्या वर्गात प्रवेश करताना प्रवेशद्वारी पंचारतीने झालेले औक्षण पाहून विद्यार्थी भारवलेल्या मनाने आपल्या शिक्षकांना वंदन करून वर्गात प्रवेश करत होते.
ऑनलाइन ते ऑफलाइन हा प्रवास सहज-सोपा नव्हता.
त्यासाठी मनाची उभारी लागते...
दिव्य त्यागाची फुले वाहावी लागतात...
अथक परिश्रम आणि मनस्वी जिद्द असावी लागते...
कोरोना काळातील अनेक चांगल्या वाईट अनुभवांनी ही जिद्द अधिकच दृढ झाली आहे...
शाळेच्या ऑफलाइन शिक्षणाची घंटा तर वाजली... पण या बरोबरीनेच विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मनामनामध्ये घंटानाद सुरू झालाय ! ह्या घंटानादाचा हा किणकिण ताल पुढे अनंत युगातील कोरोनासारख्या महाभयंकर महामारींवर विजय मिळविण्यास कारणभूत होणार आहे. म्हणूनच परमेश्वराकडे सर्वांच्या साक्षीने एकच प्रार्थना की, असे कोणतेही संकट जगावर पुन्हा आणू नकोस, जेणेकरून आमच्या सहनशक्तीचा अंत होईल. आमची मने आणि मनगटे पोलादी आहेत. आमच्या मनातील इच्छाशक्ती अथांग, असीम, अमर्याद, अनंत, अपार आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही अशी संकटे लीलया परतवून लावू. फक्त तुझे कृपाछत्र आमच्या शिरी चिरंतन राहु दे बाप्पा.